रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्ममुळे सहकार चळवळ लोकचळवळ बनेल – उपराष्ट्रपती

स्व. लक्ष्मणराव इनामदार जन्मशताब्दीनिमित्त विशेष व्याख्यान

मुंबई : ‘बिना संस्कार नही सहकार’हे तत्व लक्ष्मणराव इनामदार यांनी मानून समाजाला एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केले. ग्रामीण आणि शहरी भागाचा संतुलित विकास साधत असताना येणाऱ्या काळात ‘रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म’ यामुळे सहकार चळवळ ही लोकचळवळ बनेल असा विश्वास उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी काल येथे व्यक्त केला.

स्व. लक्ष्मणराव इनामदार जन्मशताब्दी समारोहानिमित्त मुंबई विद्यापीठात आज विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानात मार्गदर्शन करण्यासाठी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. राज्यपाल चे. विद्यासागर राव, विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे, शिक्षणमंत्री विनोद तावडे, स्व. लक्ष्मण इनामदार यांचे बंधू आणि परिवार, सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्योतिंद्र मेहता, सहकार भारतीचे राष्ट्रीय सचिव डॉ. उदय जोशी, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. सुहास पेडणेकर, प्र. कुलगुरु रवींद्र कुलकर्णी आदी यावेळी उपस्थित होते.

राष्ट्र पुनर्निर्माणाच्या प्रयत्नात सहकार क्षेत्राचे महत्त्व ओळखून सहकारी चळवळीची गुणात्मक वाढ होण्यासाठी ‘सहकार भारती’ गेली अनेक वर्षे ‘बिना संस्कार नही सहकार’या ध्येयाने कार्य करीत असल्याबाबत श्री. नायडू यांनी त्यांचे अभिनंदन केले.

श्री.नायडू आपल्या भाषणात म्हणाले, भारत हा कृषिप्रधान देश आहे असे आपण म्हणतो. हे खरे आहे ,कारण आजही भारतात 56 % लोकसंख्या शेती करते. आज भारताची कृषी उत्पादन क्षमता चांगली असली तरी भारताची लोकसंख्या पाहता येणाऱ्या काळात ही उत्पादन क्षमता टिकवून ठेवणे आवश्यक आहे. जागतिक तापमान वाढ, कमी पाऊस, वाढते औद्योगिकीकरण, शहरीकरण यामुळे आपण शेती आणि शेतीपूरक क्षेत्रापासून दूर जात आहोत. म्हणूनच येणाऱ्या काळात शेतीमध्ये प्रयोग होणे आवश्यक असताना शेती क्षेत्राला सहकार चळवळीची जोड मिळणे आवश्यक आहे. केंद्र शासनाच्या शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध योजना या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक असून येणाऱ्या काळात या क्षेत्रालाही आधुनिक तंत्रज्ञानाशी अधिकाधिक सांगड घालणे आवश्यक ठरणार आहे.

सहकार चळवळ लोकचळवळ होणे ही काळाची गरज

सहकार चळवळ ही लोकचळवळ होणे ही काळाची गरज असून यासाठी सहकारी संस्था आणि आपल्यामध्ये परस्पर समन्वय, पूरकता आणि आपुलकीची भावना असणे आवश्यक आहे. स्वच्छ भारत ही आज एक लोकचळवळ झाली आहे तसेच येणाऱ्या काळात सहकार चळवळ लोकचळवळ होणे आवश्यक असून यामुळेच सहकारी क्षेत्रासमोरील प्रश्‍नांची सोडवणूक होऊ शकेल. उदारीकरणाच्या आणि जागतिकीकरणाच्या रेट्यामध्ये आर्थिक क्षेत्राला सहकारी चळवळच पर्याय ठरू शकते. मुक्त अर्थव्यवस्थेमध्ये सहकार हा एक समर्थ पर्याय आहे. सहकारी चळवळीतील आपण सर्वांनी एकत्र येण्याची, सुसंस्कारित होण्याची आणि सहकार चळवळीची व्याप्ती व सक्षमता प्रदर्शित करण्याची हीच वेळ असून असे करीत असताना यामध्ये महिला आणि युवकांचा सहभाग वाढविणे ही काळाची गरज आहे.

शेअर आणि केअर ही आपली संस्कृती

शेअर आणि केअर ही आपली भारतीय संस्कृती आहे. आणि याबरोबरच कुटुंब, समाज आणि देश यांच्याबरोबर आपली सहकारी वृत्ती असणे आवश्यक आहे. कोणत्याही व्यवस्थेमध्ये स्पर्धा सिमित आहे तर सहकारामध्ये असिमित आहे हे लक्षात घेणे आवश्यक आहे. विविधतेत एकता अशीच आपल्या भारताची ओळख आहे. आपल्या भारतातील अनेक लोकांनी वेगवेगळ्या कालखंडामध्ये वेगवेगळ्या प्रांतात, क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. आज शेतकरी किरकोळ दरात खरेदी करतो आणि घाऊक दरात विकतो. दलाली बंद करण्यासाठी आणि उत्पन्न वाढवण्यासाठी ही प्रक्रिया उलट करणे गरजेचे आहे. जनतेच्या समस्या सोडविण्याची क्षमता सहकार चळवळीत आहे. भारतीय समाजाच्या स्वभावाला अनुरुप अशी सहकार चळवळ आहे.

यावेळी विधानसभा अध्यक्ष यांनी आपल्या भाषणात स्व. लक्ष्मणराव इनामदार यांनी सहकार चळवळीसाठी दिलेले योगदान आणि केलेले कार्य नमूद केले. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. पेडणेकर यांनी प्रास्ताविक केले. तर सहकार भारतीचे राष्ट्रीय सचिव डॉ. उदय जोशी यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *