स्वर्गीय अंकुश डामरे यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आदर्श जपला पाहिजे! -`सिंपन प्रतिष्ठान’चे सरचिटणीस बाळकृष्ण जाधव

मुंबई (प्रतिनिधी):- “स्वर्गीय अंकुश डामरे यांनी आपले आयुष्य सामाजिक सेवेसाठी समर्पित केले. त्यामुळे त्यांच्या गावाचा आणि पंचक्रोशीचा विकास झाला. त्यांच्याकडे असणारी नि:स्वार्थी वृत्ती आणि प्रामाणिकपणा याचा आदर्श आपण सर्वांनी ठेवून सामाजिक जीवन जगले पाहिजे!” असे प्रतिपादन स्वर्गीय अंकुश डामरे यांच्या श्रद्धांजली सभेत `सिंपन प्रतिष्ठान’चे सरचिटणीस बाळकृष्ण जाधव यांनी केले.

क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजाचे सुपुत्र, असलदे-कोळोशी ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच, श्री रामेश्वर सहकारी सोसायटीचे माजी अध्यक्ष, नांदगाव पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे संस्थापक सदस्य आणि उपाध्यक्ष, श्री सोमवती देवी सेवा मंडळ असलदे डामरेवाडीचे अध्यक्ष अंकुश डामरे यांचे निधन २० मे २०२४ रोजी मुंबई येथे झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मुंबई येथील डॉ. शिरोडकर हायस्कूलच्या शिशुविकास सभागृहात श्रद्धांजली सभा झाली. त्यावेळी स्वर्गीय अंकुश डामरे यांचे दोन सुपुत्र, सुना, नातवंडे, नातेवाईक आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

`सिंपन प्रतिष्ठान’चे सरचिटणीस बाळकृष्ण जाधव स्वर्गीय डामरे यांना श्रद्धांजली वाहताना पुढे म्हणाले की, ग्रामीण भागामध्ये प्रामाणिकपणे समाजसेवा करण्याचे ध्येय अंकुश डामरे यांनी ठेवले. समाजसेवा करताना त्यांना अनेक अडचणी आल्या असतील; पण त्यातून त्यांनी मार्ग शोधला. वाहनांची सोय नसताना, आतासारखे डांबरी रस्ते नसताना, वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसताना स्वर्गीय अंकुश डामरे यांनी अनेक रुग्णांना आपल्या बैलगाडीतून डॉक्टरकडे- वैद्याकडे नेले. त्यामुळे अनेकांचे प्राण वाचले. त्यांनी सरपंचपदाच्या काळात केलेली कामे साठ वर्षानंतरही आपणास पाहता येतात; अशा व्यक्तिमत्त्वाचा आदर्श आपण जपला पाहिजे!

श्रद्धांजली सभेच्या सुरुवातीला सामाजिक कार्यकर्ते श्री. राकेश कांबळी यांनी स्वर्गीय अंकुश डामरे यांना श्रद्धांजली अर्पण करून पाक्षिक `स्टार वृत्त’मध्ये प्रसिद्ध झालेल्या संपादकीय लेखाचे वाचन करून दाखविले; ज्यामध्ये स्वर्गीय अंकुश डामरे यांच्या कार्याचा सविस्तर आढावा घेण्यात आला होता. त्यानंतर नेव्हीचे निवृत्त अधिकारी श्री. विलास ढोलम यांनी दैनिक `प्रहार’चे सिंधुदुर्ग आवृत्ती प्रमुख, जेष्ठ पत्रकार श्री. संतोष वायंगणकर यांनी स्वर्गीय अंकुश डामरे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी लिहिलेला लेख वाचून दाखविला आणि आपले मनोगत व्यक्त करून स्वर्गीय अंकुश डामरे यांना श्रद्धांजली वाहिली.

आदर्श व्यक्तिमत्वास सलाम! -संजय गिरकर

“सामाजिक कार्य दोन प्रकारे केले जाते. पहिल्या प्रकारात सामाजिक कार्य करणाऱ्याला स्वतःची प्रगती-उन्नती अपेक्षित असते; तर दुसऱ्या प्रकारात समाजाच्या-गावाच्या सर्वांगिण प्रगतीचे ध्येय असते. स्वर्गीय अंकुश डामरे यांनी आयुष्यभर समाजाच्या प्रगतीचे ध्येय सामोरे ठेवून कार्य केले. ते कार्य करीत असताना अनेकांचे संसार त्यांनी उभे केले. कारण इतरांबद्दल त्यांच्या मनात आपुलकी होती, प्रेम होते. त्यामुळे इतरांच्या वैयक्तिक समस्याही त्यांनी सोडविल्या! अशा आदर्श व्यक्तिमत्त्वाला कोणत्या विभागातर्फे श्रद्धांजली वाहण्यापेक्षा ती सर्वांकडून वाहिली जाणे अपेक्षित आहे. अशा आदर्श व्यक्तीमुळे समाजामध्ये सामाजिक कार्य यशस्वी होते. स्वर्गीय अंकुश डामरे यांच्या आदर्श कार्यामुळे सरस्वती हायस्कूल उभारणीस चालना मिळाली. अशा आदर्श व्यक्तिमत्वास सलाम!” असे प्रतिपादन करून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. संजय गिरकर यांनी स्वर्गीय अंकुश डामरे यांना श्रद्धांजली अर्पण केली.

५ टक्केही कार्य खूप झाले! -श्रीपाद फाटक

क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संस्थेचे आणि `अपना बाजार’चे अध्यक्ष श्री. श्रीपाद फाटक यांनी यावेळी म्हटले की, स्वर्गीय अंकुश डामरे यांनी वयाच्या ९२ व्या वर्षापर्यंत केलेले समाजसेवेचे कार्य खूपच मोठे आहे. त्यांनी केलेल्या कार्यापैकी फक्त पाच टक्के जरी आपण कार्य पूर्ण करू शकलो तरी त्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली अर्पण केल्यासारखे होईल. ग्रामीण भागात शैक्षणिक कार्य करणे, तेही ५०-६० वर्षांपूर्वी सोप्पं नव्हतं; परंतु ते त्यांनी केले. स्वर्गीय अंकुश डामरे यांना क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संस्थेच्या आणि `अपना बाजार’च्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली!

सरस्वती हायस्कूलच्या उभारणीसाठी महत्वपूर्ण योगदान! – गजानन रेवडेकर

“स्वर्गीय अंकुश डामरे यांनी असलेले नांदगाव सरस्वती हायस्कूल उभारण्यासाठी दिलेली योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण होतं. असलदे- कोळोशी ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच असताना डामरे यांनी सरस्वती हायस्कूलची इमारत उभारण्यासाठी तेव्हाच्या लोकल बोर्डाकडून पंचवीस हजार कर्जाला हमी दिली होती; एवढेच नाही तर इमारतीसाठी लागणारे साहित्य पंचक्रोशीतून जमा करून स्वतःच्या बैलगाडीने आणून दिले. त्यांचे शैक्षणिक कार्यासाठी दिलेले योगदान नांदगाव पंचक्रोशी शिक्षण संस्था कधी विसरणार नाही. त्यांनी संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून केलेले कार्यही आदर्शवत आहे. त्यांना नांदगाव पंचक्रोशी शिक्षण संस्थेच्यावतीने भावपूर्ण श्रद्धांजली!” असे प्रतिपादन नांदगाव पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे पदाधिकारी गजानन रेवडेकर यांनी केले.

स्वर्गीय अंकुश डामरे यांच्या श्रद्धांजली सभेत इतर अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती.