मुंबई उच्च न्यायालयाच्या GSICC समितीत ॲड. निर्मला सामंत- प्रभावळकर यांची निवड!
मुंबई (मोहन सावंत):- मुंबई उच्च न्यायालयाने न्यायाधीश भारती डांग्रे यांच्या अध्येक्षतेखाली `जेंडर सेंसिटाइजेशन आणि इंटरनल कंप्लेअंट्स कमिटी (GSICC)’ ची पुनर्निर्मिती केली असून त्या कमिटीमध्ये सदस्य म्हणून महाराष्ट्रातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, ज्येष्ठ कायदे तज्ञ, मुंबईच्या पहिल्या महिला महापौर, महाराष्ट्राच्या राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा, राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या अध्यक्षा ॲड. निर्मला सामंत- प्रभावळकर यांची निवड केली आहे.
ॲड. निर्मला सामंत- प्रभावळकर ह्या मुंबईच्या पहिल्या महिला महापौर झाल्या. मुंबईतील नागरी प्रश्नांवर त्यांनी केलेले कार्य लक्षणीय ठरले. त्यानंतर दादरच्या सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदी आल्यानंतर त्यांनी तेथील प्रशासनाला गतिमान केले. तर महाराष्ट्राच्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी त्यांनी राज्यातील महिलांच्या समस्यांवर लक्षणीय कार्य केले. राष्ट्रीय महिला आयोगात आणि विविध सामाजिक संस्थांमध्ये काम करताना त्यांनी जेष्ठ नागरिक, महिला, लहान मुले व दुर्लक्षित घटक यांच्या प्रश्नावर विधायक कार्य केले आहे. आजही त्या कार्यरत आहेत. ॲड. निर्मला सामंत- प्रभावळकर यांनी कायदा महाविद्यालयात अनेक वर्षे प्राध्यापक म्हणून काम केले असून महाराष्ट्रात त्या नामवंत कायदेतज्ञ म्हणून ओळखल्या जातात. विशेष म्हणजे त्या सिंधदुर्गाच्या कन्या आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने ॲड. निर्मला सामंत- प्रभावळकर यांची केलेली निवड अभिनंदनास्पद आहे.
जेंडर सेंसिटाइजेशन आणि इंटरनल कंप्लेअंट्स कमिटी (GSICC) न्यायालयात काम करणाऱ्या महिलांना सुरक्षित आणि समतावादी वातावरण प्रदान करण्यासाठी क्रियाशील राहणार आहे. ३० जानेवारी २०२६ रोजी महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार- क मध्ये सदर नोटिफिकेश प्रसिद्ध करण्यात आले आहे.











