संपादकीय- मोबाईल; साधन की आयुष्यावरचा ताबा?
एका कुटुंबाचा दुर्दैवी अंत आणि त्यातून उभे राहिलेले गंभीर प्रश्न!
छत्रपती संभाजीनगरातील तिसगाव शिवारातील खवड्या डोंगरावर घडलेली हृदयद्रावक घटना केवळ एका कुटुंबाच्या दुर्दैवाची कहाणी नाही; ती आजच्या बदलत्या कौटुंबिक आणि सामाजिक जीवनशैलीचे धोकादायक वास्तव समोर आणणारी आहे. १९ वर्षीय तरुणाचा वडिलांसोबत वाद झाला. त्यानंतर तो आत्महत्येच्या विचाराने डोंगराच्या कड्यावर गेला. त्याला रोखण्यासाठी वडील धावत गेले; मात्र काही क्षणांत दोघेही कड्यावरून कोसळले. मुलगा आणि पती कोसळताच आईनेही कड्यावरून उडी मारली. काही क्षणांत एका कुटुंबातील तिघांचे जीवन उद्ध्वस्त झाले.
या घटनेकडे केवळ `आत्महत्येची घटना’ म्हणून पाहणे पुरेसे नाही. एका तरुणाच्या मनात इतकी अस्वस्थता निर्माण का झाली? पालक आणि मुलामधील संवाद कुठे कमी पडला? मोबाईल, सोशल मीडिया, ऑनलाइन जग आणि त्यातून निर्माण होणारे वाद आपल्या घरातील नातेसंबंधांवर किती परिणाम करत आहेत? आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आपण आपल्या मुलांच्या हातात मोबाईल दिला; पण त्याचबरोबर मोबाईल वापरण्याचे संस्कार, मानसिक शिस्त आणि डिजिटल जबाबदारी दिली का? हा प्रश्न महत्वाचा आहे. ह्या प्रश्नापासून पळून जाणे शक्य नाही.
मोबाईल आवश्यक; पण त्याचे व्यसन धोकादायक!
मोबाईल हा आधुनिक जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. शिक्षण, व्यवसाय, बँकिंग, संवाद, माहिती, मनोरंजन, आपत्कालीन मदत; सगळे काही मोबाईलवर आले आहे. त्यामुळे ‘मोबाईल पूर्णपणे बंद करा’ हा व्यवहार्य उपाय नाही. प्रश्न मोबाईलचा नाही; मोबाईल आपल्या आयुष्यावर किती नियंत्रण ठेवतो, हा आहे. आज अनेक मुलांच्या दिवसाची सुरुवात मोबाईलपासून आणि शेवटही मोबाईलवरच होतो. अभ्यासाच्या नावाखाली इंटरनेट, थोड्या वेळाच्या मनोरंजनाच्या नावाखाली सोशल मीडिया, मित्रांशी संवादाच्या नावाखाली सतत चॅटिंग आणि रिकाम्या वेळेत सतत व्हिडिओ पाहणे; हळूहळू ही सवय व्यसनाचे रूप घेते. मोबाईल बाजूला ठेवला की अस्वस्थ वाटणे, वारंवार स्क्रीन तपासणे, नोटिफिकेशनची प्रतीक्षा करणे, रात्री उशिरापर्यंत जागणे, अभ्यासात लक्ष न लागणे, प्रत्यक्ष संवाद कमी होणे आणि मोबाईल वापरावर पालकांनी मर्यादा घातल्यास चिडचिड किंवा आक्रमक प्रतिक्रिया देणे; हे गंभीर संकेत आहेत.
आजचा विरोधाभास पाहा; मुलांच्या मोबाईलमध्ये शेकडो मित्र असतात; पण मन मोकळे करून बोलण्यासाठी एकही व्यक्ती नसते. सोशल मीडियावर शेकडो `फॉलोअर्स’ असतात; पण प्रत्यक्ष आयुष्यात भावनिक आधार देणारा मित्र किंवा कुटुंबातील सदस्य दूर गेलेला असतो. इतरांचे यश, पैसा, सौंदर्य, प्रवास, महागड्या वस्तू, प्रेमसंबंध आणि आभासी `परफेक्ट’ आयुष्य पाहताना अनेक तरुण नकळत स्वतःची तुलना इतरांशी करू लागतात. त्यातून न्यूनगंड, असमाधान, असुरक्षितता आणि नैराश्य वाढू शकते. ऑनलाइन जग वास्तव नसते; परंतु ते पाहणाऱ्या तरुणाच्या मनावर त्याचा परिणाम मात्र वास्तव असतो. पूर्वी घरात संध्याकाळची वेळ म्हणजे कुटुंबातील संवादाची वेळ होती. आज अनेक घरांमध्ये प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र स्क्रीनमध्ये गुंतलेली दिसते. वडील मोबाईलवर, आई मोबाईलवर आणि मुलगा-मुलगी त्यांच्या स्वतंत्र स्क्रीनवर! एकाच घरात राहूनही कुटुंबातील सदस्य एकमेकांशी बोलत नाहीत. मुलांच्या मनात काय सुरू आहे, त्यांच्या मित्रमंडळी कोण आहेत, त्यांना कोणत्या गोष्टींचा ताण आहे, सोशल मीडियावर त्यांच्यासोबत काय घडते, त्यांना कोण त्रास देत आहे? हे पालकांना कळतच नाही आणि जेव्हा एखादी गंभीर समस्या समोर येते, तेव्हा पालकांना जाणवते की, `आपण आपल्या मुलाशी शेवटचे मनापासून कधी बोललो होतो?’ हा प्रश्न प्रत्येक आई-वडिलांनी स्वतःला विचारण्याची वेळ आली आहे. मुलगा किंवा मुलगी सतत मोबाईल वापरत असेल तर अनेक पालकांचा पहिला उपाय असतो; `मोबाईल बाजूला ठेव!’ परंतु केवळ मोबाईल हिसकावून घेणे हा कायमस्वरूपी उपाय नाही. मुलाला मोबाईलपासून दूर करायचे असेल तर त्याला मोबाईलपेक्षा चांगला पर्याय द्यावा लागेल. मैदानी खेळ, वाचन, संगीत, कला, व्यायाम, मित्रांशी प्रत्यक्ष भेट, कुटुंबासोबत सहल, घरातील जबाबदाऱ्या, छंद आणि सामाजिक उपक्रम यामुळे मुलाचे जग स्क्रीनच्या बाहेरही मोठे आहे, हे त्याला जाणवेल. पालकांनी `तू मोबाईल का वापरतोस?’ असे विचारण्यापेक्षा `तुला मोबाईलवर काय आवडते?’ असे विचारले पाहिजे. आदेशापेक्षा संवाद महत्त्वाचा आहे.
तरुणांनीही स्वतःवर डिजिटल शिस्त लावली पाहिजे. स्वातंत्र्य म्हणजे मनाला येईल तसे वागणे नव्हे. स्वातंत्र्याबरोबर जबाबदारीही येते. मोबाईल वापरण्याची जबाबदारी तरुणांनी स्वतः स्वीकारली पाहिजे. काही साधे नियम जीवनशैलीचा भाग बनवता येतील; झोपण्याच्या किमान एक तास आधी मोबाईल बाजूला ठेवणे, जेवताना मोबाईल न वापरणे, अभ्यासाच्या वेळी अनावश्यक नोटिफिकेशन बंद ठेवणे, सकाळी उठल्यानंतर लगेच सोशल मीडिया न पाहणे, दिवसातील ठराविक वेळच मनोरंजनासाठी वापरणे, आठवड्यात काही काळ `डिजिटल डिटॉक्स’ करणे, मैदानी खेळ आणि व्यायामाला वेळ देणे, प्रत्यक्ष मित्र, कुटुंब आणि समाजाशी संवाद वाढवणे गरजेचे आहे.
सोशल मीडियावरील प्रत्येक गोष्ट सत्य मानू नये. ऑनलाइन अपमान, धमकी, ब्लॅकमेल किंवा छळ होत असल्यास गप्प बसू नये; विश्वासू व्यक्तीची मदत घ्यावी. मोबाईलवरून होणारे वाद कधी कधी गंभीर रूप घेतात. मोबाईल कोणाला किती वेळ द्यायचा, कोणते ॲप वापरायचे, कोणाशी बोलायचे, सोशल मीडियावर काय पोस्ट करायचे, गेम किती खेळायचा… ह्या छोट्या वाटणाऱ्या गोष्टींवरून पालक आणि मुलांमध्ये सतत संघर्ष होऊ शकतो. पण या वादामागे अनेकदा मोबाईल हा केवळ निमित्त असतो. मुलाला पालकांकडून समजून घेण्याची गरज असते. पालकांना मुलाच्या सुरक्षिततेची चिंता असते. दोघांचीही भूमिका चुकीची नसते; चुकीची ठरते ती संवादाची पद्धत! `तू काहीच ऐकत नाहीस’, `तुझं काही होणार नाही’, `तुझा मोबाईल फोडून टाकतो’, `तू आमचं नाव खराब करतोस’ अशा शब्दांनी समस्या सुटत नाही. उलट मुलाच्या मनात अपमान, राग आणि एकटेपणाची भावना अधिक तीव्र होऊ शकते!
एखादा मुलगा किंवा तरुण `मला जगायचे नाही’, `सगळं संपवावंसं वाटतं’, `मी कुठेतरी निघून जाईन’, `माझ्यामुळे सगळ्यांना त्रास आहे’ असे बोलत असेल, तर त्याला केवळ भावनिक नाटक समजू नये. त्याला ओरडण्याऐवजी शांतपणे ऐकले पाहिजे. `असं काही करू नकोस’ एवढे सांगून विषय संपवण्याऐवजी त्याच्या मनात नेमके काय चालले आहे? हे समजून घेणे गरजेचे आहे. आवश्यक असल्यास मानसिक आरोग्य तज्ज्ञ, समुपदेशक किंवा विश्वासू व्यावसायिकांची मदत तातडीने घ्यावी. मदत मागणे ही कमजोरी नाही; मदत मागणे म्हणजे स्वतःच्या जीवनाला महत्त्व देणे. मोबाईलच्या वापराचे दुष्परिणाम केवळ पालकांनी मुलांना सांगून भागणार नाही. शाळा आणि महाविद्यालयांनी डिजिटल साक्षरतेसोबत डिजिटल शिस्त आणि मानसिक आरोग्य शिक्षण देणे आवश्यक आहे.
