शासनाच्या योजना प्रत्येकापर्यंत पोहोचविण्याची गरज – बबनराव लोणीकर

जालना:- समाजातील उपेक्षित, वंचित, दीन-दुबळे तसेच निराधारांसाठी शासन अनेकविध योजना राबवित आहे. या योजनेच्या माध्यमातून निराधारांच्या जीवनातील अंधार दूर करण्याचे काम शासनामार्फत करण्यात येत असुन शासनाच्या या योजना तळागाळातील प्रत्येकापर्यंत पोहोचविण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांबरोबरच समाजातील प्रत्येकाने या कामात पुढाकार घेण्याचे आवाहन पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केले.

नेर येथे सामाजिक अर्थसहाय्य योजनेंतर्गत समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपस्थित लाभार्थ्यांशी संवाद साधताना पालकमंत्री श्री.लोणीकर बोलत होते.

पालकमंत्री श्री.लोणीकर म्हणाले, सामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानून राज्य व केंद्र शासन अनेक कल्याणकारी योजना राबवित आहे. या योजनांचा लाभ घेण्यासाठी सर्वसामान्यांना शासनाच्या योजनेसाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची माहिती नसल्याने या लाभापासून ते वंचित राहतात. जालना जिल्ह्यात अर्थसहाय्य योजना समितीच्या माध्यमातून व सर्व शासकीय विभागांच्या सहकार्याने सर्वसामान्यांना या योजनांचा लाभ एकाच छताखाली मिळावा यासाठी प्रयत्न करण्यात आल्याने गेल्या तीन वर्षात १२ हजार निराधारांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. नेर व सेवली परिसरातील ३ हजार ३०० लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. येणाऱ्या काळात प्रत्येक पात्र व गरजू लाभार्थ्याला लाभ देण्यासाठी पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

समाजातील दिव्यांगांच्या उन्नतीसाठी शासन अनेकविध योजना राबविते. समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना, एस.टी. महामंडळामार्फत देण्यात येणारे लाभ तसेच कौशल्य विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ समाजातील प्रत्येक दिव्यांगांना एकाच छताखाली मिळण्यासाठी लवकरच महाशिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. परतूर, मंठा, नेर व सेवली भागात जवळपास ५२ हजार दिव्यांगांची संख्या असून आजपर्यंत २२ हजार दिव्यांगांची नोंदणी करण्यात आली आहे. या सर्व दिव्यांगांना शासनाच्या योजनांचा लाभ देण्यासाठी त्यांच्याप्रती सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन अधिकाधिक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याबरोबरच शासनाच्या योजनांपासून एकही दिव्यांग वंचित राहणार नाही यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहनही पालकमंत्री श्री.लोणीकर यांनी यावेळी केले.

राज्य शासनाने महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना सुरु करुन या योजनेच्या माध्यमातून समाजातील अनेक गोरगरीबांना या योजनेमुळे जीवनदान दिले आहे. या योजनेमध्ये समाविष्ट न होणाऱ्या लाभार्थ्यांना प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून पाच लाख रुपयापर्यंतच्या वैद्यकीय सेवा मोफत स्वरुपात उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचे सांगत राज्यातील ८४ लाख कुटूंबांना या योजनेचा लाभ मिळणार असून या योजनेची माहिती गावातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी योजनेचा प्रचार, प्रसार करण्यात यावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना या योजनेंतर्गत प्रती शेतकरी कुटुंबाला प्रतीवर्ष सहा हजार रुपये इतके आर्थिक सहाय्य म्हणून अनुदान देण्यात येणार असल्याचे सांगत प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून प्रत्येक बेघराला त्याच्या स्वत:चे व हक्काचे घर उपलब्ध करुन देण्यात येत आहे. सेवली येथे ३०० लाभार्थ्यांना तर आष्टी येथे ४५० लाभार्थ्यांना घरकुले उपलब्ध करुन देण्यात आली असून येत्या २०२२ पर्यंत देशात एकही व्यक्ती बेघर राहणार नसल्याचे पालकमंत्री श्री. लोणीकर यांनी यावेळी सांगितले.

प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून देशातील पाच कोटी कूटुंबांना केवळ १०० रुपयांमध्ये गॅसचे वितरण करण्यात आले असून जालना जिल्ह्यात एक लाख लाभार्थ्यांना याचे वाटप करण्यात आले आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांची धुरापासून मुक्तता करण्यात आली असल्याचे सांगत पालकमंत्री श्री. लोणीकर यांनी यावेळी इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना, राष्ट्रीय कुटूंब अर्थसहाय्य योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेसंदर्भातही उपस्थित लाभार्थ्यांना माहिती दिली.

यावेळी संजय गांधी निराधार अनुदान योजनेंतर्गत निवृत्तीवेतन मंजूर करण्यात आलेल्या लाभार्थ्यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात मंजूरी आदेशाचे वितरणही करण्यात आले. या योजनेंतर्गत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल योजनेचे अध्यक्ष सहदेव मोरे यांच्यासह सर्व सदस्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *