लोककल्याणकारी हेडमास्तर : शंकरराव चव्हाण साहेब

लेखक:- श्री. माधव विश्वनाथ अंकलगे सर,
मु. पो. – वाटद खंडाळा, ता. जि. रत्नागिरी – ४१५६१३.
संपर्क – ९७६४८८६३३०, ९०२१७८५८७४.

 

जगात विविध प्रकारचे माणसे असतात. त्यातील काहीजण आपल्या आयुष्यात मर्यादित स्वभावामुळे व्यक्ती बनतात. तर काहीजण मात्र आपल्या असामान्य कार्यामुळे व्यक्तीमत्व बनतात. त्यातील काहीजण हे जन्मतःच महान असतात; तर काहीजणांवर हा मोठेपणा परंपरेतून लादला जातो. मात्र यापलीकडे जाऊन काही व्यक्तिमत्व असे असतात की, जे स्वतःच्या कर्तृत्वावर असामान्य कार्याच्या जोरावर महनीय बनतात. आहे त्या प्रवाहात वाहत जाण्यापेक्षा आणि प्रवाहाच्या विरोधात पोहत राहण्याऐवजी ते आपल्या कर्तृत्वाने स्वतःचा नवा प्रवाह निर्माण करतात आणि त्या प्रवाहात सर्वांना सामील करून घेतानाच अनेकांना मार्गदर्शक ठरत असतात. त्यांच्यासाठी दिशादर्शक बनतात. अशा दिशादर्शकामध्ये महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा केंद्रात ज्यांनी संरक्षण मंत्री, गृहमंत्री, वित्तमंत्री, शिक्षण मंत्री, परराष्ट्रमंत्री, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते या व अशा विविध जबाबदाऱ्या अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडणारे स्वर्गीय शंकरराव चव्हाण साहेब यांचा समावेश होतो. वरील जबाबदाऱ्या पार पाडतानाच, आपल्या पन्नास वर्षाच्या कालावधीत आपल्या राजकारणाचा अजेंडा हा सर्वसामान्य लोकांना गृहीत धरून ठेवण्यात ज्यांनी यश मिळवत लोकांच्या मनाचा ठाव घेतला, असे आदरणीय व्यक्तिमत्त्व म्हणजे स्वर्गीय शंकरराव चव्हाण साहेब.

ब्रिटिश सरकारच्या विरोधात केलेले आंदोलने वा मराठवाडा मुक्ती संग्रामात स्वामी रामानंद तीर्थ यांच्यासोबत केलेले अलौकिक कार्य आणि स्वातंत्र्योत्तर काळात त्यांनी विविध विकासकामांच्या माध्यमातून केलेला त्याग हा कायमचा स्मरणात राहतो. एवढेच नव्हे तर त्यानंतरही त्यांनी आपल्या निःस्वार्थी आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर अनेक लोकोपयोगी योजना आखून त्या यशस्वीपणे प्रत्यक्षात आणून दाखवल्या. त्यामागील महत्वाचे कारण म्हणजे ते मुख्यमंत्री होण्यापूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांनी अनेक जबाबदाऱ्या यशस्वी पूर्ण केल्या होत्या. कोणत्याही कामावर वैयक्तिकरित्या लक्ष ठेवून त्याकामात अचुकता आणण्याचा त्यांचा प्रयत्न असायचा. त्यांच्या याच प्रयत्नांतून भारतात त्याकाळापासून आजपर्यंत असंख्य योजना कागदावर आल्या आणि पूर्ण देखील झाल्या; मात्र कोणत्याही योजनेत शिल्लक राहिलेली रक्कम आपल्याला पाहायला मिळत नाही. मात्र याबाबत स्वर्गीय शंकरराव चव्हाण हे अपवाद ठरतात. कारण ते ज्यावेळी पाटबंधारे खात्याचे मंत्री होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत आपल्या खात्यावर आणि होणाऱ्या नाहक खर्चावर नियंत्रण ठेवताना, काटकसरीने काम करून जायकवाडी धरणाच्या कामात २ कोटी ७० लाख रुपयांची बचत त्यांच्या मार्गदर्शनाखाली पाटबंधारे खात्याच्या अधिकारी – कर्मचाऱ्यांनी केली होती. या सोळा टक्के बचतीची शाबासकी म्हणून त्यांनी लगेचच पाटबंधारे खात्याच्या कर्मचाऱ्यांना चार लाखांची बक्षिसेही दिली होती. हा अलौकिक योग्य आजच्या काळात पाहायला मिळत नाही, हे आजच्या महाराष्ट्राचे आणि भारताचे दुर्दैव म्हणायला हरकत नाही. असो. म्हणूनच त्यांची विविध खात्यांची कारकीर्द असो वा मुख्यमंत्री पदावरील कारकीर्द असो, त्यांच्या सर्वच कारकीर्द ह्या त्यांच्यातील कठोर आणि कर्तव्यतत्पर प्रशासकांच्या अर्थातच हेडमास्तरांच्या नजरेतून उल्लेखनीय ठरल्या. त्यांच्या याच करड्या व शिस्तबद्ध कार्य करण्याच्या पद्धतीने अनेक धरणे, वीज केंद्रे, अनेक योजना उभारत महाराष्ट्रासह भारताच्या ग्रामीण भागात विकासाची नवी व्याख्या तयार केली. म्हणूनच त्यांची कारकीर्द नक्कीच वाखाणण्याजोगी ठरते. त्यांच्या याच लोकोत्तर कार्याचे त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त स्मरण करणे गरजेचे आहे. त्यांच्या या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या कार्याला मनःपूर्वक अभिवादन!

स्वर्गीय शंकरराव चव्हाण यांचा जन्म १४ जुलै रोजी संत एकनाथ यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पैठण येथे झाला. त्यांचे वडील भाऊराव चव्हाण आणि आई लक्ष्मीबाई यांच्या आदर्शवत संस्काराचे कोंदण त्यांच्यावर झाले. त्यामुळे स्वर्गीय चव्हाण साहेब हे आयुष्यात कधीही पदाला वा पदापोटी मिळणाऱ्या आकर्षणाला भुलले नाहीत वा त्यासाठी त्यांचे हात कधी शिवशिवले नाहीत किंवा त्या मार्गाने कधीही त्यांचे पाय वळले नाहीत. एक किस्सा सांगायचा म्हणजे ज्यावेळी ते मुख्यमंत्री होते, त्यावेळी त्यांच्या कार्याचा गौरव करणारी पुस्तिका काढण्याचे तत्कालीन त्यांच्या पत्रकार मित्रांनी ठरवले. मात्र स्वतः शंकरराव चव्हाण साहेब हे अबोल आणि कोणत्याही प्रकारचा बडेजाव करणारे नव्हते. किंवा आताच्या पदाधिकारी आणि नेत्यासारखे काम इंचभर आणि त्याचा फोटो मीटरभर करणारे नव्हते. त्यामुळे त्यांचे सर्वसामान्य लोकांना संधी देणारे आणि त्याच सर्वसामान्य लोकांना पुढे आणणारे कार्य झाकोळले गेले असे म्हटल्यास वावगे ठरू नये. कारण प्रसिद्धीची हाव त्यांना कधीच आढळली नाही. म्हणूनच त्यांचे कार्य उल्लेखनीय ठरते.

