संपादकीय- देशाला गौरवास्पद असणाऱ्या आदर्श शिक्षकाचा सन्मान!

व्हीजेटीआयचे प्रा. डॉ. केशव सांगळे यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान!

वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्थेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा!

शालेय, उच्च व कौशल्य शिक्षण अधिक सुलभ आणि गुणात्मक होण्यासाठी माहिती व तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणाऱ्या महाराष्ट्रातील पाच शिक्षकांना आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये व्हीजेटीआयचे प्रा. डॉ. केशव सांगळे यांचा समावेश असून त्यांना मिळालेल्या पुरस्काराने वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्थेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. देशाला गौरवास्पद असणाऱ्या आदर्श शिक्षकाचा खऱ्या अर्थाने हा सन्मान आहे. 

प्रा. डॉ. केशव सांगळे यांना उच्चशिक्षणातील स्थापत्य अभियांत्रिकीमधील शैक्षणिक योगदान, संशोधन, शोधनिबंध, विद्यार्थी मार्गदर्शन, शैक्षणिक प्रशासन, पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी संस्था, राज्य व राष्ट्रीयस्तरावर केलेली मदत, राज्य व देशातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या सक्षम केल्याबद्दल सन २०२३ या वर्षाचा उच्च शिक्षण विभागात राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

प्रा. डॉ. केशव सांगळे हे सध्या वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथे संरचना अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक व विभागप्रमुख आणि संस्थेचे शैक्षणिक अधिष्ठाता या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदविका शासकीय तंत्रनिकेतन पुणे, पदवी व पदव्युतर पदवी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, कराड येथे घेतली. त्यांनतर आयआयटी मुंबईमधून पीएचडी पूर्ण केली आहे.

नामांकित व्हीजेटीआय अभियांत्रिकी महाविद्यालयात दोन दशकापेक्षा अधिक अध्यापन करणाऱ्या प्राध्यापक सांगळे सरांना अध्यापनाचा दीर्घ आणि समृद्ध अनुभव आहे. आपल्या विद्यार्थ्यांना विषयाची सखोल माहिती मिळावी आणि ते त्या विषयात पारंगत व्हावेत म्हणून ते नेहमीच प्रयत्नशील असतात. त्यांचे श्रीगोंदा तालुक्यातील जिल्हा परिषेदेच्या शाळेमधून शालेय शिक्षण पूर्ण झालेले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची मानसिकता ते चांगल्या प्रकारे ओळखू शकतात आणि त्यांना योग्य ते मार्गदर्शन करतात. त्यामुळे ते विद्यार्थ्यांमध्ये प्रिय ठरले आहेत.

प्राध्यापक सांगळे सरांनी विविध प्रकल्पांवर काम केलेले आहे. स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील स्ट्रक्चरल अभियांत्रिकी विषयात ते निष्णांत आहेत. ते विद्यार्थ्यांना इंटर्नशिप घेण्यास प्रोत्साहित करतात. विद्यार्थ्यांना साइट व्हिजिट्सची व्यवस्था करतात. विद्यार्थ्यांना नामांकीत कंपन्यांमध्ये कसे कार्य केले जाते? त्याचे प्रत्यक्ष ज्ञान देण्यावर त्यांचा भर असतो. प्राध्यापक सांगळे सर व्हीजेटीआय वसतिगृहांचे मुख्य रेक्टर देखील आहेत आणि ते विद्यार्थ्यांशी आपलेपणाचे संबंध ठेवतात. अशा आदर्श शिक्षकाला सलाम!

राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने सन्मानित केल्यानंतर त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. त्यांनी दिलेले शैक्षणिक योगदान आदर्शवत असून देशासाठी अभिमानास्पद आहे. त्यांचे पाक्षिक `स्टार वृत्त’ परिवाराकडून मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!

– नरेंद्र हडकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *