लीलाताई `पंढरीवासी’ झाल्या! श्रीमती लीलाताई तावडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

कणकवली (प्रतिनिधी)- येथील श्रीमती लीलाताई पंढरीनाथ तावडे (वय ८६ वर्षे) रविवारी मुलुंड-मुंबई येथे हृदयविकाराने स्वर्गवासी झाल्या. अस्वस्थ वाटत असल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना त्यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, तीन मुली, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे, कणकवलीत सुप्रसिद्ध डॉ. विजय तावडे, एलआयसीच्या मुंबई कार्यालयातील अधिकारी प्रकाश तावडे यांच्या त्या मातोश्री तर निवृत्त जिल्हा सत्र न्यायाधीश स्वर्गीय पंढरीनाथ तावडे यांच्या त्या पत्नी होत.

श्रीमती लीलाताई पंढरीनाथ तावडे ही माऊली आपल्या पतीच्या पाठीमागे नेहमीच पूर्ण आत्मविश्वासाने उभी राहिली. आपल्या मुलांना सुसंस्कारित केले. त्यातून प्रेरणा घेत त्यांच्या मुलांनी उच्च शिक्षण घेत यशाची शिखरे गाठली. सर्वोच्च पदांवरती कार्य करीत असताना तावडे कुटुंबियांनी सामाजिक भान निरंतर जपले. सेवाभावी वृत्ती त्यांच्या तिसऱ्या पिढीतही दिसून येते. स्वर्गीय लीलाताई तावडे यांचा नातू व डॉ. विजय तावडे यांचे सुपुत्र अ‍ॅड. अग्निवेश यांनी सुद्धा सर्वसामान्यांसाठी वकिलीची सेवा सुरु केली आहे आणि दुसऱ्या बाजूला कायद्याचे पुढील सर्वोच्च शिक्षणही सुरु ठेवले आहे. खऱ्या अर्थाने ह्या लीलाताईंच्या संस्काराच्या `लीला’ आहेत असे म्हणावे लागेल. आज लीलाताई `पंढरीवासी’ झाल्या. अशा माऊलीला पाक्षिक `स्टार वृत्त’कडून भावपूर्ण श्रद्धांजली!

You cannot copy content of this page