ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मानवी हक्क कार्यशाळेस उत्स्फुर्त प्रतिसाद

मानवाचे नैसर्गिक आणि संविधानात्मक अधिकार मिळवून
देण्यासाठी प्रामाणिकपणे कार्य केल्यास लोकशाही मजबूत होईल!”
-ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष एम. डी. चौधरी

कणकवली (विशेष प्रतिनिधी):- “विशेषतः समाजाच्या दुर्लक्षित घटकांवर होणारे अन्याय दूर करण्यासाठी अर्थात सर्वसामान्यांना मानवाचे नैसर्गिक आणि संविधानात्मक अधिकार मिळवून देण्यासाठी प्रत्येक नागरिकाने प्रामाणिकपणे कार्य केले पाहिजे. त्यातूनच खऱ्याअर्थाने लोकशाही मजबूत होईल!” असे प्रतिपादन ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष एम. डी. चौधरी यांनी केले. `ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन’ ह्या संघटनेच्या कणकवली येथील मार्गदर्शन कार्यशाळेत ते बोलत होते.

`ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन’ ही संघटना मानवाचे अधिकार नाकारून जेव्हा अन्याय-अत्याचार केला जातो; तेव्हा जागृतपणे कार्य करीत असते आणि आजपर्यंत शेकडो दावे दाखल करून अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून दिला! महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यात संघटनेमार्फत जोमाने काम सुरु असून सिंधुदुर्गातील सर्व पदाधिकाऱ्यांनी-सभासदांनी `ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन’चे अतुलनिय कार्य केले ते कौतुकास्पद आहे! असे राष्ट्रीय अध्यक्ष एम. डी. चौधरी यांनी सांगून सर्वांचे अभिनंदन केले.

ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शनची कार्यशाळा कणकवली येथील मातोश्री मंगल कार्यालयात सिंधुदुर्ग जिल्हा संघटनेच्यावतीने आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी कणकवलीचे तहसीलदार आर. जे. पवार, पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर, संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष एम. डी चौधरी, राष्ट्रीय सचिव डॉ. जावेद शिकलगार, राष्ट्रीय प्रवक्ता संतोष कदम, पश्चिम महाराष्ट्र निरीक्षक घनश्याम सांडिम, जिल्हा अध्यक्ष संतोष नाईक, मुख्य कार्यालयीन अधिकारी राकेश शिंदे, पाक्षिक `स्टार वृत्त’चे मुख्यवृत्त संपादक अनिल तांबे, सामाजिक कार्यकर्त्या संचिता परब, ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी-सभासद, सर्व तालुक्यांचे अध्यक्ष, पदाधिकारी, सभासद आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

मार्गदर्शन कार्यशाळेचा शुभारंभ मान्यवरांनी दिपप्रज्वलन करून व छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून झाला. प्रथमतः पाक्षिक `स्टार वृत्त’ विशेषांकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी कणकवलीचे तहसीलदार आर. जे. पवार यांनी आपल्या मागर्दर्शनपर भाषणात सांगितले की, “मानवाधिकाराचा उपयोग प्रत्येकाने केला पाहिजे. त्यासाठी आपण आपले हक्क आणि जबाबदाऱ्या समजून घेतल्या पाहिजेत. त्याचा उपयोग सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच सार्वजनिक प्रश्न मार्गी लावण्यासाठी केला पाहिजे. तर अन्यायाला वाचा फुटेल आणि ती समस्या किंवा प्रश्न सुटण्यासाठी फार मोठी मदत होईल. याच माध्यमातून संघटनेचे चांगले काम उभे राहू शकते. यासाठी प्रशासनाचे नेहमीच सहकार्य राहील.” पुढे त्यांनी ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या सदस्यांची तालुक्यातील शासकीय समितीवर नियुक्ती करू; असे आश्वासन दिले.

कणकवलीचे पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनी संघटनेच्या कार्याला शुभेच्छा दिल्या व संघटनेचे कार्य राज्यात उत्कृष्टपणे सुरु असल्याचे कौतुकाने सांगितले.

ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे पश्चिम महाराष्ट्र निरीक्षक घनश्याम सांडिम घनश्याम सांडिम पाहुण्यांची ओळख करून दिली व कार्यशाळेचे महत्व विषद केले. तर राष्ट्रीय प्रवक्ता संतोष कदम यांनी संघटनेचे ध्येय सांगून कार्य करताना कोणती काळजी घ्यावी? ह्याचे सविस्तर विवेचन केले.

सदर मार्गदर्शन कार्यशाळेत राष्ट्रीय सचिव डॉ. जावेद शिकलगार यांनी वाहतुकविषयी माहिती दिली व केलेले कायदे आपल्यासाठीच असतात व त्याचा उपयोग दैनंदिन जीवनात कसा करावा? हे सोप्या पद्धतीत सांगितले.

सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष संतोष नाईक यांनी जिल्ह्यातील कामाचा आढावा घेतला व सर्वांना बरोबर घेऊन काम करू असेही सांगितले. गेल्या दहा-अकरा महिन्यात सिंधुदुर्गात ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या माध्यमातून अनेक सामाजिक-विकासात्मक समस्यांवर प्रशासनाचे लक्ष वेधले. समाजाच्या दुर्लक्षित घटकांवर होणारे अन्याय दूर करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून कार्य केले. हे कोणा एकट्याचे श्रेय नसून जिल्ह्यातील ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे-सभासदांचे आहे. त्यासाठी राष्ट्रीय पातळीवरील पदाधिकाऱ्यांचे सहकार्य आणि मार्गदर्शन उपयुक्त ठरले. यापुढेही सिंधुदुर्गात जोमाने कार्य करून मानवाचे अधिकार दुर्लक्षित होणार नाहीत; असे संतोष नाईक यांनी स्पष्ट केले.

यावेळी संघटनेत कार्य करणाऱ्या डॉक्टरांचा विशेष सत्कार केला. त्याचप्रमाणे पोलीस वाहतूक नियंत्रक कक्षात कार्यरत असणाऱ्या पोलिसांचा, उपस्थित पाहुण्यांचा, राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा उपाध्यक्ष नंदन घोगळे सर यांनी तर सूत्रसंचालन शाम सांवत सर यांनी केले. कणकवली तालुका उपाध्यक्ष प्रकाश नारकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

You cannot copy content of this page