महिला सक्षमीकरणासाठीच्या योजनांना मिळणार ऑस्ट्रेलियन वाणिज्य दूतावासाचे सहकार्य

मुंबई, दि. २५:- महिलांचे आर्थिक, सामाजिक सक्षमीकरण करणे, त्यांना दर्जा आणि संधीची समानता उपलब्ध करुन देण्यासाठी महिला व बालविकास विभाग विविध उपक्रम राबविते. हे उपक्रम राबविण्यासाठी ऑस्ट्रेलियन वाणिज्य दूतावासाचे सहकार्य मिळणार आहे, असे महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी सांगितले.

ऑस्ट्रेलियन वाणिज्य दूतावासाचे कॉन्सुलेट जनरल मायकल ब्राऊन यांनी महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांची मंत्रालयात सदिच्छा भेट घेतली. यावेळी महिलांच्या प्रश्नाबाबत सकारात्मक चर्चा झाली.

महिला व बाल विकास मंत्री ॲड. ठाकूर म्हणाल्या, महिला व बालकांसाठी शासनाच्या विविध योजना आहेत. कोविड काळात महिला व बालविकास विभागाने अनाथ बालके, विधवा महिला यांच्यासाठी विविध उपक्रम राबविले. कोविड काळात अंगणवाडी ताईंनी केलेल्या कौतुकास्पद कामाबद्दल ही माहिती त्यांनी दिली.

महिला व बाल सशक्तीकरण योजनेसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून ३ टक्के निधी कायमस्वरूपी महिला व बालविकास विभागासाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. महिला व बालविकास विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या महिला आर्थिक विकास महामंडळच्या माध्यमातून महिला बचत गटांचे बळकटीकरण करण्यात येत असल्याचे तसेच त्यांनी ई-बिजनेस प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणार असल्याची माहिती मंत्री ॲड. ठाकूर यांनी दिली.

कॉन्सुलेट जनरल मायकल ब्राऊन म्हणाले, महिला दिनाच्या निमित्ताने महिलांसाठी विविध कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सहकार्य करण्यात येईल. महिला सबलीकरण तसेच महिलांचे विविध प्रश्न व अडचणी सोडवण्यासाठी आणि त्यांना स्वयंरोजगार देण्यासाठी ऑस्ट्रेलिया वाणिज्य दूतावासाचे सहकार्य मिळेल, असेही श्री. ब्राऊन यांनी सांगितले.