कोरोनाने मरण सुद्धा महाग झालंय हो!

रेशनवर ५ किलो धान्य मोफत आणि अंत्यविधीसाठी १५ हजार रुपये!

कोरोनाची महामारी आल्यानंतर आजपर्यंतची उभी राहिलेली यंत्रणा किती कुचकामी होती, ती आपल्या सर्वांच्या लक्षात आली. एक रुग्णवाहिकेचा मालक कसा रुग्णांना लुबाडतोय? त्याच्या अनेक कथा समोर येऊ लागल्या. सिधुदुर्गात आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी कोणीच पुढाकार घेतला नाही. आवश्यक असणारे डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय, तज्ञ वैद्यकीय कर्मचारी, साफसफाई करणारे कर्मचारी, पॅरामेडिकल स्टाफ यांच्या जागा नेहमीच रिक्त असूनही कधीही त्यासाठी सत्ताधाऱ्यांनी अनुकूल भूमिका घेतली नाही. त्याचेच गंभीर परिणाम आता आपल्या समोर येत आहेत. आज मरण सुद्धा महाग झालंय हो! तरीही त्यासाठी आमचे राज्यकर्ते आणि राजकीय पुढारी पुढाकार घेत नाहीत; याचेच दुःख वाटतेय…

जिल्ह्यात कोणी कोरोना महामारीने दगावल्यास त्या मृतदेहाचे अंत्यविधी करण्यासाठी कुटुंबियांना पंधरा हजार रुपये द्यावे लागतात. कष्टकरी गरीब जनतेने पंधरा हजार रुपये आणायचे कुठून? ज्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती जेमतेम आहे त्यांच्यासाठीसुद्धा आजच्या आर्थिक पडझडीच्या काळात आपल्या प्राणप्रिय व्यक्तीच्या मृतदेहावर अंत्यविधी करण्यासाठी पंधरा हजार रुपये देणे अशक्य आहे; तरीही हे पंधरा हजार रुपये दिल्याशिवाय मृतदेहावर अंत्यविधी होत नाही, हे संतापजनक आहे. कोरोनाबाधित मृतदेहावर अंत्यविधी करण्याची जबाबदारी प्रशासनाने झटकू नये. खरं म्हणजे गेल्या वर्षभरात अशा अनेक गोष्टींचे नियोजन व्हायला हवे होते, ते सिंधुदुर्गात झाले नाही.

देशात, राज्यात गरीब माणसावर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून रेशनवर मोफत पाच किलो धान्य देणारे सरकार मृतदेहावर अंत्यविधी करण्यासाठी यंत्रणा का उभी करू शकत नाही? हा जनतेचा प्रश्न आहे, नव्हे आक्रोश आहे. महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आणि सिंधुदुर्गातील सर्व राजकीय पुढारी यांना आमचे नम्र आहे; कोरोनाबाधित मृतदेहाच्या अंत्यविधीची जबाबदारी घ्या! मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना जो मानसिक, आर्थिक त्रास होतोय; त्याच्यातून सुटका करा! किमान एवढी तरी अपेक्षा पूर्ण करा!

-संतोष नाईक