विधान परिषद लक्षवेधी सूचना: गडचिरोलीतील राईस मिल अपव्यवहार प्रकरणी कठोर कारवाई होणार – राज्यमंत्री योगेश कदम
मुंबई:- गडचिरोली जिल्ह्यातील काही राईस मिल धारकांनी शासनाची फसवणूक केली आहे. त्याप्रकरणी त्यांच्यावर कठोर कारवाई करणार असल्याचे राज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानपरिषदेत स्पष्ट केले. विधानपरिषदेत एका लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना त्यांनी सांगितले की, अपव्यवहार करणाऱ्या राईस मिल धारकांवर दंडात्मक कारवाई सुरू आहे. काहींवर दोन कोटी रुपयांचा दंड आकारण्यात आला असला तरी, अद्याप तो भरलेला नाही. त्यामुळे संबंधितांवर आणखी कठोर पावले उचलली जातील, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई केली जाऊन काही प्रकरणांमध्ये संघटित गुन्हेगारी असल्याचे निदर्शनास आल्यास, मकोका (MCOCA) कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा विचार केला जाईल, असेही राज्यमंत्री श्री.कदम यांनी यावेळी सांगितले.
गरीब आणि गरजू कुटुंबांना मिळणाऱ्या तांदळाच्या गुणवत्तेबाबत तक्रारी आल्या आहेत. या संदर्भात कसलीही कुचराई सहन केली जाणार नाही. कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित असला तरी, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असेही राज्यमंत्री श्री.कदम यांनी सांगितले.
यासंदर्भात लवकरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेण्यात येणार असून त्यात संबंधित प्रकरणांवर सविस्तर चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
विधान परिषद सदस्य सर्वश्री अभिजित वंजारी, ॲड.अनिल परब, परिणय फुके, भाई जगताप आणि विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी या लक्षवेधी सूचनेमध्ये सहभाग घेतला.