सिंगापूरच्या वर्ल्ड फिनटेक महोत्सव- मुंबईच्या स्टार्टअपबरोबर प्रधानमंत्री मोदींचा संवाद
प्रधानमंत्री मोदी ठरले फिनटेक महोत्सवात भाषण देणारे पहिले राष्ट्रप्रमुख
मुंबई:- जागतिक स्तरावरील सर्वात मोठ्या आर्थिक तंत्रज्ञान क्षेत्रातील तीन दिवसीय सिंगापूर फिनटेक महोत्सवात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारताच्या पॅव्हेलियनला भेट देऊन स्टार्टअपमध्ये सहभागी मुंबईतील तरुणांशी संवाद साधला आणि मुक्तकंठाने त्यांची स्तुती केली.
सिंगापूर येथे जागतिक स्तरावरील तिसऱ्या सिंगापूर फिनटेक महोत्सवात परिसंवाद व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात सहभागी जगभरातील १०० हून अधिक देशांतील ३० हजार प्रतिनिधींसमोर प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी या महोत्सवाचे प्रमुख भाषण केले. फिनटेक महोत्सवात प्रमुख भाषण देणारे श्री. मोदी हे पहिलेच राष्ट्रप्रमुख आहेत.
फिनटेक क्षेत्रात गुंतवणुकीसाठी भारत हा सर्वाधिक पसंतीचा देश असल्याचे सांगून श्री. मोदी म्हणाले की, फिनटेकची ताकद आणि डिजिटल कनेक्टिव्हिटीच्या सहाय्याने आम्ही अभूतपूर्व वेगाची क्रांती केली आहे. तंत्रज्ञानाद्वारे आणलेल्या ऐतिहासिक परिवर्तनाच्या युगात आम्ही आहोत. भारताने डेस्कटॉपवरून क्लाउड पर्यंत, इंटरनेट ते सोशल मीडियापर्यंत, आयटी सेवांमधून इंटरनेट ऑफ द थिंग्जपर्यंतची दीर्घ मजल अगदी कमी कालावधीत मारली आहे. भारतातील १.३ अरब नागरिकांपर्यंत वित्तीय क्षेत्राचे फायदे पोहोचविण्याचे काम केले आहे. अगदी अल्पकाळात देशातील सुमारे १.२ अरब नागरिकांचे बायोमेट्रिकसह आधार ओळखपत्रांचे काम तंत्रज्ञानाच्या मदतीने केले आहे. जनधन योजनेमध्ये प्रत्येक भारतीयाचे बँकेत खाते उघडण्याची मोहिम सुरू केली. तीन वर्षात भारतातील ३३ कोटी नागरिकांचे नवीन बँक खाते सुरू केले. याद्वारे आम्ही या सर्व ३३ कोटी नागरिकांना स्वतः ओळख, सन्मान आणि संधी दिली आहे.
आधार संलग्नित सूक्ष्म एटीएमच्या माध्यमातून देशभरातील ४ लाख गावांमधील घरापर्यंत बँकिंग क्षेत्र घेऊन जाण्यास आम्हाला यश मिळाले आहे. डिजिटल पायाभूत सुविधांमुळे जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना सुरू करण्यास भारत सरकारला यश आले आहे. आयुष्यमान भारत योजनेमुळे ५० कोटी भारतीयांना आरोग्य कवच प्राप्त झाले आहे, असेही प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी यावेळी सांगितले.
मुंबईच्या स्टार्टअपचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले कौतुक
फिनटेक महोत्सवातील प्रमुख भाषण झाल्यानंतर प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी भारतीय पॅव्हेलियनला भेट दिली. या पॅव्हेलियनमध्ये सहभागी स्टार्टअपपैकी सर्वाधिक ७० टक्के स्टार्टअप हे मुंबईतील आहेत. महाराष्ट्राच्या या स्टॉलला प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी आवर्जून भेट दिली व या स्टार्टअपचे कौतुक केले. यावेळी राज्याचे माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव एस.व्ही.आर. श्रीनिवासन यांच्यासह स्टार्टअपमध्ये सहभागी तरुण उपस्थित होते. प्रधानमंत्र्यांनी या तरुणांशी संवाद साधला. यावेळी अॅपेक्स एक्स्चेंज फॉर फिनटेकचे अनावरणही प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी केले.
प्रधान सचिव श्री. श्रीनिवासन यांनी या महोत्सवातील परिसंवादात भाग घेतला. यावेळी ते म्हणाले की, स्टार्टअपला पुढे आणण्यासाठी शासनाने त्यांच्या पाठिशी उभे राहणे गरजेचे आहे.
सर्वाधिक स्टार्टअप महाराष्ट्रात
देशातील एकूण १० हजार ९५० स्टार्टअपपैकी २१३० स्टार्टअप हे महाराष्ट्रात आहेत. यामध्ये एकूण २००.९६ कोटी रुपयांची गुंतवणूक आहे.