संपादकीय… अवश्य वाचा.. घाबरू नका; वास्तव समजून घ्या! कोविड १९ महामारीला रोखणार कसे?

जगात बलाढ्य असणारे देश कोविड १९ विषाणूमुळे हतबल झालेले दिसताहेत. ह्या महामारीला रोखायचे कसे? जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार हा आजार दीर्घ काळ राहणार आहे. ह्याचा अर्थ दीर्घ काळ लॉकडाऊन हा पर्याय असूच शकत नाही.

१०० रुग्णांपासून ते १ लाख रुग्ण संख्या होण्यासाठी कोणत्या देशाला किती दिवस लागले ते पाहूया!

भारत- ६५ दिवस
अमेरिका- २५ दिवस
स्पेन- ३० दिवस
जर्मनी- ३५ दिवस
इंग्लंड- ४२ दिवस

ही आकडेवारी पाहता भारतात रुग्ण वाढीचा वेग इतर देशांपेक्षा कमी आहे. त्यामुळे हायसं वाटेल. मात्र वास्तव असं नाही. कारण भारतात वरील आणि इतर प्रमुख देशांच्या तुलनेत चाचणीचा वेग किती मंद आहे; हे खालील आकडेवारीवरून समजून येईल.

१० लाख लोकसंख्येमागे किती लोकांची चाचणी होते? ते पाहिल्यावर आमच्या शासनाचे विमान नक्कीच जमिनीवर येईल.

अमेरिका- ३७ हजार १८८
रशिया- ४८ हजार ९७७
स्पेन- ६४ हजार ९७७
इंग्लंड- ३९ हजार ५४२
इटली- ५० हजार २९४
फ्रान्स- २१ हजार २१४
जर्मनी- ३७ हजार ५८४
भारत- १ हजार ६७१
(संदर्भ:- https://zeenews.india.com/marathi/video/india-count-cross-1-lakh-covid-cases-after-65-days-special-report/520752)

भारतातील चाचणीचा वेग पाहता भारतात रुग्ण वाढीचा वेग इतर देशांपेक्षा कमी का वाटतो? ते इथे स्पष्ट होतं. ज्या वेगाने चाचणीचा वेग वाढायला पाहिजे होता तो अजूनही वाढविला जात नाही. ह्यावर केंद्र सरकार आणि राज्य सरकार गंभीर दिसत नाही आणि आता लॉकडाऊन हळूहळू शिथिल होईल. आजपर्यंत लॉकडाऊन असल्याने निश्चितच रुग्णांची संख्या देशात १ लाख च्या पुढे गेली; अन्यथा भविष्यात होणारा हाहाकार आजच उडाला असता. पण भविष्यात असं होऊ नये असं प्रत्येकाला वाटते. परंतु देशांतर्गत नागरिकांचे शहरातून ग्रामीण भागाकडे झालेले स्थलांतर धोकादायक ठरणार आहे.

आपण महाराष्ट्रापुरता जरी अभ्यास केला तरी अनेक गोष्टी आपणास सहजपणे लक्षात येतील.

महाराष्ट्रातील कोरोनाची आकडेवारी काय म्हणते?

१७ मे २०२० पर्यंत २ लाख ८२ हजार १९४ नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले.
त्यापैकी २ लाख ४७ हजार १०३ जणांचे प्रयोगशाळा नमुने निगेटिव्ह आले आहेत;
तर ३५ हजार ५८ जण पॉझिटिव्ह आले आहेत.
मृत्यूची एकूण संख्या १२४९ झाली.
११ मार्च २०२० रोजी पुण्यात पहिला कोरोनाबाधित रुग्ण सापडला.
११ मार्च पासून १७ मे पर्यंत ६७ दिवस होतात.
ह्याचाच अर्थ दरदिवशी सरासरी ४ हजार २१२ व्यक्तींच्या तपासण्या आपण करू शकतो.
(संदर्भ:- महाराष्ट्र शासनाची अधिकृत आकडेवारी)

ज्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आली त्यातील ८० टक्के व्यक्तींना कोविड १९ ची कोणतीही लक्षणे दिसली नाहीत. हेच खूप मोठं गंभीर प्रकरण आहे. बाधित रुग्णाच्या थेट संपर्कात आल्याने लक्षणे नसतानाही टेस्ट करण्यात आली होती; पण आता लक्षणे नसलेल्यांची टेस्ट होणार नाही. ह्याचा अर्थ संसर्ग वाढताच राहील. जोपर्यंत प्रत्येक व्यक्तीची टेस्ट होत नाही तोपर्यंत कोणतीही लक्षणे नसलेले कोरोनाबाधित जनसंपर्कात राहतील. मग साखळी तुटणार कशी?

आज तरी प्रत्येकाची टेस्ट करणं सोप्प नाही. मुंबई शहर – उपनगर, ठाणे, कल्याण, नवीमुंबई, पनवेल, विरार, ठाणे व पालघर जिल्हा; ह्या परिसरात अतिशय दाटीवाटीने सुमारे ४ कोटी लोक राहत आहेत. महाराष्ट्राची लोकसंख्या १२ कोटी. एवढ्या लोकांची टेस्ट करायला किती वेळ लागेल? ह्याचाच विचार केल्यास कोणावर कसा विश्वास ठेवावा?

आजपर्यंत आकडेवारी आणि वैद्यकीय तज्ञांचे मत पाहता ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती समर्थ आहे, जे स्वतःची काळजी घेतात; ते कोविड १९ पासून दूर राहू शकतात म्हणजेच १) आम्हा प्रत्येकाला आपली जीवन शैली शारीरिक सामर्थ्य अबाधित राहील अशी ठेवली पाहिजे. ह्यासाठी शासनाने उचित प्रकारे उपाययोजना करून प्रत्येक नागरिक सदृढ कसा राहील? ह्याची दक्षता घेतली पाहिजे. २) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, किडनीचा आजार, अस्थमा, कर्करोग, टीबी अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार असलेले ह्या महामारीला सहजतेने बळी पडू शकतात. त्यांची विशेष काळजी घेण्यासाठी त्या व्यक्तींनी आणि शासनाने नियोजन केले पाहिजे.

देशाची आर्थिक राजधानी मुंबई आज आर्थिक संकटात सापडली आहे. मुंबईतील मजुरांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले. त्यामुळे पुढील काही दिवस मुंबईसाठी खडतर आहेत हे निश्चित; पण त्यापेक्षा जे मजूर आपल्या राज्यात-गावात गेलेत त्या राज्यातील-गावातील परिस्थिती कशी असेल ते काही दिवसातच स्पष्ट होईल. ह्या कोरोनाविरोधाच्या लढाईत वास्तव समजून घ्यायला हवे. तरच ह्यातून मार्ग निघेल!

-नरेंद्र हडकर

मागील महत्वाचे संपादकीय लेख वाचण्यासाठी क्लिक करा!

माझा सिंधुदुर्ग- महामारीसमोर हतबलतेने नाही तर समर्थपणे लढले पाहिजे!
माझा सिंधुदुर्ग- प्रशासनाची कार्यक्षमता आणि राज्यकर्त्यांची पालकत्वाची भावना महत्वाची!
चाकरमान्यांमुळे कोरोनोचा प्रसार…? हा आरोप करण्यापूर्वी नक्की वाचा!
सावधान… अन्यथा इटली-अमेरिका व्हायला वेळ लागणार नाही!

You cannot copy content of this page