वीस वर्षांनी आई पुत्रांची झाली भेट!

विमनस्क अवस्थेत फिरणारी अनेक माणसं आपण रोज बघतो. आपल्यापैकी अनेकजण त्यांना खायलाही देतात; परंतु ती कुठली असतात? आपल्याकडे कशी आली? हा विचार आपण करतो का? अशीच एक मनोरूग्ण मध्यमवयीन स्त्री २००५ सालापासून मालवण-चौके येथे फिरत होती. सुरुवातीला तिला काहीच कळत नव्हतं. कालांतराने तिला बऱ्याच अंशी कळू लागले. सहा महिन्यांपूर्वी चौके गावच्या सौ. मनीषा वराडकर (पंचायत समिती सदस्य) यांनी डॉ. शरदचंद्र काळसेकर यांच्याशी चर्चा केली.

सदर स्त्रीने सांगितलेला पत्ता व फोटो काढून डॉ. शरदचंद्र काळसेकर यांनी महाराष्ट्र लेवलच्या डॉक्टरांच्या ग्रुपवर टाकला आणि पोस्ट व्हायरल झाली. त्या स्त्रीच्या गावावरून डॉ. शरदचंद्र काळसेकर यांना फोन यायला लागले.

त्या महिलेचे नाव आणि पत्ता समजला. द्वारकाबाई देवराम डोळे राहणार मु. पो. चिंचोली (बावणे) ताः सिंदखेडराजा, जिः बुलढाणा.

दुसऱ्याच दिवशी द्वारकाबाई देवराम डोळे हिचे मुलगे कृण्णा व शिवशंकर देवराम डोळे मुंबईवरून (मूळ बुलढाणा) चौके येथे आले; परंतु आईच मुलांना नीटशी ओळखत नसल्याने मालवण पोलीस ठाण्यात गाडी अडली. त्याचवेळी ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे जिल्हाध्यक्ष तसेच पा. `स्टार वृत्त’चे सिंधुदुर्ग प्रतिनिधी श्री. संतोष नाईक व ह्युमन राईटस असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे जिल्हा सचिव किशोर नाचनोलकर यांनी योग्यवेळी मदत केल्याने ती कोंडी फुटली व तिचा घरी जाण्याचा मार्ग २० वर्षानंतर प्रशस्त झाला.

एका अनोळखी मनोरुग्ण महिलेला तिच्या मुलांकडे पाठविण्यासाठी अनेक जणांनी पुढाकार घेतला. त्यामध्ये मालवण पंचायत समितीच्या माजी सभापती व मालवण पंचायत समितीच्या सदस्या प्रमिला वराडकर, डॉ. शरदचंद्र काळसेकर, ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे जिल्हाध्यक्ष व पा. `स्टार वृत्त’चे सिंधुदुर्ग प्रतिनिधी श्री. संतोष नाईक, ह्युमन राईटस असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे जिल्हा सचिव किशोर नाचनोलकर, चिंचोली-बुलढाणा सरपंच श्री. भगवान पालवे, श्री. सोपान घुगे, पत्रकार संतोष गावडे, बेळणे चेक पोस्टचे श्री. सावंत पोलीस, सौ. सकिना भाभी यांची नावे प्रामुख्याने घ्यावी लागतील. मालवण आगाराचे वाहक सोपान हिम्मतराव घुगे यांनी सुद्धा महत्वपूर्ण भूमिका पार पाडली.

सुमारे वीस वर्षांनी आई आणि मुलांची भेट घडवून आणण्यासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. त्यांच्या कार्याला सलाम!

-मालवण प्रतिनिधी

You cannot copy content of this page