विद्यार्थ्यांना सोशल मीडिया आणि मानसिक आरोग्य, ऑनलाइन फसवणूक आणि सायबर गुन्हे, सायबर बुलिंग, ऑनलाइन ब्लॅकमेलिंग, गेमिंगचे व्यसन, स्क्रीन टाइमचे व्यवस्थापन, सोशल मीडियावरील खोटी माहिती, भावनिक ताण आणि त्याचे व्यवस्थापन, संकटाच्या वेळी मदत कुठे आणि कशी घ्यावी? अशाप्रकारे प्रत्येक शैक्षणिक संस्थेत विद्यार्थ्यांना विश्वासाने बोलता येईल अशी समुपदेशन व्यवस्था असणे ही आजची गरज आहे.
तसेच घरात `मोबाईल नियम’ सर्वांसाठी असावेत. पालकांनी मुलांसाठी नियम बनवायचे आणि स्वतः मात्र सतत मोबाईल वापरायचा, असे चालणार नाही. मुलांना ‘जेवताना मोबाईल वापरू नका’ सांगताना पालकांनीही मोबाईल बाजूला ठेवला पाहिजे. घरात काही सामूहिक नियम करणे आवश्यक आहेत. जेवणाच्या टेबलवर मोबाईल असणार नाही, रात्री ठरावीक वेळेनंतर सर्वांचे मोबाईल एका ठिकाणी असतील, दररोज किमान काही वेळ कुटुंबीयांमध्ये प्रत्यक्ष संवाद असायला पाहिजे. आठवड्यात एक दिवस कुटुंबासाठी स्क्रीन-मुक्त वेळ ठेवायला हवी. हे नियम मुलांसाठीच नव्हे, तर संपूर्ण कुटुंबासाठी असले पाहिजेत.
मोबाईलमुळे आज शिक्षण अधिक सुलभ झाले आहे. ज्ञानाचा महासागर प्रत्येकाच्या हातात आला आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाला दोष देणे योग्य नाही. प्रश्न आहे तो तंत्रज्ञानाच्या वापराचा! चाकू स्वयंपाकासाठी उपयोगी आहे; परंतु त्याचा गैरवापर झाला तर तो धोकादायक ठरतो. त्याचप्रमाणे मोबाईलही ज्ञानाचे साधन आहे आणि व्यसनाचे साधनही बनू शकतो. म्हणून मोबाईल नष्ट करण्याची नव्हे, तर मोबाईलवर नियंत्रण ठेवण्याची संस्कृती निर्माण करण्याची गरज आहे. मुलांना मोबाईल देण्यापूर्वी `खरं जीवन’ द्यावे लागेल. आज पालक मुलांना महागडा मोबाईल देतात; पण त्यांच्यासोबत बसण्यासाठी वेळ देत नाहीत. मोबाईल देताना पासवर्ड, इंटरनेट पॅक आणि नवीन ॲपची माहिती दिली जाते; पण राग आला तर काय करायचे, अपयश आले तर त्याला कसे सामोरे जायचे, प्रेमभंग झाला तर कोणाशी बोलायचे, मित्रांनी नाकारले तर स्वतःला कसे सावरायचे, मानसिक ताण आला तर मदत कशी मागायची? हे शिकवले जात नाही. मुलाला मोबाईल देण्यापेक्षा त्याला जीवन जगण्याची मानसिक ताकद देणे अधिक महत्त्वाचे आहे! त्याला अपयश स्वीकारायला शिकवा. त्याला `नाही’ ऐकायला शिकवा. त्याला संयम शिकवा. त्याला संवाद शिकवा. त्याला स्वतःच्या भावनांना ओळखायला शिकवा आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे कुठलीही समस्या आली तरी `तू आमच्याशी बोलू शकतोस’ हा विश्वास द्या!
खवड्या डोंगरावरील ही घटना एका कुटुंबासाठी आयुष्यभराची शोकांतिका आहे. त्या घटनेमागील नेमकी मानसिक, कौटुंबिक आणि परिस्थितिजन्य कारणे तपासणे आवश्यक आहे; मात्र या घटनेने उपस्थित केलेले प्रश्न प्रत्येक घराशी संबंधित आहेत. आपण मुलांच्या हातातील मोबाईलची स्क्रीन पाहतो; पण त्या स्क्रीनच्या मागे असलेले मुलाचे मन पाहतो का? आपण मुलाच्या अभ्यासाचे गुण पाहतो; पण त्याच्या मनातील ताण पाहतो का? आपण त्याच्या मोबाईलचा पासवर्ड विचारतो; पण त्याच्या मनाचा ‘पासवर्ड’ आपल्याला माहिती आहे का? आज प्रत्येक आई-वडिलांनी हा प्रश्न स्वतःला विचारण्याची गरज आहे.