एकत्रित कुटुंब असल्याने सर्वच भार हा भाऊराव चव्हाण यांच्यावर होता. त्यामुळे शंकरराव आणि मोठे बंधू गोपाळराव यांनी हैद्राबाद जवळ केले. तेथे शिकवण्या घेत आपले उच्च शिक्षण पूर्ण केले. तेवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर त्यांनी वकिलीचे शिक्षण घेतले. हे शिक्षण पूर्ण होत असतानाच त्यांचा विवाह कुसुमताई यांच्याशी झाला. विशेष म्हणजे एवढे जास्त शिक्षण असतानाही भाऊराव यांनी एकही रुपया हुंडा म्हणून घेतला नाही. उलट लग्न अगदी साधेपणाने करत आपल्या मनातील पुरोगामी विचारांचा प्रभाव दाखवून दिला. वकिलीचे शिक्षण घेत असतानाच त्यांचा परिचय स्वामी रामानंद तीर्थ व त्यांच्या सहकाऱ्यांशी झाला. तेथून त्यांच्या आयुष्याला नवी दिशा मिळाली. त्यांनी युवकांचे संघटन करायला सुरुवात केली. हैदराबाद येथे अनेक अडचणी यायला लागल्या म्हणून त्यांनी उमरखेड येथील आश्रमातून आपल्या संघटन कार्याला सुरुवात केली. त्याचा हा परिणाम झाला की, शंकरराव चव्हाण यांचे कार्य स्वामींजीच्या नजरेत भरले. त्यांनी साहेबांची हैद्राबाद स्टेट काँग्रेसच्या सचिवपदी निवड केली. साहेबांनी स्वामीजींच्या सूचनेनुसार काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी आपला वकिलीचा व्यवसाय करत त्यांनी सामाजिक कार्यात मोठी झेप घेतली. त्यावेळी त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांना पत्र लिहून पक्षासाठी काम करण्याची इच्छा व्यक्त करत तत्कालीन परिस्थितीचे गांभीर्य त्यांच्या लक्षात आणून दिले. त्यामुळे त्यांना अजून काम करण्याची संधी उपलब्ध झाली. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर स्वातंत्र्याच्या वातावरणातील पहिलीच सार्वत्रिक निवडणूक१९५२ साली झाली. त्यावेळी इच्छुक नसतानाही त्यांना काँग्रेसने उमेदवारी दिली. परिणामी इच्छुक असणारे अनेकजण नाराज झाले. आणि त्यांनी साहेबांच्या विरोधात परका उमेदवार म्हणून प्रसार केला. त्याचा परिणाम असा झाला की, चव्हाण साहेब काहीशा मतांनी पराभूत झाले. आयुष्याच्या उभारणीत ही पहिलीच निवडणूक आणि त्यातही उद्वेग आणणारा प्रचार पाहून ते उदास झाले आणि त्यांनी नांदेड सोडण्याचा निर्णय घेतला. परंतु तत्कालीन ज्येष्ठ सहकाऱ्यांनी त्यांचे मन वळवले. आणि थोड्याच कालावधीत आणि नांदेड शहराच्या इतिहासातील पहिली झालेली नगरपालिकेची निवडणूक त्यांनी लढवली आणि ते जिंकले. मग मात्र त्यांनी पाठीमागे वळून पाहिले नाही. त्यांच्या राजकीय जीवनाचा आलेख सतत चढता राहिला. ज्यावेळी निवडणुकीत त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आणि पुन्हा एकदा नियतीने त्यांच्या समोर नगराध्यक्ष पदाची खुर्ची दिली. महत्वाचे म्हणजे ज्यावेळी नगराध्यक्ष निवड झाली. त्यानंतर काहीच दिवसात झालेल्या सत्काराला उत्तर देताना त्यांनी