बाल संरक्षण कक्षासाठी केंद्र सरकार कार्यालय उपलब्ध करून देणार!

मुंबई (ॲड. सुमित शिंगाणे):- “जिथे बाल कल्याण समिती यांना कार्यालय नाहीत तसेच बाल संरक्षण कक्ष नाहीत; अशा ठिकाणी केंद्रीय महिला बाल विकास मंत्रालय या कार्यालयांची निर्मिती करेल आणि निधी देखील उपलब्ध करून देईल!” अशी घोषणा केंद्रीय महिला व बाल कल्याण, अल्पसंख्यांक मंत्री स्मृती जुबिन इराणी यांनी केली.

षण्मुखानंद ऑडिटोरियम, सायन पूर्व मुंबई येथे राष्ट्रीय बाल संरक्षण आयोग भारत सरकार व महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने “वत्सल भारत” या विभागीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात केंद्रीय महिला व बाल कल्याण, अल्पसंख्यांक मंत्री स्मृती इराणी बोलत होत्या. या कार्यक्रमास महाराष्ट्र सह गुजरात, आंध्रप्रदेश, गोवा, दादरा नगर हवेली, दमन, दिव राज्यातील सदस्य सहभागी झाले होते.

केंद्रीय मंत्री श्रीमती इराणी म्हणाल्या, ‘चाइल्ड ट्रॅकिंग’ या सिस्टमच्या माध्यमांतून जी मुले हरवली होती अशी देशातील चार लाख मुले शोधली आहेत आणि त्या मुलांना सुरक्षितपणे त्यांच्या कुटुंबांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं गेलं आहे. 2 हजार 500 मुलं ही दत्तक घेतली गेली आहेत. पोक्सो अंतर्गत महिलांना भारत सरकार पूर्णपणे मदत करणार असून त्यांचा कायदेशीरदृष्ट्या येणारा आर्थिक भार देखील भारत सरकार उचलणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात अवैध मानवी तस्करी रोखण्यासाठी युनिट बनवलेले आहे, यामध्ये काही त्रुटी असतील तर त्या जरूर आम्हाला कळवाव्यात. प्रत्येक गावागावाच्या बाल सुरक्षा समित्या कार्यरत आहेत. ग्रामपंचायत स्तरावर एखाद्या बालकाला जर मदतीची आवश्यकता असले तर त्याची माहिती भारत सरकारला कळवावी, आम्ही त्याच्यासाठी नक्की मदत करू.

प्रत्येक जण आप आपल्या परीने स्वताच्या राज्यातील वेगवेगळ्या शासकीय व निम शासकीय आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून लहान मुलांची बालकांची काळजी समर्पित भाव ठेऊन सेवा देत आहात याबद्दल मी सर्वांचे आभार मानते. प्रत्येक बालकाला शिक्षण घेण्याचा हक्क आहे. शिक्षणापासून एकही बालक वंचित राहू नये यासाठी केंद्र शासन पूर्णपणे प्रयत्न करेल असेही मंत्री श्रीमती स्मृती इराणी म्हणाल्या.

यावेळी केंद्रीय महिला बालविकास विभागाचे अतिरिक्त सचिव संजीव कुमार चड्ढा यांनी बाल हक्क अधिनियम कशाप्रकारे लागू केला जात आहे, वत्सल भारत योजनेबाबत माहिती दिली. यावेळी सहसचिव इंद्रा मालो यांनी वत्सल भारत योजनेसाठी सर्व राज्यांचे सहकार्य मिळत असल्याबद्दल सर्वांचे आभार मानले तसेच मिशन वस्तूंचे ते पोर्टल देखील लॉन्च केले असल्याची माहिती यावेळी दिली.

केंद्रीय बाल संरक्षण बालसुरक्षा आणि बाल कल्याण विभागाच्या सदस्य सचिव रूपाली बॅनर्जी, महाराष्ट्र राज्याचे महिला बाल विकास विभागाचे सचिव डॉ.अनुपकुमार यादव, महिला व बालविकास आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, उपायुक्त राहुल मोरे, बापूराव भवाने, जिल्हा महिला बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड, शोभा शेलार आणि अब्दुल चौधरी यासह राज्यातील जिल्हा महिला बालविकास अधिकारी उपस्थित होते.