उपमहापौर संजय यादव यांची ओशिवरा परिसराला भेट; विकासकामांची पाहणी
प्रशासन-लोकप्रतिनिधी समन्वयातून विकासकामे पूर्ण करू – उपमहापौर संजय यादव
मुंबई:- वर्सोवा विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांची पाहणी व पाठपुरावा करण्यासाठी मुंबईचे उपमहापौर श्री. संजय यादव यांनी आज ओशिवरा परिसराला भेट दिली. यावेळी शिवसेनेचे विभागप्रमुख तथा माजी नगरसेवक श्री. राजू श्रीपाद पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक कार्यकर्त्यांनी त्यांचे उत्साहात स्वागत केले. या भेटीदरम्यान ओशिवरा मॅटर्निटी हॉस्पिटल, ओशिवरा एस. व्ही. रोड ब्रिज तसेच ओशिवरा हिंदू स्मशानभूमी या महत्त्वाच्या प्रकल्पांची पाहणी करण्यात आली.

नागरिकांच्या मूलभूत सुविधांशी संबंधित प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करून संबंधित कामे लवकर पूर्ण करण्यासाठी आवश्यक त्या सूचना देण्यात आल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली. शिवसेना पदाधिकारी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. परिसरातील विकासकामांना गती देण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय राखून काम केले जाईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
श्री. मोहित राजू पेडणेकर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या स्वागत कार्यक्रमात शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे वातावरण उत्साहपूर्ण व जल्लोषमय होते. त्यावेळी वेल्फेअर ग्रुप ऑफ कॉस्मोपोलीटन को-ऑप. हाऊसिंग सोसायटी असोसिएशनचे पदाधिकारी विष्णू भट, इक्बाल सुलेमान, राजेश गुप्ता, ओम साईधाम देवालय समितीचे सेक्रेटरी मोहन सावंत होते.











