शिक्षणासह जीवन संपन्न करण्याचे तंत्र शिकविणारे पालव सर अनंतात विलीन झाले!

अतिशय दुःखदायक बातमी आली. अक्षरशः धक्काच बसला. असं कधी वाटलं नव्हतं… कारण त्यांचं जाण्याचं वय नव्हतं. अचानक आलेल्या बातमीने सरांबद्दलच्या स्मृती जागृत झाल्या आणि अश्रूंना बांध घालावा लागला! आमचे लाडके पालव सर दोन दिवसापूर्वी अनंतात विलीन झाले. कणकवलीच्या एस. एम. हायस्कूलमध्ये इयत्ता आठवी ते बारावी दरम्यान इलेक्ट्रिकल आणि इंजीनियरिंग ड्रॉईंग हा विषय शिकविणारे अनिल पालव सर यांनी अचानक जगाचा निरोप घेतला.

पालव सर यांच्याकडे पाच वर्षे शिकलो; पण त्या पाच वर्षांमध्ये त्यांनी जे काही संस्कारक्षम मूल्य आमच्या मनामध्ये रुजविले; त्याचं मोल अनमोल आहे जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर ते संस्कार आम्हाला उपयुक्त ठरतात.

त्यांचेशी खूप काही बोलायचं होतं ते सर्व तसंच राहून गेलं. पालव सर शिक्षकाच्या भूमिकेत असताना नेहमीच पालकत्व स्वीकारायचे. प्रत्येक विद्यार्थ्याचा ते पालक व्हायचे, त्यामुळे त्यांच्याबद्दल आमच्या मनात विशेष आदर होता. एवढेच नव्हे तर आजपर्यंत त्यांनी आमच्याशी मित्रत्वाचे संबंध जपले-वाढविले. अतिशय स्पष्टपणे विचार मांडणारे पालव सर अनेकांना भावले नसतील; पण मला मात्र त्यांचा स्पष्टपणा खूप आवडायचा. वाईट-चुकीच्या गोष्टींविरोधात त्यांनी आपले विचार मांडताना कशाचाही विचार केला नाही. त्यांचे शिकविण्याचे विषय टेक्नीकल असलेतरी जीवन जगण्याचे टेक्नीक पालव सरांनी आपल्या विद्यार्थ्यांना नेहमीच दिले.

एका शाळेतून दुसऱ्या शाळेत गेल्यावर पहिल्या शाळेतील शिक्षकांचा तसा संबंध क्वचित येतो; पण आम्ही मात्र टेक्नीकल विभागाचे श्री. अमर पारकर सर असो वा पालव सर असो; त्यांचे मार्गदर्शन नेहमीच घेतो. अगदी अचानक वर्गावर जाऊन सुद्धा त्यांनी माजी विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविल्या- मोलाचा सल्ला दिला. `आपले विद्यार्थी विविध क्षेत्रात जेव्हा सर्वोच्च स्थानी जातात, प्रचंड प्रगती करतात; तेव्हा त्या प्रगतीमध्ये शिक्षकाचं सुख असतं-समाधान असतं!’ हे मला ते नेहमी आवर्जून सांगायचे. शिक्षक म्हणून त्यांनी केलेले कार्य नेहमीच स्मरणात राहील तर शिक्षकमित्र म्हणून त्यांनी आमच्याशी जोडलेले नातं कधीच तुटणार नाही. त्यांच्या जाण्याने आम्ही खूप काही गमावलं आहे.

त्यांच्यासंदर्भात लिहिण्यासारख्या खूप खूप आठवणी आहेत. आपण जिथे काम करतो; त्या कामाशी प्रामाणिक कसं राहायचं? ज्या संस्थेत आपण काम करतो, त्या संस्थेची प्रगती कशी साध्य करायची? हे ध्येय पालव सरांच्या व्यक्तिमत्त्वात अधिक ठासून भरलेले होते. मध्यंतरी माझं पालव सरांशी बोलणं झालं, ते म्हणाले, “तुमच्यासारख्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी एकत्र यायला हवे आणि एस. एम. हायस्कूलच्या टेक्नीकल विभागाला अधिकाधिक प्रगतीपथावर नेण्यासाठी कार्य करायला हवे. नरेंद्र, मी माझ्याकडे असलेले माजी विद्यार्थ्यांचे काही संपर्क क्रमांक देतो. तू त्यांच्याशी बोल आणि एकत्र या आणि संस्थेसाठी काहीतरी करा! त्यातून तुम्हाला आनंद मिळेल आणि तुम्हाला ज्या संस्थेने शिक्षण दिले ती संस्था सुद्धा संपन्न होईल.” प्रामाणिक, कार्यक्षम आणि निस्वार्थी वृत्तीमुळेच असे विचार एक शिक्षक समाजाला देऊ शकतो. असे पालव सरांसारखे शिक्षकगुरु आपल्या शैक्षणिक जीवनात येणं ही खरोखरच भाग्याची गोष्ट असते आणि ते भाग्य आम्हाला मिळालं.

नऊ महिन्यानंतर ते सेवानिवृत्त होणार होते; परंतु त्यापूर्वीच त्यांना अनंतात विलीन व्हावं लागलं. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासासाठी त्यांचे विचार खूप मोलाचे होते. त्यानुसार त्यांना कार्य करायचं होतं. सेवानिवृत्त झाल्यावर त्यांनी नक्कीच शैक्षणिक विकासाचे काम केलं असतं; पण काळाने घात केला आणि आमच्या लाडक्या पालव सरांना, आमच्या मार्गदर्शकाला, आमच्या सच्चा मित्राला आमच्यापासून दूर नेलं.

पालव सरांच्या जाण्याने एक चांगला शिक्षकगुरु, एक आदर्श मार्गदर्शक आणि जवळीक साधणारा मित्र गेल्याचं दुःख आहे; ते कधीही भरून निघणारे नाही. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, विवाहित मुलगी आणि मुलगा ह्या सर्वांच्या दुःखात आम्ही सामील आहोत. `परमात्म्या हा दुःखाचा पर्वत त्यांच्या कुटुंबियांना, मित्रांना, नातेवाईकांना, सहकाऱ्यांना पेलण्याची आणि त्यातून समर्थपणे बाहेर पडण्याची शक्ती- सामर्थ्य दे.’ अशी प्रार्थना आज आम्ही करतोय. पालव सरांकडे प्रामाणिकपणा-सच्चेपणा `अनंत’ होता; तो परमात्माही `अनंत’ आहे. त्या परमात्म्यारूपी अनंतत्वात ते विलीन झाले.

`पालव सरांना भावपूर्ण श्रद्धांजली’ असं लिहिण्यास मन तयार नाही. मात्र पालव सरांनी दिलेल्या आदर्शासमोर आम्ही सदैव नतमस्तक राहू!

-नरेंद्र हडकर

You cannot copy content of this page