सिंधुदुर्गात उच्च न्यायालयाच्या आदेशालाच हरताळ; वेगाने वाढतेय बेकायदा वृक्षतोड!

दोडामार्ग–सावंतवाडी तालुक्यात वनसंपदेवर घाला; पर्यावरणप्रेमींकडून तातडीच्या कारवाईची मागणी

 सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) – उच्च न्यायालयाने वृक्षतोडीवर स्पष्ट निर्बंध घातले असतानाही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग आणि सावंतवाडी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर बेकायदा वृक्षतोड सुरू असल्याचा गंभीर आरोप पर्यावरणप्रेमींकडून करण्यात आला आहे. सामाजिक व पर्यावरण कार्यकर्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत या प्रकाराकडे लक्ष वेधले असून न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

डॉ. परुळेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोडामार्ग व सावंतवाडी तालुक्यातील १३ गावांच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड सुरू आहे. उच्च न्यायालयाने वृक्षतोडीवर बंदीचे आदेश दिले असतानाही या भागातील पर्यावरणाचा समतोल धोक्यात आणणाऱ्या कारवाया सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.

‘टास्क फोर्स’ स्थापन करण्याची मागणी

बेकायदा वृक्षतोड रोखण्यासाठी जिल्हास्तरावर विशेष ‘टास्क फोर्स’ स्थापन करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले असल्याचे नमूद करत प्रशासनाने त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच दोडामार्ग तालुक्यातील सासोली, पाट्ये, मोर्ले आणि सावंतवाडीतील सरमळे, कोलझर, फुकेरी गावातील परिसरात सुरू असलेल्या वृक्षतोडीची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.

प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

एका बाजूला शासनाकडून मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपणाचे कार्यक्रम राबविले जात असताना, दुसरीकडे डोंगराळ भागातील नैसर्गिक जंगलांची होत असलेली वृक्षतोड प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींनी केला आहे.

त्यांच्या मते, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समृद्ध जैवविविधता, नैसर्गिक संपदा आणि वन्यजीवांसाठी ही वृक्षतोड गंभीर धोका ठरत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष घालून वन विभाग आणि महसूल यंत्रणेमार्फत संयुक्त कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

वन्यजीवांच्या अस्तित्वावरही संकट

दोडामार्ग–सावंतवाडी परिसर हा वन्यजीवांसाठी महत्त्वाचा ‘वाइल्ड लाईफ कॉरिडॉर’ मानला जातो. या भागातील जंगलांचा ऱ्हास झाल्यास हत्ती, गवे, रानडुक्कर आणि इतर वन्यप्राणी मानवी वस्त्यांकडे वळण्याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे पर्यावरणीय समतोलासह स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

कठोर कारवाईची मागणी

पर्यावरणप्रेमींनी प्रशासनाला तातडीने बेकायदा वृक्षतोड थांबविण्याचे, दोषींवर फौजदारी कारवाई करण्याचे आणि उच्च न्यायालयाच्या आदेशांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्याचे आवाहन केले आहे. अन्यथा सिंधुदुर्गातील मौल्यवान वनसंपदेवर होणारा हा घाला भविष्यात पर्यावरण आणि जैवविविधतेसाठी गंभीर संकट निर्माण करू शकतो, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

error: Content is protected !!