असलदे गावात ७८ लाखांचा साकव अन् नदीपात्रातील जोडरस्ता; सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियोजनाची पोलखोल?

कणकवली (प्रतिनिधी):- सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली कार्यालयाच्या माध्यमातून असलदे बौद्धवाडी ते ओझरम ह्या दोन गावांना जोडणारा साकव पियाळी नदीवर बांधण्यात आला असून सदर साकवाचा ओझरमाच्या बाजूने शेवटचा कॉलम आणि मातीचा भराव टाकून नदीच्या पात्रामध्ये सुमारे ३० फूट रस्ता तयार करण्यात आला आहे. त्यामुळे नदीला पूर येताच सदर रस्ता वाहून जाण्याची शक्यता असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी बनविलेल्या आराखड्यावर आणि ठेकेदाराने केलेल्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

असलदे बौद्धवाडी ते ओझरम ह्या दोन गावांना जोडणारा साकव अतिशय महत्त्वपूर्ण आहे. त्यासाठी ७८ लाख रुपये मंजूर झाले असून ठेकेदाराने साकवाचे काम पूर्ण केले; परंतु साकवाला जोडणारा रस्ता नदीच्या पात्रातच मातीचा भराव घालून तयार करण्यात आला आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केलेला आराखडा पूर्णतः चुकीचा असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. पहिल्याच पावसात पियाळी नदीला पूर येताच मातीचा भराव टाकून तयार केलेला रस्ता वाहून जाणार असल्याची भीती स्थानिक ग्रामस्थांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली.

संपादकीय… साकव बांधला, पण जोडरस्त्याचे काय? नियोजनातील त्रुटींचा गंभीर प्रश्न

सदर साकवाची पाहणी केल्यावर लक्षात येते की, नदीच्या पात्रात मातीचा भराव घालून तयार केलेला रस्ता नदीच्या प्रवाहात वाहून जाईल. ही गंभीर बाब साकवाचा आराखडा तयार करणाऱ्या अभियंत्यांच्या लक्षात का आली नाही? सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी एसीमध्ये बसून साकवाचा आराखडा तयार केला आहे का? दिखाऊ काम करून सार्वजनिक बांधकाम विभागाने नेमकं काय साध्य केले? असे अनेक प्रश्न निर्माण होतात.

शासनामार्फत लाखो रुपये खर्चून जेव्हा एखादी योजना पूर्णत्वास येते तेव्हा त्या योजनेचा-कामाचा प्लॅन तयार करण्यासाठी लाखो रुपये वेतन घेणारे अभियंते असतात. त्या अभियंत्यांनी ज्या जागेवर काम होणार आहे, तिथे जाऊन प्लॅन तयार करणे अपेक्षित असतं. त्या कामाची गुणवत्ता राखण्यासाठी आणि उपयुक्तता साधण्यासाठी शासन अभियंत्यांवर-अधिकाऱ्यांवर खूप मोठा खर्च करत असते. असे असताना बेजबाबदारपणे केलेले काम मातीमोल होऊ शकते. असलदे गावातील ह्या साकवाचा रस्ता जेव्हा पूरात वाहून जाईल तेव्हा त्याची जबाबदारी कोण घेणार? असा प्रश्न आहे.

यासंदर्भात पालकमंत्री नितेश राणे यांनी त्वरित लक्ष घालून संबंधित विभागाला सक्त सूचना द्याव्यात, तसेच साकवाला जोडणारा रस्ता कसा शाबूत राहील; याची दक्षता घेण्याचे आदेश द्यावेत; अशी मागणी असलदे ग्रामस्थांनी केली आहे.

error: Content is protected !!