सावधान… आज जात्यात आजगाव, उद्या संपूर्ण कोकण?
सत्ताधारी जेव्हा भावनिक मुद्दे पुढे करून तुम्हाला गुंगीत ठेवतात, तेव्हा तुमच्या पायाखालची मातीच सरकवण्याचे डाव रचले जातात. आजगाव-धाकोरात रात्रीच्या अंधारात जे ड्रोन घिरट्या घालत होते, ते याच कारस्थानाचे पुरावे आहेत.
आजगावच्या ग्रामस्थांनी एकजुटीने हा घाला परतवून लावला; पण हा इशारा आहे. विकासाच्या गोंडस नावाखाली जेव्हा सत्ताधारी तुमच्या घरादारावर नांगर फिरवायला निघतात, तेव्हा स्थानिकांसमोर संघर्षाशिवाय दुसरा पर्यायच उरत नाही.
लक्षात ठेवा; आज जात्यात आजगाव पंचक्रोशी आहे आणि अख्खं कोकण सुपात आहे. जात्यातून सुपात जायला वेळ लागत नाही. आज हे संकट आजगाववर आलंय, उद्या ते तुमच्या दारात उभं राहील. कोण सांगेल?
म्हणून आज आजगाववासीयांच्या पाठीशी प्रत्येक कोकणवासीयाने खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. ही वेळ आहे ठाम भूमिका घेण्याची. ही वेळ आहे विचारण्याची; -आमच्या नकळत आमच्या मातीचा सौदा करणारे तुम्ही कोण?
एकदा उध्वस्त झालेला निसर्ग पुन्हा उभा राहत नाही. एकदा का डोंगर पोखरले, एकदा का झरे आटले, एकदा का हवा विषारी झाली, तर हे वैभव पुन्हा कमावता येत नाही. पुढच्या पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत. त्या विचारतील, “तुम्ही लढलात की गप्प बसलात?”
आणि राजकारणी? ते इथे राहणार नाहीत. आज शहरात, उद्या विदेशात स्थायिक होतील. या मातीशी त्यांचं नातं नाही. त्यांच्यासाठी फक्त आर्थिक व्यवहार महत्वाचे आहेत. करोडोंचे आकडे त्यांना दिसतात, पण तहानलेल्या लेकराचा टाहो ऐकू येत नाही.
म्हणून कोकणवासीयांनो, जागे व्हा!
आपलं कोकण आपल्यालाच जपायचं आहे. अगदी कोणतीही किंमत मोजायची तयारी ठेवून. कारण ही लढाई फक्त जमिनीची नाही. ही लढाई अस्तित्वाची आहे. ही लढाई श्वासाची आहे. ही लढाई पुढच्या पिढीच्या हक्काची आहे.
आजगावने वाट दाखवली आहे. एकजुटीने उभे राहिलो तर कोणतेही कारस्थान उधळून लावता येते. आता संपूर्ण कोकणाने एक होण्याची वेळ आली आहे.
कारण उद्या उशीर झाला, तर फक्त पश्चाताप उरेल आणि माती… माती तर कायमची मुक होईल.