सांगितले की, या शहराच्या विकासासाठी मला लोकांनी, लोकांच्या कल्याणासाठी निवडुन दिले आहे. त्यामुळे या पदावर असतानाचा पूर्ण वेळ हा लोकांच्या कल्याणासाठी व शहरांच्या विकासासाठी देईन. हा त्यांचा शब्द त्यांनी आपल्या याच नगराध्यक्ष पदाच्या कारकिर्दीतच नाही तर आयुष्यात ज्या – ज्या ठिकाणी त्यांना संधी मिळाली त्या – त्या ठिकाणी त्यांनी या लोकनियुक्त पदांचा वापर केला. लोकनियुक्त नगराध्यक्ष असतानाही त्यांनी कधीही आपल्या पदाचा गैरवापर केला नाही. एक प्रसंग आठवतो – एके संध्याकाळी ते नांदेड शहरात फिरत असताना त्यांना पोलिसांनी अडवले व त्यांचे वाहन म्हणजेच सायकल जप्त केली. मात्र या लोकनेत्याने त्याचा कधीही आणि कसलाही बडेजाव न करता योग्य तो दंड भरून आपली सायकल सोडवून घेतली. आजच्या भ्रष्ट झालेल्या आणि स्वार्थाने बोकाळलेल्या व्यवस्थेत साहेबांचा हा आदर्श शोधूनही सापडणे मुश्कील. आजच्या परिस्थतीची या प्रसंगाची तुलना कोणत्याही परिस्थितीत होत नाही. मात्र शंकरराव चव्हाण साहेब यांच्यावर त्यांनी त्यांच्या काळात केलेले कार्य नांदेडकर अजूनही विसरले नाहीत. म्हणूनच त्यांचे, त्यांच्या कुटुंबियांचे आणि नांदेडकरांचे नाते घट्ट बनले आहे. नगराध्यक्ष म्हणून कार्य करत असताना साहेबांनी आपल्या संघटनकौशल्याच्या जोरावर पक्ष पातळीवरही काम करायला सुरुवात केली. त्यांचे हेच कार्य महाराष्ट्राच्या आधुनिक विकासाचे नेते यशवंतराव चव्हाण साहेब यांनी निरीक्षणात्मक पाहिले. आणि कोणत्या ही सभागृहाचे सदस्य नसतानाही त्यांना महाराष्ट्र राज्याच्या मंत्रीमंडळात महसूल खात्याचे उपमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. ही संधी त्यांचे कार्य विस्तार करण्यासाठी खुप मोठी आहे हे त्यांच्यातील चाणाक्ष बुद्धीने हेरले. आणि बघता – बघता आपल्या अभ्यासू वृत्तीने त्यांनी या विभागाला लोकोपयोगी बनवले. महत्वाचे म्हणजे एकदा या खात्यात उपमंत्री असतानाही त्यांना आपल्याच सरकारने घेतलेला निर्णय पटला नाही व या निर्णयातून सर्वसामान्य लोकांचा भ्रमनिरास होऊ शकतो अशी त्यांची खात्री झाल्याने त्यांनी या निर्णयाबाबत राज्याच्या वरिष्ठांशी चर्चा केली. मात्र त्यांनी आपली अगतिकता दर्शवताच स्वर्गीय चव्हाण साहेबांनी थेट तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्याशी चर्चा करून सदर निर्णयातील फोलपणा दाखवत; त्या कंपनीचा बनावटपणा उघड केला. परिणामी त्यांच्या अभ्यासपूर्ण केलेल्या स्पष्टीकरणामुळे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र सरकारचा निर्णय बदलला. त्यांच्यातील याच धाडसाचे कौतुक यशवंतराव चव्हाण आणि वसंतराव नाईक यांनी केले. तेंव्हापासून त्यांच्याबद्दल पक्षात आणि महाराष्ट्र्रासह भारतात एक अभ्यासू तथा धाडसी नेते म्हणून नवी ओळख निर्माण झाली.

