तळेरे विद्यालयासमोर महामार्गावरती पादचारी पुल उभारणीची सामाजिक कार्यकर्ते राजेश जाधव यांची मागणी!

वरिष्ठ स्तरावरील अधिकारी अनुकूल; मात्र खारेपाटण उपअभियंत्यांची कमालीची अनास्था!

मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱ्या तळेरे येथील वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय आणि मुंबई विद्यापीठाच्या दळवी महाविद्यालयासमोर विद्यार्थ्यांना महामार्ग ओलांडून पलीकडे जाण्या-येण्यासाठी पादचारी पुल होणे अत्यंत गरजेचे आहे. अशा प्रकारची आग्रही मागणी आणि ठाम भूमिका सामाजिक कार्यकर्ते राजेश जाधव यांनी अगदी महामार्ग निर्मितीच्या प्रारंभीपासून लावून धरली होती. उशीरा का होईना प्रशासकीय यंत्रणेला अखेर जाग आली आहे. त्यादृष्टीने सकारात्मक पावले पडू लागल्याने राजेश जाधव यांच्या लढ्याला निश्चितच बळ मिळाले आहे.

विद्यार्थ्यांच्या जिवीताशी खेळ :-
तळेरे येथील वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,मुंबई महाविद्यालयाचे दळवी काॅलेज आणि स्वीटलॅन्ड इंग्लिश मेडियम स्कूल ही तिन्ही विद्या संकुले हायवेला लागूनच रस्त्याच्या पश्चिमेस आहेत. विद्यार्थ्याच्या सुरक्षिततेबाबत उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे होते. या तिन्ही विद्यालयातील हजोरो विद्यार्थ्यांना महामार्ग ओलांडून पलीकडे जाण्या-येण्यासाठी जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागत आहे. त्यामुळे अपघाताचा मोठा धोका निर्माण झाला आहे. ही बाब रस्ता निर्मिती पूर्वीपासून संबंधित यंत्रणांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी वेळ मारुन नेऊन वाटाण्याच्या अक्षता लावल्या. त्याबाबतचा मागणी अहवाल आणि अंदाजपत्रक खारेपाटण उपविभागीय उप अभियंत्यांनी शासन दरबारी वरिष्ठांना पाठविण्याची कोणतीही तसदी घेतली नाही. यावरुन अधिकाऱ्यांची कमालीची उदासीनता आणि निष्काळजीपणा दिसून येतो. मग हे असे अधिकारी जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी नेमण्यात आले आहेत की नुसतेच जनतेच्या तोंडाला पाने पुसण्यासाठी नेमण्यात आहेत? असा प्रश्न आम जनतेला पडल्यावाचून राहत नाही.

वरिष्ठ स्तरावरून सकारात्मक हालचाली:-
तळेरे येथे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर शैक्षणिक संकुलादरम्यान तेथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या उपाययोजना करुन विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे महामार्ग ओलांडून पलीकडे जाण्यासाठी भक्कम व मजबूत पादचारी पूल बांधण्यात यावा अशी मागणी सुमारे दोन वर्षांपूर्वी केंद्र व राज्य सरकारकडे आपले सरकार पोर्टलवर तक्रार दाखल केल्यानंतर त्या तक्रारीची दखल विहित कालावधीत तात्काळ घेतली गेलेली नाही. विलंबाने घेतली आहे. या तक्रारींची दखल घेतली सुमारे १८ महिन्यांचा म्हणजे दीड वर्षांचा विलंबाने घेतली गेली आहे. याबाबत केलेल्या तक्रारीचा आवश्यक तो पाठपुरावा देखील वेळोवेळी केला आहे. अखेर याचा पाठपुरावा राजेश जाधव यांनी वरिष्ठ स्तरावरून सुरू केला असता त्याबाबतची घटनास्थळाची पाहणी करून वस्तूस्थिती जाणून घेऊन त्याबाबतचे अंदाजपत्रक आणि योग्य मागणी अहवाल खारेपाटण उप विभागीय उप अभियंता यांच्याकडून वेळीच जायला पाहिजे होता किंवा विभागीय कार्यालय, रत्नागिरी यांनी तरी वरिष्ठ स्तरावरती पाठविणे अपेक्षित होते. परंतु अधिकाऱ्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे हा प्रश्न अधिकाऱ्याच्या साठमारीत प्रस्ताव लालफितीत अडकून पडला. शेवटी या प्रश्नाची योग्य ती दखल उप अभियंता तथा कार्यासन अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय – मुंबई यांनी घेतली. त्यांनी अधीक्षक अभियंता, राष्ट्रीय महामार्ग मंडळ, कोकण भवन – नवी मुंबई यांना आवश्यक तो पत्रव्यवहार करुन त्याबाबतचा अहवाल पाठविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे स्थानिक स्तरावरील निर्ढावलेली प्रशासकीय यंत्रणा आता तरी जागी होते की झोपेचे सोंग घेते? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. मात्र वरिष्ठ स्तरावरून त्यादृष्टीने सुरू झालेल्या सकारात्मक हालचाली ही बाब निश्चितच समाधानकारक म्हणावी लागेल. त्यामुळे राजेश जाधव यांच्या प्रलंबित मागणीला यश मिळण्याच्या दृष्टीने आशेचा किरण निर्माण झाला आहे.

पादचारी पुलाच्या मागणीला पंचक्रोशीत ग्रामस्थांचा पाठिंबा:-
महामार्गाचे काम सुरू असताना ज्या मागणीवर काम व्हायला हवे होते, त्याबाबत कार्यवाही होण्यास विलंब झाला आहे. याला सर्वस्वी जबाबदार कोण? तसेच विद्यार्थी महामार्ग ओलांडून जात असतांना दुर्दैवाने एखाद्या अपघात झाला आणि काही नुकसान झाले तर त्याची जबाबदारी संबंधित उपअभियंता व रस्ते प्राधिकरण स्वीकारणार आहेत का? असा सवाल उपस्थित केला आहे. अन्यथा महामार्गाच्या एकूणच संपूर्ण कामाबाबत आणि दर्जाबाबतच्या सगळ्या बाबी उघड करुन त्याची रितसर  तक्रार केंद्रीय रस्ते विकास व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे करणार असल्याचा निर्वाणीचा इशारा राजेश जाधव यांनी दिला आहे.

सदरच्या पादचारी पुलाच्या प्रलंबित मागणीचा हेतू व गरज लक्षात घेता त्याकरिता आपण सर्वतोपरी प्रयत्नशील राहणार आहे; असा निश्चय राजेश जाधव यांनी केला आहे. तथापि या सर्व लढ्यात पंचक्रोशीतील ग्रामस्थ देखील त्यांच्या सोबत आहेत. तशा प्रकारच्या मागणीचे ठराव ग्रामपंचायतीकडून प्राप्त झाले आहेत. त्यामुळे या मागणीची व्यापकता निश्चित वाढली आहे. पादचारी पुलाचा आग्रही मागणीचा प्रश्न जोपर्यंत धसास लागून प्रत्यक्षात पादचारी पुल उभारणीचे काम पूर्णत्वास जात नाही, तोपर्यंत आपला लढा चालूच राहणार असा ठाम निर्धार सामाजिक कार्यकर्ते राजेश दिलीपकुमार जाधव यांनी केला आहे. त्यामुळे हा प्रश्न पुन्हा पेटणार एवढे मात्र निश्चित आहे.