सिंधुदुर्गातील आंबा-काजू बागायतदारांना मोठा दिलासा!

आतापर्यंत नुकसानभरपाई मिळालेल्या शेतकऱ्यांची संख्या २८ हजार ३५५

सिंधुदुर्ग:- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा व काजू पिकांच्या नुकसानीपोटी नुकसानभरपाई वितरणाची प्रक्रिया सुरू असून, २८ सप्टेंबर २०२६ अखेर आणखी १ हजार ७४३ आंबा-काजू बागायतदारांच्या बँक खात्यावर ३ कोटी ९४ लाख ८ हजार २५१ रुपये नुकसानभरपाई जमा करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत नुकसानभरपाई मिळालेल्या शेतकऱ्यांची संख्या २८ हजार ३५५ झाली आहे.

३४,९१२ लाभार्थ्यांसाठी ७६ कोटींच्या निधीला मंजुरी

आंबा व काजू पिकांच्या नुकसानीपोटी जिल्ह्यातील ३४ हजार ९१२ लाभार्थी शेतकऱ्यांसाठी एकूण ७६ कोटी ३८ हजार ७८० रुपयांच्या निधीला पोर्टलद्वारे मान्यता देण्यात आली आहे.

यापैकी यापूर्वी २६ हजार ६१२ शेतकऱ्यांच्या खात्यावर ५९ कोटी २३ लाख ४५ हजार ९४५ रुपये जमा करण्यात आले होते. त्यानंतर आणखी १,७४३ शेतकऱ्यांना ३ कोटी ९४ लाख ८ हजार २५१ रुपये मिळाल्याने, आतापर्यंत २८ हजार ३५५ शेतकऱ्यांना एकूण ६३ कोटी १७ लाख ५४ हजार १९६ रुपये नुकसानभरपाई वितरित झाली आहे.

हजारो लाभार्थी अद्याप प्रतीक्षेत

दरम्यान, उर्वरित पात्र लाभार्थ्यांच्या नुकसानभरपाई वितरणाची प्रक्रिया सुरू आहे. अद्ययावत माहितीनुसार—

२,४१७ शेतकऱ्यांची सुमारे ३ कोटी ८६ लाख रुपये रक्कम पेमेंटसाठी प्रलंबित आहे.
१,५६२ शेतकऱ्यांचे सुमारे ३ कोटी ७६ लाख रुपये पेमेंट रिजेक्ट झाले असून, संबंधित प्रकरणांत दुरुस्तीची प्रक्रिया सुरू आहे.
२,५७८ शेतकऱ्यांची नुकसानभरपाई ई-केवायसी प्रलंबित असल्यामुळे वितरित झालेली नाही.
ई-केवायसी आणि आधार-बँक संलग्नता आवश्यक

नुकसानभरपाईची रक्कम थेट बँक खात्यावर जमा होण्यासाठी संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण करणे तसेच बँक खाते आणि आधार संलग्नतेची आवश्यक पूर्तता करणे गरजेचे आहे.

ज्या लाभार्थ्यांची रक्कम अद्याप प्रलंबित आहे, त्यांनी संबंधित तहसील कार्यालय, तलाठी कार्यालय किंवा जवळच्या महा-ई-सेवा केंद्रामार्फत आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी, असे जिल्हा प्रशासनाने आवाहन केले आहे.

error: Content is protected !!