महसूल खात्याचे उपमंत्री म्हणून आपल्या कार्याची छाप सोडल्यानंतर 1957 च्या सार्वत्रिक निवडणुकीत ते आमदार म्हणून निवडून आले. यावेळी मात्र त्यांच्याकडे पाटबंधारे खाते देण्यात आले. स्वर्गीय शंकरराव चव्हाण यांच्या कार्याबद्दलचा अनुभव सर्वांनाच आला होता. पाटबंधारे खात्याचे मंत्री झाल्यापासून त्यांच्या कार्याचा झपाटलेपणाचा अनुभव कागदावर निष्णात असलेल्या नोकरशाहीला आला. कारण स्वतः साहेब कधीही मंत्रालयात उशिराने आले नाहीत. ज्यावेळी ते या खात्याचे मंत्री झाले त्यावेळी त्यांनी या खात्याच्या माध्यमातून मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोंकण, खान्देश या सर्व विभागात जलसिंचनाच्या सोयी उपलब्ध करून दिल्या. महाराष्ट्रातील बराचसा वर्ग हा शेतीवर अवलंबून आहे. दुर्दैवाने तत्कालीन राज्यकर्त्यांच्या अनास्थेमुळे पश्चिम महाराष्ट्र वगळता कोणत्याही भागात जलसिंचनच्या सोयी उपलब्ध नव्हत्या. साहेबांनी ही बाब हेरली आणि त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात जलसिंचनाच्या सोयी उभारण्यावर भर दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे नेहमी म्हणायचे की, भारतातील शेतकरी जर समृद्ध करायचा असेल तर त्याला पाणी आणि विजेच्या सुविधा उपलब्ध करून द्यायला हव्यात. स्वतंत्र भारतात शंकरराव चव्हाण यांनी डॉ. बाबासाहेबांच्या विचारांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. साहेबांच्या दूरदृष्टीचे एक उत्तम उदाहरण म्हणजे गोदावरी नदीवरील जायकवाडी धरण, या धरणावर निर्माण केलेले पैठणजवळील नाथसागर तलाव आणि विष्णुपुरी प्रकल्प. जायकवाडी धरणामुळे संपूर्ण मराठवाड्याचे चित्र पालटले तर नाथसागर धरणाने औरंगाबाद, पैठण, परभणी, जालना या शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघाला आणि त्याहूनही महत्वाचे म्हणजे कोणत्याही विस्थापनाशिवाय आणि गावे बुडीताखाली जाण्याशिवाय केलेला, आशियातील पहिला प्रकल्प म्हणजे नांदेडजवळचा विष्णुपुरी प्रकल्प. असा एकमेव प्रकल्प आहे की, यामुळे कोणत्याही प्रकारचे विस्थापन शासनाला करावे लागले नाही. हाच प्रकल्प आता नांदेड परिसर आणि नांदेड शहरासाठी वरदान ठरत आहे. काहीजण तर जायकवाडी प्रकल्प, नाथसागर तलाव, विष्णुपुरी प्रकल्प हे साहेबांचे स्वप्ने आहेत असे म्हणायचे. कारण महाराष्ट्रात मंत्री म्हणून काम करतानाही आणि केंद्रात गेल्यानंतर ही त्यांनी या प्रकल्पाकडे स्वतःचे काम म्हणूनच पाहिले. एकवेळ तर अशी आली की, याकामासाठी निधी कमी पडला त्यावेळी स्वतः साहेबांनी केंद्रीय पाटबंधारे मंत्री बाबू जगजीवनराम यांच्याशी केंद्रात जाऊन चर्चा करून पुन्हा याकामासाठी निधी आणला. हे प्रकल्प व्हावेत ही इच्छा फक्त शंकरराव चव्हाण साहेब आणि सर्वसामान्य जनतेच्या मनात तीव्रतेने होती. बाकी सर्वच स्तरांतून त्यांच्या या प्रकल्पाची हेटाळणी होत होती. दुसरा एखादा राजकिय नेता असता तर त्यांनी कधीच हा प्रश्न सोडून दिला असता, मात्र साहेबांच्या चिकाटीपुढे सर्वच विरोधक नामोहरम झाले आणि मराठवाड्यात हरित क्रांती खऱ्या अर्थाने अवतरली. आजच्या काळात एक मनात नक्कीच विचार केला तर आपल्या लक्षात येते की, साहेब आणि त्यांच्या इच्छाशक्तीने हे प्रकल्प पूर्ण केले नसते, तर आजही मराठवाड्याचा अनुशेष कितीतरी पटीने वाढला असता. मात्र या दूरदृष्टीच्या जलदुताने या बाबतीत नियतीला हरवत लोकांच्या चेहऱ्यावर हसू फुलवले.

साहेबांनी महाराष्ट्रात केलेल्या कामाची दखल केंद्रीय नेतृत्वाने घेत त्यांना नांदेड मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढविण्यास सांगितले. साहेबांनी देखील वरिष्ठांचा आदेश शिरसावंद्य मानत ही निवडणूक लढविली आणि मोठ्या फरकाने जिंकली देखील. त्यांना लगेचच शिक्षण मंत्री आणि नियोजन खात्याचे मंत्री म्हणून कार्यभार करण्याची संधी मिळाली. त्यातही साहेबांनी कसलीही कसर न सोडता आपल्या अभ्यासपूर्ण नेतृत्वाच्या जोरावर या दोन्ही खात्यात आपल्या कामाचा ठसा उमटवला. आपल्या देशात देखील शिक्षणाचा प्रसार झाला पाहिजे, सर्वसामान्य लोकांना व त्यांच्या मुलांना कमी खर्चात शिक्षणाचा आनंद घेता आला पाहिजे, परदेशातील शिक्षणापेक्षा आपल्या देशातील शिक्षणाचा दर्जा उत्कृष्ट असला पाहिजे यासाठी ते सतत आग्रही राहिले. त्यासाठी त्यांनी अनेक उपाययोजना केल्या, परिणामी अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणाची दारे उघडली आणि नवी दिशा मिळाली. नियोजन आयोगाच्या माध्यमातून विकास नावाची संकल्पना ही गावातील, वाडीतील, तांड्यावरील गोरगरीब जनतेच्या मनात उतरली पाहिजे यासाठी त्यांनी खुप प्रयत्न केले. आपल्या अधिकारात येणाऱ्या सर्व अधिकारी, कर्मचारी यांना आपल्या कामाप्रती सोबत घेऊन, नोकरशाही काम करत नाही हा समज चुकीचा ठरवत अंदाजपत्रकीय खर्चापेक्षा प्रत्यक्ष खर्च हा कमी करून दाखविला. ज्याप्रमाणे त्यांनी आपल्या लोकोपयोगी कामासाठी आपली मुख्यमंत्री पदाची कारकीर्द गाजविली. त्याचप्रमाणे त्यांनी केंद्रात गृहमंत्री असताना अनेक आव्हाने सहजपणे लिलया पेलत यशस्वी कारकीर्द घडविली. काश्मीर प्रश्न, काश्मीरमधील निवडणुका, अतिरेकी यांच्यावरील कारवाया, पंजाबमधील अशांतता, मुंबई मधील अतिरेकी हल्ले, दंगली, पुर्व भारतातील प्रश्न, बाबरी मशीद पतन इत्यादी बाबी त्यांनी सहज हाताळल्या. एवढेच नव्हे तर त्यांना या बाबीत अनेकदा जीवघेण्या प्रसंगांना सामोरे जावे लागले. काश्मीरमध्ये लोकशाही मार्गाने कारभार चालावा यासाठी शंकरराव चव्हाण साहेबांनी निवडणुका घेण्यासाठी स्वतः जनजागृती केली. ही जनजागृती करताना त्यांच्या गाडीच्या ताफ्यावर अतिरेक्यांनी हल्ला केला. त्यात ते थोडक्यात बचावले. तसेच जायकवाडी प्रकल्पाचे समर्थन करण्यासाठी ते एकदा प्रकल्पग्रस्तांच्या भेटीसाठी आले होते. विशेष म्हणजे यावेळी त्यांना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी आणि इतरांनीही प्रकल्पग्रस्तांच्या भेटीसाठी जाण्याचे टाळावे असा सल्ला दिला. मात्र लोकसेवेचे व्रत मनापासून हाती घेतलेल्या या लोकनेत्याने या प्रकल्पाचे महत्व लक्षात घेऊन भेटीसाठी जाण्याचे ठरवले. पण ते जात असतानाच घाटात त्यांच्या ताफ्यावर असंख्य भले मोठे दगड घरंगळत येऊन पडले. नशीबाने त्यांच्या गाडी पास होण्याची आणि दगड पडण्याची वेळ थोडक्यात चुकली. म्हणून साहेब थोडक्यात बचावले. असे अनेक प्रसंग त्यांच्यावर आले. मात्र शंकरराव चव्हाण साहेबांनी कधीही आपल्या ध्येयापासून स्वतःला विचलित केले नाही वा तसे त्यांनी कधीही जाणवू दिले नाही.

