अवैध धंद्यांविरोधातील लोकशक्तीचे सामर्थ्य – असलदे गावचा आदर्श!
९ जून २०२६ रोजी अवैध दारू व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात असलेल्या असलदे गावातील ग्रामस्थांनी कडक भाषेत (कानाखाली भरपूर प्रसाद देऊन) समज दिली. त्याची दखल समाज माध्यमांनी घेतलीच; शिवाय आमदार निलेश राणे यांनी असलदे ग्रामस्थांनी घेतलेल्या रोखठोक भूमिकेबद्दल कौतुक करून असे जागृत ग्रामस्थ प्रत्येक गावात असले पाहिजेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. ह्या सर्व घडामोडीचा मी एक घटक होतो म्हणून त्यावर सविस्तर भूमिका आणि पार्श्वभूमी ह्या लेखाच्या माध्यमातून मांडत आहे!
असलदे गावात नांदगावच्या वेशीवर दहा-बारा वर्षे अवैध दारू विक्री बिनधास्तपणे सुरू होती. पोलीस प्रशासन व राज्य उत्पादन शुल्क विभाग यांच्या ‘अर्थपूर्ण’ सहकार्याशिवाय अशाप्रकारे अवैद्य दारू विक्री होऊ शकत नाही; हे उघड सत्य आहे! आपल्या खात्यावर आरोप होऊ नयेत म्हणून पोलीस प्रशासन व राज्य उत्पादन शुल्क विभाग वर्षातून एकदा – दोनदा कागदोपत्री कारवाई करण्याचे नाटक पार पाडत होते. अशा तकलादू कारवाईचा परिणाम शून्य असतो. उलट `आमचं कोणी वाकडं करू शकत नाही’ ह्या अहंकाराने अवैध दारू विक्रेत्यांनी आपली दहशत निर्माण केली होती. स्थानिक राजकीय पुढारी ह्या अवैध धंद्यामध्ये सक्रिय असतात किंवा त्यांचा छुपा पाठिंबा असतो; त्यामुळे सर्वसामान्य व्यक्ती अशा अवैध धंद्यांविरोधात आवाज उठवीत नाहीत. कोण, कुठे आणि कधी अवैध दारू व्यवसाय करतात, हे एक जगजाहीर असूनही प्रशासन काहीच करत नाही म्हटल्यावर ग्रामस्थांचा उद्रेक होणारच! ह्या उद्रेकातून अवैध दारू व्यवसाय करणाऱ्या एका व्यक्तीची कानफाटं ग्रामस्थांनी शेकवली; तर दुसऱ्या व्यक्तीला मोबाईलवरून संपर्क साधत शेवटची तंबी दिली. जर ह्यापुढे कोणी अवैध दारू व्यवसाय करेल, त्याची धिंड काढली जाईल, असा इशाराही ग्रामस्थांनी ह्या कृतीतून दिला!
खऱ्या अर्थाने हे पोलीस प्रशासनाचे अपयश आहे, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचे व जिल्हा प्रशासनाचे अपयश आहे. अवैध व्यवसायविरुद्ध ग्रामस्थांना एकजूट होण्यासाठी बारा वर्षे जावी लागली. त्या बारा वर्षात संबंधितांवर कठोर कारवाई होणे अपेक्षित होते. आता तरी पोलीस प्रशासनाने व लोकप्रतिनिधींनी अवैध दारू व्यवसाय विरुद्ध ठोस भूमिका घ्यावी, ही अपेक्षा!
असलदे-नांदगाव गावामध्ये अवैध दारू विक्रेत्यांनी आपली एक राक्षसी यंत्रणा तयार केली होती. त्या यंत्रणेच्या माध्यमातून ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडणुकीत माझा पराभव २०१७ साली केला. माझ्या प्रचाराला नि:स्वार्थीपणे सहभागी होणाऱ्या गावातील प्रामाणिक लोकांवर अन्याय केला गेला. ह्या राक्षसी यंत्रणेने आपली मगरमिठी तशीच ठेवली होती; परंतु श्री रामेश्वरच्या कृपेने अशा काही घटना घडल्या की ते सगळे नागवे झाले. गावाच्या भल्यासाठी रोखठोक भूमिका मांडणाऱ्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्या एवढी आहे; आता त्यांना निश्चित बळ मिळेल!
