संपादकीय… मृत्यूवर मात करणारे अवयवदान!
एका आईच्या निर्णयाने सात जणांना मिळाले आयुष्य!
समाजाने ‘माझ्यानंतरही मी जगावे’ या विचाराला स्वीकारण्याची गरज!
मृत्यू जीवनाचे अंतिम सत्य आहे. आपल्या जीवलग व्यक्तीच्या मृत्यूचे दुःख शब्दांत व्यक्त करणे अशक्य असते. विशेषतः आपल्या तरुण मुलाला गमावण्याची वेळ एखाद्या आई-वडिलांवर आली, तर तो आघात किती असह्य असेल, याची कल्पनाही करवत नाही. मात्र अशाच असह्य दुःखाच्या क्षणी मुंबईतील एका आईने घेतलेला निर्णय केवळ प्रेरणादायी नाही, तर समाजाला माणुसकीचा खरा अर्थ समजावून सांगणारा आहे. आपल्या १८ वर्षीय मुलाच्या निधनाचे असह्य दुःख पचवत एका आईने घेतलेल्या अवयवदानाच्या निर्णयामुळे सातजणांना नवजीवन आणि दृष्टी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
`द टाइम्स ऑफ इंडिया’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, केईएम रुग्णालयातील ऑक्युपेशनल थेरपीच्या प्राध्यापक डॉ. करुणा नाडकर्णी यांचा १८ वर्षीय मुलगा सौमिलवर रस्ते अपघातानंतर तब्बल तीन वर्षे उपचार सुरू होते. गोरेगाव-मुलुंड लिंक रोडवर झालेल्या अपघातात त्याला गंभीर मेंदूची दुखापत झाली होती. त्या वेळी तो इयत्ता अकरावीत शिकत होता आणि अभियंता होण्याचे स्वप्न पाहत होता. गंभीर मेंदूच्या दुखापतीनंतर त्याला वाचविण्यासाठी वैद्यकीय पातळीवर अनेक प्रयत्न झाले. अखेर त्याला मेंदू मृत घोषित करण्यात आले. त्या क्षणी डॉ. नाडकर्णी यांनी आपल्या मुलाचे हृदय, यकृत, मूत्रपिंड आणि कॉर्निया दान करण्याचा निर्णय घेतला. त्याच्या अवयवांमुळे सात जणांना जीवन व दृष्टी मिळण्याची संधी निर्माण झाली.
अपघातानंतर सौमिलवर अनेक शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्याच्या कवटीच्या खराब झालेल्या भागाची पुनर्बांधणी करण्यासाठी क्रॅनिओप्लास्टी प्लेट बसवण्यात आली होती. यावर्षी त्याला मेंदूचा संसर्ग झाल्यानंतर ही प्लेट काढावी लागली. सुमारे तीन महिने प्रतिजैविक उपचार घेतल्यानंतर गेल्या आठवड्यात त्याच्यावर पुन्हा शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र शस्त्रक्रियेनंतर निर्माण झालेल्या गंभीर गुंतागुंतीमुळे त्याच्या मेंदूच्या स्टेमला मोठी इजा झाली आणि अखेर त्याला मेंदूमृत (brain-dead) घोषित करण्यात आले.
ही केवळ अवयवदानाची घटना नाही; ही दुःखाचे समाजोपयोगी शक्तीत रूपांतर करण्याची घटना आहे. ‘तो गेला’ एवढ्यावर कथा संपत नाही! एखाद्या व्यक्तीचे हृदय दुसऱ्याच्या शरीरात धडधडत असेल, एखाद्याच्या डोळ्यांना पुन्हा प्रकाश मिळत असेल, एखाद्याचे जीवन एखाद्या दान केलेल्या अवयवामुळे वाचत असेल, तर मृत्यूने जीवन संपवले असे म्हणायचे कसे? शरीराचा अंत झाला; पण त्या व्यक्तीच्या अस्तित्वाचा काही भाग दुसऱ्याच्या आयुष्यात पुढे चालू राहतो. म्हणूनच अवयवदानाकडे केवळ वैद्यकीय प्रक्रिया म्हणून न पाहता मानवी जीवनाच्या परस्परावलंबित्वाची सर्वोच्च अभिव्यक्ती म्हणून पाहण्याची गरज आहे.
अंधश्रद्धेपेक्षा वैज्ञानिक विचार आवश्यक!
