राज्यात एक कोटी २२ लाख बालकांना पोलिओ लसीकरणाचे उद्दिष्ट; आरोग्यमंत्र्यांची माहिती

१० मार्चला पोलिओ लसीकरण अभियान

मुंबई:- राज्यात १० मार्च रोजी पल्स पोलिओ लसीकरण अभियान राबविण्यात येणार असून सुमारे १ कोटी २२ लाख बालकांना पोलिओचा डोस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी राज्यभर ८२ हजार ७१९ पोलिओ बुथ उभारण्यात येणार आहे. ० ते ५ वयोगटातील सर्व मुला-मुलींना पोलिओचा डोस द्यावा, असे आवाहन आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केले.

दरवर्षी वर्षातून दोन वेळेस पोलिओची विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात येते. या मोहिमेसाठी राज्यभर जनजागृती मोहीम हाती घेण्यात यावी, असे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी यंत्रणेला दिले आहे. दरम्यान, पोलिओ लसीकरण मोहिमेसंदर्भात आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदिप व्यास यांच्या अध्यक्षतेखाली राज्य कृती दलाची आज आढावा बैठक झाली. यावेळी मोहिमेसंदर्भात विविध विभागांनी करावयाच्या कार्यवाहीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

गेल्यावर्षी सुमारे १ कोटी २० लाख ९८ हजार बालकांना पोलिओ डोस देऊन ९९.७ टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले होते. यावर्षी १ कोटी २१ लाख ६० हजार ६३ बालकांना डोस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सुमारे ८२ हजार ७१९ पोलिओ बुथ उभारण्यात येणार असून त्यासाठी २ लाख १९ हजार ३१३ एवढा कर्मचारी वर्ग नियुक्त करण्यात आला आहे. १६ हजार ५४८ पर्यवेक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. या अभियानांतर्गत २ कोटी ९२ लाख १९ हजार ५४३ घरांना भेटी देऊन पोलिओ डोस देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. १३ हजार ९२७ मोबाईल टीम संपूर्ण दिवसभर कार्यरत राहणार आहेत.

पोलिओ लसीकरणाच्या दिवशी लसीकरण केंद्रांवर अखंड वीजपुरवठा राहण्यासाठी ऊर्जा विभागाने आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अशी सूचना डॉ. व्यास यांनी यावेळी केली. अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्ती आणि आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी समन्वयातून ही मोहीम यशस्वी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *