एसटीच्या गलथान कारभाराने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान- आंदोलनाचा इशारा

कणकवली (प्रतिनिधी):- कासार्डे, तळेरे माध्यमिक विद्यालय व कॉलेजमध्ये शिकणाऱ्या पियाळी परिसरातील मुलांना सध्या अकरा वाजता शाळा सुटत असल्याने परतीचा प्रवास करण्यासाठी तळेरे पियाळी मार्गे फोंडा एस.टी.बस सुरु नसल्याने ७ ते ८ कि.मी. पायपीट करावी लागत आहे. त्याचबरोबर सकाळी उशिरा एस.टी. बस येत असल्याने विद्यार्थ्यांना शैक्षणिक नुकासाणीसह मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत पत्रव्यवहार करुन देखील दखल घेतली जात नसल्याने सोमवारपासून एस. टी. बस वेळेत व परतीच्या प्रवासासाठी न सुटल्यास आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांसह सिंधुकन्या महिला बचतगटांच्या पदाधिकारी व सदस्यांनी दिला आहे.

कारोनामुळे शाळा बंद असल्याने तसेच कोरोना नियमावलीमुळे ग्रामीण भागातील अनेक एस.टी.बस बंद करण्यात आलेल्या होत्या.मात्र शाळा सुरु झाल्यानतंरही आजही अनेक ग्रामीण भागात एस.टी. महामंडळाकडून म्हणाव्या तशा बस फे-या सुरु झालेल्या नाहीत. याचा फटका पियाळी येथील शाळकरी मुलांना बसत आहे. कासार्डे, तळेरे विद्यालय व कॉलेजमध्ये शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या मुलांना सकाळी कणकवली येथून सुटणारी एस.टी. बस आठ वाजता पियाळी येथे येते तसेच शाळा आठ वाजता सुरु होत असल्याने येईपर्यंत एक तासिका होऊन जात असल्याने शैक्षणिक नुकसान होत आहे.

तर परतीचा प्रवास करण्यासाठी तळेरे पियाळी मार्गे फोंडा एस. टी. बस दुपारच्या सत्रात सुरु नसल्याने ७ ते ८ कि.मी मुलांना पायपीट करावी लागत आहे. यामुळे भर उन्हातून जातांना चक्कर येणे, आजारी पडणे तसेच या मार्गावरुन वाळू वाहतूक करणारी अवजड वाहतूक होत असल्याने त्याचाही धोका विद्यार्थ्यांना चालताना होत आहे. परिणामी घरात वाहन नसणारे अनेक विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी पसंती देत नसल्याचे समजते. तर शाळेत जाताना पालकांना आर्थिक भूदर्ड सहन करावा लागत आहे. जवळ जवळ ऐंशी टक्के विद्यार्थी या एस. टी. बसमधून प्रवास करत असून त्याचबरोबर स्थानिक नागरीकही प्रवास करत आहेत. यामुळे विद्यार्थी व नागरिकांची गैरसोय लक्षात घेता कणकवली येथून पियाळी येथे सकाळी साडेसात व तळेरे बसस्थानक येथून पावणे बारा वाजता शाळेच्या वेळेत एस.टी बस सोडावी; अशी मागणी ग्रामपंचायत पियाळी व सिंधुकन्या ग्रामसंघ पियाळी यांनी केली होती. मात्र याची दखल घेतली नसल्याचे स्थानिकांकडून समजते. तरी सोमवार पासून निर्धारित वेळेत एस.टी.बस सुरु न केल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

You cannot copy content of this page