असलदे गावात प्रदुषणकारी क्रेशर नकोच! ग्रामस्थांचे राज्यकर्त्यांना व प्रशासनाला निवेदन!
कणकवली (प्रतिनिधी):- तालुक्यातील `असलदे गावात प्रदूषण निर्माण करणाऱ्या काळा दगडाच्या खाणींना व क्रेशरला परवानगी देण्यात येऊ नये!’ असा ग्रामसभेत ठराव झालेला आहे. ह्या ठरावानुसार गावात कोणालाही अशा खाणीसाठी व क्रेशरला परवानगी देण्यात येऊ नये व ग्रामसभेत झालेल्या सदर ठरावाची अंमलबजावणी करण्यात यावी; अशी मागणी असलदे ग्रामस्थांच्यावतीने महाराष्ट्र शासनाला करण्यात आली आहे.
असलदे गावातील ग्रामस्थांनी ह्या संदर्भातील निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री नितेश राणे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम, सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी, कणकवलीचे प्रांताधिकारी, तहसीलदार आणि असलदे ग्रामपंचायतीला दिले.
असलदे गावातील ग्रामस्थांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, असलदे गाव हा निसर्ग संपन्न असून त्यामुळे गावात मोठ्या प्रमाणात काजू लागवड झालेली आहे आणि त्यातून लाखो रुपयांचे उत्पन्न शेतकरी घेत आहेत. गावात प्रदूषण होत नसल्याने प्रदूषणाने होणारे गंभीर दुष्परिणाम ग्रामस्थांच्या आरोग्यावर, गुराढोरांवर, पशु पक्षांवर तसेच काजूच्या झाडावर होत नाही. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत नाही. यासंदर्भात गावातील ग्रामस्थांनी सावधगिरीची भूमिका घेऊन ग्रामसभेच्या माध्यमातून आपले म्हणणे अधोरेखित केलेले आहे.
असलदे गावातील ग्रामस्थांनी १९ डिसेंबर २०१७ रोजी झालेल्या ग्रामसभेमध्ये काळा दगडाच्या खाणीला व क्रेशरला प्रखर विरोध करून स्टोन क्रेशरला परवानगी नाकारली आणि तसा ठराव केला. त्याचप्रमाणे २०१७ पूर्वीही गावात क्रेशर असता कामा नये, असा ग्रामसभेत ठराव मंजूर केला होता. तसेच २७ डिसेंबर २०२४ रोजी झालेल्या ग्रामसभेत क्रेशर गावात सुरू झाल्यास कोणते दुष्परिणाम होऊ शकतात, याबाबत चर्चा झाली आणि पुन्हा एकदा असलदे गावातील ग्रामस्थांनी गावात क्रेशर उभारणीस ग्रामपंचायतीने अजिबात मंजुरी देऊ नये म्हणून ठराव केला.
त्यामुळे ग्रामसभेत झालेल्या ठरावाची अंमलबजावणी करून गावात कोणत्याही प्रकारे स्टोन क्रेशरला परवानगी देण्यात येऊ नये; अशी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना देवेंद्र लोके, श्यामसुंदर हडकर, सचिन लोके, सुरेश मिस्त्री, दिलीप डामरे, विजय डामरे, अविराज वरक, योगेश डामरे, अनिल नरे, लक्ष्मण लोके, सचिन हरमलकर, अनिल गंगाराम लोके, संजय जेठे, दया डगरे, मनोज मोहन लोके, सदाशिव घाडीगावकर, अनिल रामचंद्र लोके, राजू जेठे, रामचंद्र जेठे, आणि अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.
…….
हेही वाचा! (इथे क्लिक करा!)
ह्यासंदर्भात ५ जानेवारी २०२५ रोजी प्रसिद्ध झालेला संपादकीय लेख…