घोटगे-सोनवडे-शिवडाव घाट रस्त्याच्या कामाचा आढावा
मुंबई:- कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला जोडणाऱ्या घोटगे-सोनवडे-शिवडाव घाट रस्त्याच्या कामाचा काल सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी आढावा घेऊन काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सूचना केल्या.
मंत्रालयात झालेल्या बैठकीस उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते) उल्हास देबडवार, उपसचिव बस्वराज पांढरे आदी उपस्थित होते.
सन २०२०-२१ च्या रस्ते विकास योजनेनुसार कोल्हापूर-सिंधुदुर्ग जिल्ह्याला जोडणाऱ्या या घाट रस्त्याचे नाव मठ-कुडाळ-घोटगे-सोनवडे-नाईकवाडी-शिवडाव-गारगोटी असे असून या रस्त्याची एकूण लांबी ९४ किमी आहे. यापैकी ११.७५ किमी घाट रस्ता आहे. या घाट रस्त्याचे काम झाल्यास सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्याला फायदा होणार आहे.
या घाट रस्त्यासाठी केंद्रीय पर्यावरण व वन विभागाची परवानगी मिळाली आहे. इतर कामांची पूर्तता करण्यात येत आहे. या कामाचा आज मंत्री श्री. चव्हाण आणि श्री. सामंत यांनी आढावा घेऊन या घाट रस्त्याचे काम सुरू करण्यासंदर्भात आजच्या बैठकीत चर्चा केली.