ऊर्जा क्षेत्रात जर्मनीशी सहकार्य वाढवणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई:- पर्यावरणपूरक आणि पर्यावरणसंवर्धक ऊर्जा ही काळाची गरज बनली असून या पार्श्वभूमीवर ऊर्जा आणि अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात जर्मनीशी सहकार्य वाढवणार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
जर्मन व्हाईस चान्सलर डॉ. रॉबर्ट हॅबेक यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी उद्योग, व्यापार, आर्थिक तसेच सांस्कृतिक क्षेत्रातील सहकार्य यासंदर्भात चर्चा झाली.
यावेळी जर्मनीचे राजदूत डॉ फिलिप अॅकरमन, कौन्सुल जनरल अॅकिम फॅबिग, राजशिष्टाचार विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा म्हैसकर, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा, ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला, संचालक पी. अन्बलगन, उद्योग विभागाचे विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी तसेच 20 जर्मन कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जर्मनीतील माध्यम प्रतिनिधी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र आणि जर्मनी यांच्यात ऊर्जा क्षेत्रात असलेले सहकार्य स्थैर्य देणारे ठरले आहे. पुण्यात मोठ्या प्रमाणावर जर्मन कंपन्या आहेत. अर्थव्यवस्थेला अधिक गती देण्यासाठी हे सहकार्य वाढवण्यावर भर देण्यात येत आहे. महाराष्ट्र हे देशाचे ग्रोथ इंजिन आहे. उद्योग आणि इतर क्षेत्रातही राज्य अग्रेसर आहे.
देश आणि राज्य झपाट्याने विकसित होत आहे. राज्याची अर्थव्यवस्था अधिक भक्कम करण्यासाठी रोड मॅप तयार करण्यात आला आहे. स्पीड ऑफ डेटा आणि स्पीड ऑफ ट्रॅव्हल यापुढील काळात महत्त्चाचे ठरणार असून या दोन्ही क्षेत्रात महाराष्ट्र अग्रेसर आहे. तसेच स्टार्ट अप आणि युनिकॉर्न मध्येही महाराष्ट्र अग्रेसर आहे. ग्रीन हायड्रोजन पॉलिसी, सौर कृषी वाहिनी यासारखे नाविन्यपूर्ण प्रकल्प व धोरणे राज्यात राबविण्यात येत आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक पद्धतीवर सुरू असून चार्जिंग सुविधाही उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
जर्मन व्हाईस चान्सलर डॉ. रॉबर्ट हॅबेक म्हणाले, उद्योग आणि आर्थिक क्षेत्रासह अनेक क्षेत्रांत सहकार्याच्या मोठ्या संधी आहेत. शैक्षणिक क्षेत्रातही दोन्ही देशांमध्ये मोठ्या प्रमाणात आदानप्रदान होत असल्याचे डॉ. हॅबेक यांनी सांगितले.