सिंधुदुर्गात कोरोनाने होणारे मृत्यू रोखणार कसे? शासन जागे कधी होणार?
सिंधुदुर्गात कोरोनाने 1 हजार 46 जणांचा मृत्यू, तर चिंताजनक 50 रुग्ण!
दररोज जिल्हा माहिती कार्यालयातून आकडेवारी आली की प्रसारमाध्यमांतून प्रसिद्ध होते आणि आम्हाला समजते कोरोना महामारीची सिंधुदुर्गात नेमकी स्थिती काय? एका नमुन्यात दररोज येणाऱ्या आकडेवारीवारीत आजपर्यंत मृत झालेल्या व्यक्तींची संख्या मात्र वाढत जात आहे आणि चिंताजनक रुग्णांची संख्या कमी होत नाही. अशी गंभीर परिस्थिती किती दिवस सुरु राहणार आहे? हा संतापजनक सवाल आता जिल्हावासीय विचारू लागले आहेत.
कोरोना महामारीने होणारे मृत्यू रोखण्यासाठी नेमक्या कोणत्या उपाययोजना करायला हव्यात; ह्यासंदर्भात जिल्हाधिकारी, पालकमंत्री, आरोग्यमंत्री, मुख्यमंत्री यांना सविस्तररित्या लेखी निवेदन देऊनही आणि राजकीय पक्षांनी-सामाजिक संस्थांनी आंदोलन करूनही कोणीच त्याची दखल घेत नाहीत; हे दुर्दैवाने नमूद करावे लागतेय.
कोरोना महामारीने होत असलेले मृत्यू रोखणार कसे? ह्याबाबत प्रशासनही काहीच बोलत नाही. लॉकडाऊन हा पर्याय नाही. तरीही आरोग्य यंत्रणा कुचकामी ठरत असल्याने पुन्हा पुन्हा लॉकडाऊन हा पर्याय स्वीकारून शासन हातावर पोट असलेल्या कष्टकरी, गरीब जनतेची जीवघेणी कोंडी करीत आहे. शासनाच्या आरोग्य यंत्रणेवर विश्वास नाही म्हणून कोरोनाबाधित खाजगी रुग्णालयांत दाखल होतात; पण तिथेही लूटमार सुरु असून त्यासंदर्भात दोन दिवसात दोन तक्रारी दाखल झाल्या आहेत. तक्रारीची शहानिशा करून संबंधितांवर त्वरित कारवाई व्हायलाच पाहिजे. त्याचबरोबर प्रशासनाने आता वास्तववादी अहवाल जनतेसमोर मांडला पाहिजे.
सिंधुदुर्गात सर्वच राजकीय नेत्यांनी आरोप प्रत्यारोप न करता आता एकजूट दाखवून कोरोना महामारीने होत असलेले मृत्यू रोखण्यासाठी त्वरित आराखडा तयार केला पाहिजे. राज्य शासन जर उपाययोजना करीत नसेल तर केंद्र सरकारकडून ह्यासंदर्भात तातडीने मदत घ्यायला पाहिजे. आतातरी सर्वांनी जागे व्हा आणि हजारी पार झालेला मृत्यूचा आकडा थांबवा! अन्यथा दररोज वाढत असलेले मृत्यू दोन हजाराचा आकडा कधी ओलांडतील? हे सांगता येणार नाही!
-संतोष नाईक