१० वी च्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या रेखाकला परीक्षा सवलतीच्या गुणांसाठी प्रस्ताव सादर करावेत

सिंधुदुर्गनगरी, दि. 24 (जि.मा.का.) – १० वीच्या मुल्यमापन कार्यपद्धतीमध्ये सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी शासनाच्या व मंडळाच्या धोरणानुसार व तरतुदीनुसार देय असलेल्या अन्य गुणांचा लाभ प्रचलित पद्धतीनुसार देण्यास मान्यता दिली असल्याचे डॉ. शिवलींग पटवे, विभागीय सचिव, कोकण विभागीय मंडळ, रत्नागिरी यांनी कळवीले आहे. त्यासाठीचे प्रस्ताव ३० जून २०२१ रोजीपर्यंत विद्यार्थ्यांनी शाळेकडे सादर करावेत.

प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडील निर्णयानुसार कोविड-१९ संसर्गजन्य साथ रोगाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना शासकीय रेखाकला परीक्षेचे सवलतीचे अतिरिक्त गुण देता यावेत. यासाठी खालीलप्रमाणे सवलतीचे गुणदान देण्यात यावे असे सूचित केले आहे. यापूर्वी एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शालेय व क्रीडा विभागाच्या तरतुदीनुसार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेमध्ये अतिरिक्त गुणांची सवलत देता यईल. सन २०२०-२१ या वर्षी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेस बसलेल्या ज्या विद्यार्थ्यांनी एलिमेंटरी ड्रॉईंग ग्रेड परीक्षा उत्तीर्ण केली आहे, तथापी कोविड – १९ च्या परिस्थितीमध्ये त्यांना इंटरमिजिएट ड्रॉईंग परीक्षेस बसता न आल्याने ते परीक्षा उत्तीर्ण होवू शकले नाहीत अशा विद्यार्थ्यांना एलिमेंटरी ड्रॉईंग ग्रेस परीक्षेस मिळालेली श्रेणी इंटरमिजिएट ड्रॉईंग परीक्षेकरिता प्रदान करण्यात यावी. या श्रेणीच्या आधारे केवळ शैक्षणिक वर्ष सन २०२०-२१ मध्ये इ. १० वी परीक्षेमध्ये अतिरिक्त गुणांची सवलत देण्यात यावी असे नमुद केले आहे.

तसेच उपरोक्त प्रमाणे कार्यवाही करण्याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांनी पत्रानुसार आदेशीत केले आहे. याबाबी विचारात घेवून याबाबतचे प्रस्ताव स्वीकारण्यासाठी अंतिम मुदतवाढ पुढीलप्रमाणे देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी शाळेकडे विहित नमुन्यातील प्रस्ताव सादर करण्याच्या दिनांक शुक्रवार दि. २५ जून २०२१ ते बुधवार दि. ३० जून २०२१, शाळांनी विभागीय मंडळाकडे प्रस्ताव सादर करण्याच्या दिनांक सोमवार दि. २८ जून २०२१ ते शुक्रवार दि. २ जुलै २०२१ अशा आहेत. तरी सन २०२०-२१ या वर्षात परीक्षेसाठी इ १० वी च्या विद्यार्थ्यांना शासकीय रेखाकला परीक्षेचे सवलतीचे अतिरिक्त गुण देण्यात येणार आहेत, याची सर्व माध्यमिक शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक, सर्व विद्यार्थी व त्यांचे पालक यांनी नोंद घेऊन याबबतचे प्रस्ताव मुदतीत विभागीय मंडळाकडे सादर करावेत. त्यानंतर येणाऱ्या प्रस्तावांचा विचार करता येणार नाही.

You cannot copy content of this page