भारताच्या स्वातंत्र्योत्तर काळात अनेकांनी आपली खुर्ची सोडली नाही. मध्यंतरीच्या काळात तर सर्वोच्च न्यायालयाला स्पष्ट सूचना कराव्या लागल्या होत्या की, सरकारी बंगले सोडा म्हणून. तरीही काहीजणांनी ते सोडले नाहीत. सरकारी गाड्या बाबतही तसेच. मात्र या सर्वांमध्ये मोजके लोक असे होते की, त्यांना हे सत्तेचे गुऱ्हाळ कधी चिकटले नाही वा त्यांनी तसे चिकटू दिले नाही. त्यामध्ये स्वर्गीय शंकरराव चव्हाण साहेब हे नक्कीच येतात. कारण ज्यावेळी त्यांचे पहिल्यांदा मुख्यमंत्रीपद गेले. त्यावेळी त्यांनी तात्काळ सरकारी बंगला सोडला. अनेक वर्षे मंत्री आणि मुख्यमंत्री राहिलेल्या या ध्येयासक्त व्यक्तिमत्वाला मुंबईत रहायला घर मिळत नव्हते. दोन्ही मुले तर शिकायला मुंबईत होते. साहेबांनी तर घरी सांगितले की, तुम्ही आता नांदेडला परत जा. सर्वच कुटुंबियासमोर प्रश्न निर्माण झाला की, आता काय करायचे. शेवटी कसाबसा त्यांना आमदार निवासाच्या एक खोलीत आपला संसार थाटावा लागला. ज्या ध्येयाने त्यांनी मराठवाडा मुक्तीसंग्रामाची लढाई लढली, त्याच ध्येयाने त्यांनी महाराष्ट्राची आणि दिल्लीत राहून देशाची सेवा केली. आजच्या भ्रष्टाचाराने भरलेल्या वातावरणात शंकरराव चव्हाण साहेबांचे कार्य पाहिले की, असा निःस्वार्थी नेता शोधूनही सापडत नाही हे पटते.

स्वर्गीय स्वर्गीय शंकरराव चव्हाण साहेब हे आयुष्यभर निःस्वार्थी वृत्तीने जगले. म्हणूनच त्यांच्या पक्षांच्या वरिष्ठ पातळीवर त्यांच्याबाबतीत एक आदरयुक्त दरारा होता. त्यांच्या याच कारणामुळे त्यांनी ज्या – ज्या योजनांसाठी निधी मागितला किंवा शिफारस केली त्या – त्या योजनांना केंद्राकडून कधीही नकार दिला नाही किंवा त्यांच्या सूचना वा शिफारशी फेटाळल्या नाहीत. म्हणूनच त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या दोन्ही टर्म आणि राज्यातील तसेच केंद्रातील सर्वच मंत्रीपदाचा कारभार अत्यंत यशस्वी झाल्या. निजामाच्या गुलामगिरीत आणि नंतर सरकारी बांबूच्या फायलीत अडकलेल्या मराठवाड्याला त्यांनी विविध धरणांच्या माध्यमातून नवसंजीवनी दिली. ज्याप्रमाणे रान पेटवून क्रांती घडवून आणली जाते, त्याप्रमाणेच रानाला पाणी देऊनही नवी क्रांती घडवून आणता येते हे साहेबांनी दाखवून दिले. कोयना, वारणा, कन्हेर, दूधगंगा, सुर्या, अप्पर वर्धा, पेंच, मनार, मांजरा, नांदूर मधमेश्वर, लेंडी, खडकवासला, पूर्णा, मुळा, काळमावडी, तेरणा, घोड, सुखी हे व यासह अनेक प्रकल्प हाती घेऊन यशस्वी केले. म्हणूनच त्यांना आधुनिक भगीरथ असे म्हटले जाते.

