संपादकीय… बांधव भगिनींनो क्षा. म. समाज संस्था वाचवा हो!
समाज माझा, मी समाजाचा!
लेखांक ३६ वा – बांधव भगिनींनो क्षा. म. समाज संस्था वाचवा हो!
सर्वपित्री अमावस्या ९ ऑक्टोबरला रात्री ९.३८ वाजता सुरू झाली आणि क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संस्थेच्या नशिबी पुन्हा एकदा अमावस्येचा उदय झाला!
ह्यासंदर्भात संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित समाज बांधव- भगिनींना खालील माहिती दिली ती अशी;
स्वप्निक सुभाष फाटकने २५-३० खाजगी बॉडीगार्ड, बॉक्सर व १५-२० आडदांड वृत्तीच्या व काही सुटाबुटातल्या व्यक्ती आणून सुरक्षा रक्षकांना धमकावत परळ, मुंबई येथील क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संस्थेच्या व डॉ. शिरोडकर हायस्कूलच्या पाच प्रवेशद्वारावरील तसेच कार्यालयाची व मुख्याध्यापकाच्या केबिनची कुलपं कटरने तोडली व त्या जागी आपली कुलपं लावली. बेकायदेशीरपणे कार्यालयाचा ताबा घेतला. सीसीटीव्ही कॅमेरा यंत्रणा बंद केली, डीव्हीआर लंपास केला. विश्वस्त समिती, सुकाणू समिती आणि पदाधिकारी यांच्या नामावलीच्या पाट्या काढून त्या जागी आपल्या नावाची पाटी लावली.
त्यानंतर पदाधिकाऱ्यांनी भोईवाडा पोलीस स्टेशनला कळविले. तेथील पोलिसांनी येऊन मुख्य प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून स्वप्निक फाटकसह त्याच्याबरोबर आलेल्या लोकांना पोलीस स्टेशनला घेऊन गेले; तर काहीजण पळून गेले.
१० ऑक्टोबरला विश्वस्त-पदाधिकारी भोईवाडा पोलीस स्टेशनला स्वप्निक फाटकच्या विरोधात तक्रार करायला गेले असता पोलिसांनी त्यांचे तोंडी जबाब घेण्यापलीकडे कोणतीही कारवाई केली नाही. १० ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री सोशल मीडियाच्या माध्यमातून संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी खालील आवाहन केले आहे.
|
सर्व क्षा. म. समाज बांधव भगिनींना अत्यंत तातडीचे आवाहन क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संस्थेच्या मुख्य कार्यालयात काल रात्री १० वाजताच्या सुमारास स्वप्निक फाटक यांने सुरक्षा रक्षकांना धमकी देत, मारहाण करीत अनधिकृतपणे प्रवेश केला आणि गेटची व कार्यालयाची कुलपं कटरने तोडून आपली कुलपं लावली आहेत. त्याचप्रमाणे विश्वस्त, सुकाणू आणि कार्यकारणी सदस्यांच्या यादीचा फलक काढून वरील स्वघोषित नाम फलक कायमस्वरूपी लावला आहे. यासंदर्भात स्वप्निक फाटक याच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी विश्वस्त, पदाधिकारी, समाज बांधव आज सकाळी भोईवाडा पोलीस स्टेशनला गेले असता पोलिसांनी फक्त जबाब नोंदवून घेण्यापलीकडे कोणतीही कारवाई केली नाही. पोलिसांनी स्वप्निक फाटकवर गुन्हा दाखल करण्यासाठी आपण क्षा. म. समाज बांधव भगिनींनी उद्या सकाळी १० वाजता भोईवाडा पोलीस स्टेशनला उपस्थित राहायचे आहे. समाज संस्थेवरील आलेले संकट एकजुटीने दूर करण्यासाठी आपण उद्या सकाळी उपस्थित राहणे, महत्त्वाचे आहे! आपले नम्र क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज विश्वस्त सुकाणू पदाधिकारी |
माझ्या समाज बांधव भगिनींनो,
या सर्व घटनांमधून एकच गोष्ट लक्षात येते की स्वप्निकने क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संस्थेवर ताबा मिळविला किंवा तसा प्रयत्न केला आहे. हा विश्वस्तांचा मागील १४ वर्षांचा नाकर्तेपणा आहेच; शिवाय स्वप्निक फाटकची संस्था ताब्यात घेण्याची राक्षसी महत्त्वाकांक्षा आहे!
क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज शिक्षण संस्थेच्या सर्व आजी माजी विद्यार्थी, आजी माजी शिक्षक, आजी माजी कर्मचारीवर्ग आणि संस्थेचे हितचिंतक यांनी आजच संघटितपणे लढा देण्याची गरज निर्माण झाली आहे. आज संस्था वाचविण्यासाठी जर संपूर्ण देशातील समाज बांधव भगिनी उभे राहिले नाहीत, एकजूट दाखविली नाही; तर समाज संस्था ताब्यातून निघून जाईल; हे प्रत्येकाने लक्षात ठेवावे!
-नरेंद्र राजाराम हडकर (पत्रकार)
(क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संस्थेच्या कारभाराबाबत २०१७ पासून लिहिलेले ३५ लेख व इतर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा! )











