परप्रांतीय स्थलांतरित पात्र लाभार्थ्यांना ‘एक देश एक रेशन कार्ड’ योजनेअंतर्गत अन्नधान्य प्राप्त करण्याचे आवाहन
मुंबई:- मुंबई शहर व उपनगरामध्ये राहणाऱ्या सर्व परप्रांतीय स्थलांतरित पात्र लाभार्थ्यांनी ‘एक देश एक रेशन कार्ड’ या योजनेअंतर्गत नजीकच्या अधिकृत शिधावाटप दुकानातून देय अन्नधान्य प्राप्त करुन घेण्याचे आवाहन शिधावाटप नियंत्रक व नागरी पुरवठा संचालक कैलास पगारे यांनी केले.
मुंबई शहरामध्ये ‘एक देश एक रेशन कार्ड’ योजनेअंतर्गत आंतरराज्य पोर्टेबिलिटी संदर्भात जनजागृती अभियानाची अंमलबजावणी सुरू आहे.
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, महाराष्ट्र शासन व केंद्र शासन यांच्या संयुक्त विद्यमानाने संयुक्त राष्ट्राच्या जागतिक अन्न कार्यक्रमाअंतर्गत (डब्लू एफपी) देशातील आंतरराज्य स्थलांतरितांची संख्या प्रामुख्याने जास्त आहे, अशा सात शहरांमध्ये “एक देश एक रेशन कार्ड” योजनेअंतर्गत आंतरराज्य पोर्टेबिलिटी संदर्भात जनजागृती अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी जागतिक अन्न कार्यक्रमाच्या माध्यमातून जनजागृती मोहीम राबविण्यात येणाऱ्या शहरामध्ये मुंबई शहराचा समावेश करण्यात आलेला आहे.
“एक देश एक रेशन कार्ड” योजनेअंतर्गत पोर्टेबिलिटी संदर्भात जागतिक अन्न कार्यक्रमाअंतर्गत स्पेअर इंडिया आणि वर्ल्ड विजन या आंतरराष्ट्रीय सामाजिक संस्थेमार्फत तयार करण्यात आलेली बॅनर, होर्डिंग्ज, पोस्टर्स व पत्रके मुंबई शिधावाटप क्षेत्रातील ४ परिमंडळ कार्यालये अंतर्गत ३३ शिधावाटप कार्यालये आणि एकूण २००७ अधिकृत शिधावाटप दुकाने या सर्व कार्यक्षेत्रामध्ये या योजनेसंदर्भात जन जागृती करण्यात येत आहे. देशातील २८ राज्य आणि ८ केंद्रशासित प्रदेश यामध्ये समाविष्ट आहेत.
या योजनेची जनजागृती होऊन पात्र लाभार्थ्यांना या योजनेमध्ये लाभ मिळावा याकरिता मुंबई शहरातील सर्व शिधावाटप कार्यालये आणि सर्व अधिकृत शिधावाटप दुकानामार्फत या योजनेची उदिष्टे व फायदे समजावून सांगण्याचे काम स्पेअर इंडिया व वर्ल्ड विजन या आंतरराष्ट्रीय सामाजिक संस्थेच्या सहकार्याने शिधावाटप अधिकाऱ्यामार्फत करण्यात येत आहे.
मुंबई शहर व उपनगरामध्ये राहणाऱ्या सर्व परप्रांतीय स्थलांतरित पात्र लाभार्थ्यांनी ‘एक देश एक रेशन कार्ड’ या योजनेअंतर्गत नजीकच्या अधिकृत शिधावाटप दुकानातून देय अन्नधान्य प्राप्त करुन घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.