अवयवदानाबाबत आजही समाजात अनेक गैरसमज आहेत. मृत्यूनंतर शरीराची विटंबना होईल, धार्मिक विधींमध्ये अडचणी येतील, शरीर अपूर्ण राहील, अवयव काढल्यामुळे मृत व्यक्तीला त्रास होईल; अशा अनेक समजुती काही ठिकाणी आढळतात. परंतु मेंदू मृत्यू आणि अवयवदानाची वैद्यकीय प्रक्रिया ही निश्चित वैद्यकीय निकषांवर आधारित असते. त्यामुळे या विषयावर अफवा, भीती आणि गैरसमज याऐवजी वैज्ञानिक माहिती समाजापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे.
भारतासमोर मोठे आव्हान!
अवयव प्रत्यारोपणामुळे अनेक गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांना नवजीवनाची संधी मिळू शकते. परंतु त्यासाठी उपलब्ध होणाऱ्या दात्यांची संख्या महत्त्वाची आहे.
एका मृत व्यक्तीच्या अवयवांमुळे अनेक व्यक्तींना जीवनाची संधी मिळू शकते, ही जाणीव प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचली पाहिजे. शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, स्वयंसेवी संस्था, धार्मिक-सामाजिक संस्था आणि प्रसारमाध्यमांनी अवयवदानाबाबत वैज्ञानिक, कायदेशीर आणि मानवी दृष्टिकोनातून जनजागृती करण्याची गरज आहे.
एका मातेने समाजाला दिलेला संदेश!
आपल्या मुलाच्या मृत्यूचे दुःख बाजूला ठेवून “त्याच्या अवयवांमुळे इतरांचे जीवन वाचू शकते” असा विचार करणे सोपे नाही. हा निर्णय घेण्यासाठी विलक्षण मानसिक ताकद लागते. मातेसाठी आपलं मुल हे सर्वस्व असतं. आपलं मुल मोठं व्हावं, खूप खूप शिकावं, त्यानं जगात नाव मिळवावं; अशा आशेवर आईबाबा आपलं जीवन जगत असतात. आपली कर्तव्य पार पाडीत असतात. पण अचानक कोणत्या ना कोणत्या कारणाने जेव्हा मुलाचं निधन होतं तेव्हा त्या आईबापावर दुःखाचा पर्वत कोसळतो. अशा कठीण काळात एका मातेने घेतलेला निर्णय मातृत्वाची खरीखुरी ओळख निर्माण करतो.
डॉ. नाडकर्णी यांच्या निर्णयाकडे केवळ एका कुटुंबाची संवेदनशीलता म्हणून पाहून थांबता कामा नये. हा समाजाने आत्मपरीक्षण करण्याचा क्षण आहे. आपण जिवंत असताना रक्तदान करू शकतो; मृत्यूनंतर अवयवदानाचा संकल्प करू शकतो. आपल्या आयुष्याचा शेवट इतर कोणाच्या आयुष्याची सुरुवात ठरू शकतो. मृत्यू अटळ आहे. पण मृत्यूनंतरही कोणाच्या हृदयाची धडधड, कोणाच्या डोळ्यांतील प्रकाश किंवा कोणाच्या शरीरातील एखादा अवयव आपल्या अस्तित्वाची आठवण पुढे घेऊन जाऊ शकतो. म्हणूनच प्रश्न एवढाच नाही की “आपण किती वर्षे जगलो?” खरा प्रश्न असा आहे, “आपल्या जाण्यानंतरही आपण किती जणांना जगण्याची संधी देऊन गेलो?” सौमिलचे आयुष्य अपघातामुळे अकाली थांबले; पण त्याच्या अवयवदानामुळे सात जणांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण झाला. एका कुटुंबाच्या दुःखातून सात कुटुंबांच्या जीवनात आनंद निर्माण झाला! ह्यापेक्षा मोठी मानवसेवा कोणती?
मुलाच्या निधनाच्या दुःखातही अवयवदानाचा निर्णय घेण्यामागील भावना व्यक्त करताना डॉ. नाडकर्णी यांनी सांगितले, “तो आमच्यासाठी अमूल्य होता; त्याचे अवयव सात जणांपर्यंत पोहोचले. सात जणांना जीवन मिळाले. मुलाचा काही अंश अजूनही जीवंत असल्याची भावना आमच्यासाठी आधार देणारी आहे. सौमिल हा अनेक शस्त्रक्रियेनंतरही हसणारा आणि संघर्ष करणारा मुलगा होता!”
अवयवदान हा मृत्यूचा शेवट नसून, दुसऱ्याच्या जीवनाची नवी सुरुवात आहे. त्यामुळे सौमिलला `भावपूर्ण श्रद्धांजली’ म्हणून पूर्णविराम देता येणार नाही; तर त्या मातेला, त्या मातेच्या मातृत्वाला युगानुयुगे शतशः दंडवत घालावे लागतील!