लेखाच्या शेवटी एक उल्लेख करावासा वाटतो की, साहेबांना हेडमास्तर ही पदवी काहीजणांनी उपहासात्मक लावली. परंतु याच उपहासाला त्यांनी सकारात्मक घेत प्रशासन प्रमुख कसा असावा याचे उदाहरण सादर केले. शाळेचे हेडमास्तर हेच जर कणखर असतील तर शाळा सुरळीत चालू राहते. आणि हेच चव्हाण साहेबांनी आपल्या अभ्यासूपणातून दाखवुन दिले. परंतु तत्कालीन परिस्थितीचे अवलोकन करता साहेबांचा मितभाषी स्वभाव आणि लांगुलचालन न करणे किंवा कोणत्याही कामाचा बडेजाव न करणे किंवा हुजरेगिरी न करणे ह्या बाबीमुळे त्यांचे हिमालयाएवढे कर्तृत्व झाकोळले गेले किंवा ते कायमच झाकोळले जावे यासाठी व्यवस्था तयार करण्यात आली. मला तर असे वाटते की, त्यांच्या कार्याची ठळकपणे ओळख नव्या महाराष्ट्राला होऊ नये म्हणूनच काहीजणांनी मुद्दामहूनच हेडमास्तर किंवा मराठवाड्याचे नेतृत्व अशी संकुचित बिरुदावली निर्माण केली की काय असे वाटते. मात्र स्वर्गीय शंकरराव चव्हाण साहेबांच्या कार्याकडे वा जीवनाकडे पाहता त्यांनी आपल्या खात्याच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात विकासाची गंगा आणली. त्यासोबतच लोकानूनय आणि लोकसंग्रहापेक्षा लोककल्याणकारी कामावर लक्ष केंद्रीत केले. लोककल्याणकारी योजनांना हेडमास्तरांसारख्या अभ्यासाने यशस्वीपणे राबविण्यात महत्वाची भूमिका बजावली. म्हणूनच त्यांच्या या कार्याचा गौरव करणे काळाची गरज आहे. भ्रष्टाचाराने बरबटलेल्या वातावरणात देशातील तरुणाईच्या मनात राजकारणाबद्दल नैराश्याने ग्रासले असताना स्वर्गीय शंकरराव चव्हाण साहेब यांचे जीवनचरित्र आणि त्यांचे कार्य मार्गदर्शक ठरेल. ‘न खाऊंगा और न खाने दुंगा’ या लोकप्रिय घोषणेच्या कितीतरी आधी प्रशासनातील नोकरशाहीच्या आणि चुकीचे काम करणाऱ्या प्रवृत्तींच्या विरोधात स्वर्गीय शंकरराव चव्हाण साहेबांनी हेडमास्तराप्रमाणे छडी उगारत प्रशासनात शिस्त आणली. सत्ता व त्यातून मिळणारे पद हे सर्वसामान्य लोकांसाठी असते याची पूर्ण जाणीव ठेवत, सत्तेचा लाभ हा लोकोपयोगी योजनांसाठी असतो हे स्वर्गीय शंकरराव चव्हाण साहेबांनी प्रत्यक्षात आणले. म्हणूनच त्यांचे कार्य आणि त्यांचे विचार येणाऱ्या पिढीला नक्कीच दिशादर्शक ठरतील यात शंका नाही. त्यांच्या संपूर्ण पन्नास वर्षाच्या काळात असे असंख्य प्रसंग मिळतात ज्यातुन त्यांची लोकांशी असणारी निष्ठा दिसून येते. म्हणूनच त्यांच्या याच सामाजिक क्षेत्रासह विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेत त्यांना डॉक्टरेट ही मनाची पदवी प्रदान करण्यात आली. अशा या लोकल्याणकारी योजनांच्या पुरस्कृत्या नेत्याला जन्मशताब्दी वर्षानिमित्त मनःपूर्वक अभिवादन आणि सर्वांनाच त्यांच्या शताब्दी जयंतीनिमित्त खुप – खुप शुभेच्छा!

You cannot copy content of this page