शिवडाव आणि तिलारी धरणाच्या क्षेत्रातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा
सिंधुदुर्गनगरी, दि. 21 (जि.मा.का.) उपविभागांतर्गत असणाऱ्या लघु पाटबंधारे योजना शिवडाव या धरणाची पाणी पातळी आज दिनांक 21 जून 2021 रोजी तलांक 118.50 मी झाली असून पुढील 2 ते 4 दिवसात सांडव्यावरुन विसर्ग सुरु होणार आहे. त्यामुळे नदी, नालाप्रात्रातील पाण्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. नदी, नाल्याकाठच्या लोकांना इशारा देण्यास येतो की नदीपात्रात,नाल्यास उतरु नये व सावधानता बाळगावी. नदीकाठच्या परिसरातील सर्व लोकांनी सतर्क रहावे असे उपविभागीय अभियंता पाटबंधारे बांधकाम उपविभाग क्र.1 कणकवली यांनी कळविले आहे.
त्याचप्रमाणे तिलारी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पर्जन्यवृष्टीमुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे. धरणाच्या ROS व GOS नुसार धरण क्षेत्रातील पाणलोट क्षेत्रामधुन येणारे अतिरिक्त पाणी नियंत्रित पध्दतीने पुच्छ कालव्याव्दारे तिलारी नदीत सोडण्याचे नियोजन आहे.
त्या अनुषंगाने 21 जून 2021 रोजी खळग्यातील दगडी धरणाच्या पुच्छ कालव्याव्दारे धरणातील पाणी तिलारी नदीत सोडण्यात येणार असल्याने तसेच सद्यस्थितीत धरणाच्या परीसरात पावसाचे प्रमाण वाढत असल्याने धरण क्षेत्राबाहेरील पाणलोट क्षेत्र व खरारी नाल्यातील पाणी नदीपात्रात येऊन नदीपात्राची पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे.
नदीकाठच्या ग्रामस्थांना व शेतकऱ्यांना इशारा देण्यात येतो की, 21 जून 2021 पासून पुढील कालावधीमध्ये नदीपात्रातील प्रवाह कधीही वाढण्याची शक्यता असल्याने, जिवित व वित्तहानी टाळणेसाठी नदीपात्रात उतरु नये व सावधानता बाळगावी. रात्रीच्या वेळी नागरिकांनी नदी पात्रातून ये- जा करु नये, नदी पात्रात कपडे धुण्यासाठी जाणाऱ्या महिला, नदी पात्रात पाण्यासाठी गुरे सोडणारे शेतकरी यांनी या बाबत आवश्यक ती सतर्कता बाळगावी. नदी काठच्या व इतर सर्व ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा गाव पातळीवरुन दवंडी पिटवून देण्यात यावी व जलसंपदा विभागास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी केले आहे.