गाव म्हटला की, प्रत्येकाचे प्रत्येकाशी वैयक्तिक संबंध असतात आणि ते असावेत. मात्र हे संबंध जपताना गावाच्या भल्यासाठी जो ठोस भूमिका घेतो त्याच्या पाठीशी उभे राहता आलं पाहिजे. जो गावाच्या भल्यासाठी रोखठोकपणे मुद्दे मांडून उचित भूमिका घेतो, त्याला स्वस्वार्थासाठी कार्यरत असणाऱ्या लोकांकडून आणि त्यांच्यापासून लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांकडून जोरदार विरोध होतो. अशावेळी प्रामाणिक निःस्वार्थी व्यक्तींनी सच्चाईच्या बाजूने उभे राहिले पाहिजे. पण तसं बऱ्याच वेळा होत नाही व चुकीच्या लोकांचे बळ आपसूक वाढते आणि ह्या चुकीच्या माणसांकडे नेतृत्व जातं. २०१२ ते २०२२ ह्या दहा वर्षात असलदे ग्रामपंचायतीमध्ये हा प्रकार झाला. त्याची फळं आज गाव भोगतोय; हे खेदाने नमूद करावं लागतंय! परंतु देवाच्या काठीला आवाज नसतो आणि देवाच्या काठीचा परिणाम पाठीवर वळ आल्यावरच दिसतो. तो वळ कोणाच्या पाठीवर फुटले? ते आपण सर्वजण आज पाहतोय! असो!!
अवैध व्यवसायाविरुद्ध भूमिका घेत असताना गावात प्रदूषणकारी प्रकल्प येता कामा नये म्हणून मी नेहमीच भूमिका घेतली. त्यानुसार गावात दोनदा स्टोन क्रेशर येण्यापासून ग्रामस्थांनी रोखले. मात्र आर. एम. सी. प्लांट मात्र उभा राहिला. प्रदूषणकारी आर. एम. सी. प्लांट उभा राहू नये म्हणून मी सविस्तर लेख लिहिला. मात्र गावातील एक-दोन व्यक्तींनी तो लेख दाखवून ठेकेदाराकडून हजारो रुपये उकळण्याचा यशस्वी प्रयत्न केला. त्यांच्यावर गावातील देवदेवतांचा कोप झाल्याशिवाय राहणार नाही. ठेकेदारांकडून कमिशन लाटणारी अवलाद आजही गावात वावरत आहे. ते सुद्धा आज ना उद्या नागवे होणारच आहेत!
असलदे गावाचा ग्रामस्थ म्हणून वावरत असताना मी गेली ३२ वर्षे व्रतस्थ पत्रकारिता केली. गावाच्या भल्यासाठी रोखठोक भूमिका घेतली. विकासाच्या आड येणाऱ्यांचा समाचार घेतला. हे करीत असताना कोणत्याही ठेकेदाराकडून-नेत्याकडून चिरीमिरी घेतली नाही. हा प्रामाणिकपणा जोपासला म्हणून मी बिनधास्त आहे. गावात प्रामाणिक माणसं अनेक आहेत, त्यांना पाठिंबा देण्याची जबाबदारी आम्हा सर्वांची आहे. तरच गावात अवैध व्यवसाय होणारच नाहीत व ठेकेदाराकडून टक्केवारी घेणारी अवलाद नामशेष होईल!
गेल्या दोन-तीन महिन्यात असलदे गावाने जी एकजूट दाखविली; त्यासाठी कौतुक करावे तेवढे कमीच आहे; पण दुसऱ्या बाजूला ज्यांच्या स्वार्थाचा बोजवारा उडाला आहे त्यांच्यापासून आपण सावध राहायला पाहिजे! एवढीच अपेक्षा! आज जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी अवैध दारू, मटका, जुगार, अंमली पदार्थ व्यवसाय होत असताना असलदे गावाचा आदर्श प्रत्येक गावाने घेऊन आक्रमक भूमिका घेतली पाहिजे. गावात अवैध व्यवसाय करणाऱ्यांच्या विरोधात एकजूट दाखवून प्रसंगी कायदा हातात न घेता त्यांची सर्वांसमोर कानफाटं शेकवली पाहिजेत! तरच अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर वचक बसेल! ९ जून २०२६ ही तारीख असलदे गावासाठी महत्वपूर्ण ठरेल!
– नरेंद्र राजाराम हडकर











