श्रीरामांचे कार्य केल्याशिवाय मला कुठली विश्रांती? -पंतप्रधान नरेंद्र मोदी

आज अयोध्येत श्रीराम मंदिराचे भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते संपन्न

अयोध्या नगरी:- आज श्रीराम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते `जय श्रीराम’ आणि `हर हर महादेव’च्या गर्जनेत मंदिराची कोनशिला स्थापन करण्यात आली. यावेळी पंतप्रधानांसह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित होते. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हनुमान गढी मंदिरात पूजा केली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधानांचं अयोध्येत स्वागत केलं.

कित्येक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर अयोध्येत राम मंदिर निर्माणाला सुरूवात झाली. यासाठी दुपारी १२ वाजून ४४ मि. वर मुहूर्त निश्चित करण्यात आला.

भूमिपूजन सोहळा संपन्न झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यातील ठळक मुद्दे…

  • प्रथम प्रभू रामचंद्रांचे, माता जानकीचे स्मरण करूया… `सियावर रामचंद्र की जय’ `सियावर रामचंद्र की जय’ `जय सियाराम’ `जय सियाराम’
  • आज हा जयघोष केवळ सियारामाच्या नगरीमध्येच ऐकू येत नाही तर संपूर्ण विश्वात हा जयघोष सुरु आहे. सर्व राम भक्तांना कोटी कोटी शुभेच्छा!
  • मी इथे येणारच होतो कारण `राम काजु किन्हें बिनु मोहि कहाँ बिश्राम’ (अर्थ- श्रीरामांचे कार्य केल्याशिवाय मला कुठली विश्रांती?) या ठिकाणी मला आमंत्रण देण्यात आलं हे माझं भाग्य. ह्या ऐतिहासिक क्षणाचं साक्षीदार होण्याची संधी दिली त्याबद्दल रामजन्मभूमी ट्रस्टचा मी आभारी आहे.
  • भारत आज शरयू तिरी एक सुवर्ण क्षणाचा अध्याय रचत आहे. आज संपूर्ण भारत राममय आणि प्रत्येक मन दिपमय झाला आहे. एवढ्या वर्षांची प्रतिक्षा संपली. आता रामलल्लासाठी एका भव्य मंदिराचं निर्माण होईल. तुटणं आणि पुन्हा उभं राहणं ह्या वर्षानुवर्षे क्रियेतून आज रामजन्मभूमी मुक्त झाली आहे.
  • राम मंदिरासाठी अनेक वर्षे अनेक पिढ्यांनी प्रयत्न केले. आजचा दिवस त्या संकल्प आणि त्यागाचं प्रतीक आहे. प्रभू श्रीराम आमच्या मनात आहेत. प्रत्येक कार्याचे ते प्रेरणा स्रोत आहेत. श्रीराम मंदिर सामूहिक शक्तीचं प्रतीक बनेल आणि इथे येणाऱ्यांना प्रेरणा मिळेल.
  • भगवान श्रीरामांची शक्ती अद्भूत आहे. अस्तित्व मिटविण्याचा हरएक प्रयत्न करण्यात झाला. तरीही श्रीराम आजही आम्हा प्रत्येकाच्या मनात आहेत, आपल्या संस्कृतीचा आधार आहेत. राम मंदिर निर्माणाची प्रक्रिया वर्तमानाला भूतकाळाशी, स्व ला संस्काराशी, `नर’ला नारायणाशी जोडण्याचं प्रतिक आहे. श्रीराम मंदिर आपल्या संस्कृतीचं आधुनिक प्रतिक बनेल. आपल्या शाश्वत आस्थेचं हे प्रतिक असेल. हे मंदिर कोट्यवधी लोकांच्या सामूहिक शक्तीचं प्रतिकही बनेल. हे येणाऱ्या पिढ्यांना साधना आणि संकल्पाची प्रेरणा देत राहील.
  • राम मंदिर राष्ट्राला जोडण्याची प्रक्रिया आहे. मंदिरासोबत इतिहारासाचीही पुनरावृत्ती होत आहे. कोरोनामुळे कार्यक्रम काही मर्यादांचं पालन करुन संपन्न होत आहे. प्रभू श्रीराम यांचा कार्यक्रम मर्यादांचं पालन करून झाला पाहिजे आणि तसंच देशवासियांनी केलं. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सर्वांनी एकमेकांच्या भावनांचा आदर केला. राम मंदिरासोबत फक्त नवा इतिहास रचला जात नाही तर इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे.
  • श्रीराम मंदिराचे कार्य देशातील नागरिकांच्या सहकार्यानं पूर्ण होत आहे. प्रभू श्रीरामाचं मंदिर म्हणजे एकजुटीचं प्रतीक आहे. श्रीराम गेल्या अनेक वर्षांपासून भारताचे स्तंभ बनले. श्रीरामाचं नाव असलेल्या शिळा देशातील अनेक भागांतून आल्या, (१९८९ पासून जगभरातून भक्तांनी राम मंदिरासाठी पाठविलेल्या तब्बल २ लाख ७५ हजार विटांतील १०० विटांवर ‘जय श्रीराम’ असं कोरलेलं आहे.) त्या एक ऊर्जा निर्माण करत आहेत. भारताची आध्यात्मिकता जगासाठी प्रेरणेचा विषय आहे.
  • राम मंदिराकडून आस्था, श्रद्धा आणि संकल्पाची प्रेरणा मिळत राहते. राम मंदिर अनंक काळापर्यंत मानवाला प्रेरणा देईल. जगातील अनेक देशातील लोक प्रभू श्रीरामांना मानतात आणि ते प्रभू श्रीरामांशी जोडलेले आहेत. त्यामुळे अनेक देशांमधील लोकांना राम मंदिराचं काम सुरू झाल्याबद्दल आनंद होत आहे. प्रभू श्रीराम हे सर्वांमध्ये आहेत व ते सर्वांचे आहेत. प्रभू श्रीरामाचा संदेश संपूर्ण विश्वापर्यंत निरंतर पोहोचविण्याची जबाबदारी वर्तमान आणि भावी पिढ्यांची आहे. सर्वांच्या सहकार्यानं राम मंदिराचं निर्माण होतंय.
  • मंदिर उभं राहिल्यानं अयोध्येची केवळ भव्यता वाढणार नाही तर अर्थतंत्रावरही परिणाम होईल. संपूर्ण जगभरातून इथे लोक प्रभू राम आणि माता सीतेच्या दर्शनासाठी येतील.