नसरापूर अत्याचार-हत्या प्रकरणातील दोषीला फाशी; अवघ्या पावणेदोन महिन्यांत निकाल
१४ दिवसांत दोषारोपपत्र, डे-टू-डे सुनावणी; राज्यातील सर्वात जलदगतीने निकाली निघालेल्या खटल्यांपैकी एक
पुणे:- भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी भीमराव प्रभाकर कांबळे (वय ६५) याला फाशीची शिक्षा सुनावली आहे. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी हा निकाल दिला. गुन्हा घडल्यानंतर अवघ्या पावणेदोन महिन्यांत निकाल लागल्याने हा खटला राज्यातील सर्वात जलदगतीने निकाली निघालेल्या प्रकरणांपैकी एक ठरला आहे.
महाराष्ट्र दिनी घडलेल्या या अमानुष घटनेनंतर राज्यभर संतापाची लाट उसळली होती. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी विविध सामाजिक संघटना व नागरिकांकडून करण्यात आली होती. पुणे ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाचा वेगाने तपास करत अवघ्या १४ दिवसांत दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले.
तपासादरम्यान डीएनए अहवाल, वैद्यकीय अहवाल आणि इतर महत्त्वाचे वैज्ञानिक पुरावे संकलित करण्यात आले. सुमारे १,१०० पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले. त्यानंतर या खटल्याची ‘डे-टू-डे’ तसेच ‘इन-कॅमेरा’ पद्धतीने सुनावणी झाली. एकूण १२५ साक्षीदारांपैकी ५५ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली व उलटतपासणी पूर्ण करण्यात आली.
सर्व पुरावे व साक्षींचा विचार करून न्यायालयाने आरोपी दोषी ठरवत त्याला फाशीची शिक्षा सुनावली. या निकालामुळे पीडित चिमुरडीच्या कुटुंबीयांना न्याय मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली. निकाल जाहीर होताच न्यायालयात उपस्थित असलेल्या कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले.
या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर न्यायालय परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जलद तपास, वेळेत दोषारोपपत्र आणि सलग सुनावणी यामुळे या खटल्याकडे राज्यभराचे लक्ष लागले होते.











