शिक्षणप्रसारक : राजर्षी शाहू छत्रपती महाराज

 

लेखक:- श्री. माधव विश्वनाथ अंकलगे सर,
मु. पो. – वाटद खंडाळा, ता. जि. रत्नागिरी – ४१५६१३.
संपर्क – ९७६४८८६३३०, ९०२१७८५८७४.

 

इंग्रज सरकारच्या शिक्षणाच्या झिरपण्याच्या सिद्धांताला विरोध करतानाच शिक्षणाचे महत्व ओळखून त्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे एक दृष्ट्ये समाजसुधारक म्हणजे महात्मा फुले. ते शिक्षणाचे महत्व सांगताना एके ठिकाणी म्हणतात की,

विद्येविना मती गेली,
मतिविना गती गेली,
गतिविना नीती गेली,
नीतिविना वित्त गेले
वित्ताविना शूद्र खचले
एवढे अनर्थ एका अविद्येने केले.

सर्वसामान्य लोकांना नीतीवंत बनवण्याचे साधन म्हणजे शिक्षण आहे आणि जी व्यक्ती शिक्षण घेईल ती नक्कीच जगाच्या पाठीवर यशस्वी होतानाच मनावर असलेले मानसिक गुलामगिरीचे जोखड उतरवून विचारांच्या बुरसटलेल्या कल्पना सोडून मानवतावादी नवीन विचारांना आत्मसात करेल. हाच शिक्षणाच्या महत्तेचा धागा कोल्हापूर संस्थानात राजर्षी शाहू महाराज यांनी आपल्या लोकांसाठी गिरवला. नुसताच गिरवला नाही तर त्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला त्याच्या स्वत्वाची ओळख करुन दिली. त्यांच्या शिक्षण प्रसारक धोरणांचा खऱ्या अर्थाने आजही अभ्यास होणे गरजेचे आहे.

आज २६ जून. त्यांची १४६ वी जयंती. त्यांच्या जयंतीनिमित्त राजर्षी शाहू महाराज यांच्या लोकोत्तर शिक्षणविषयक विचारांना मनःपूर्वक अभिवादन!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचे काळानुसार दोन भाग झाले. त्यातील कोल्हापूर गादीवर असलेल्या चौथे शिवाजी महाराज यांचे ब्रिटिशांनी आणि काही स्वार्थी दरबारी मंडळी यांनी कपटाने केलेल्या क्रूर छळामुळे अहमदनगरच्या मुक्कामी निधन झाले. त्यानंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी आबासाहेब तथा जयसिंगराव घाटगे यांचे सुपुत्र यशवंतराव यांना १७ मार्च १८८४ रोजी दत्तक घेत राजर्षी शाहू महाराज या नावाने गादीचे वारस बनवले. त्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर वयाच्या विसाव्या वर्षी म्हणजेच २ एप्रिल १८९४ रोजी राजर्षी शाहू महाराज यांचा राज्यारोहण सोहळा संपन्न झाला. त्यानंतर त्यांचा कारभार सुरू झाला. अगदी लहानपणापासूनच राजर्षी शाहू महाराज हे कुशाग्र बुद्धीचे आणि मानवतावादी विचाराचे होते. त्यांच्या याच विचारांमध्ये आबासाहेब यांच्या दूरदृष्टीने भरच पडली. कारण आबासाहेबांनी त्यांच्या शिक्षणात कसलीच कसर सोडली नाही. राजकोट याठिकाणी त्यांचे बरेचसे शिक्षण पूर्ण झाले. ज्यावेळी त्यांचे शिक्षण पूर्ण होत होते त्यावेळी त्यांना कर्तव्यदक्ष असणारे ब्रिटिश शासनाचे आय. सी. एस. अधिकारी स्टुअर्ट मिटफोर्ड फ्रेझर आणि सर रघुनाथराव सबनीस यांच्यासारखे अत्यंत चांगले शिक्षक लाभले. स्वतः महाराज आयुष्याच्या प्रत्येक वळणावर फ्रेझर यांच्याशी पत्रव्यवहार करत होते. म्हणूनच ते त्यांना FRIEND, PHILOSOPHER AND GUIDE म्हणायचे. यावरूनच राजर्षी शाहू महाराज यांचे आणि फ्रेझर यांचे संबंध लक्षात येतात.

महाराजांना शिक्षण देत असतानाच फ्रेझर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्य फिरण्याची संधी मिळाली. आबासाहेब घाटगे यांचे उपजतच संस्कार, फ्रेझर यांनी दिलेली निरीक्षण क्षमता आणि सर रघुनाथराव सबनीस यांनी दिलेले व्यवहारचातुर्य यांच्या बळावर महाराजांनी रयतेचे दुःख जाणले. त्यांना आपल्या संस्थानातील रयतेच्या अनेक बाबी समजायला हा दौरा मदतीचा ठरला. लोकांच्या मनात असलेले अज्ञान, अंधश्रद्धा, निरक्षरता, वाईट प्रथा – परंपरा, मानसिक गुलामगिरी या सर्व बाबींचा परिचय झाला. त्यामुळे त्यांनी गादीवर बसताच आपल्या संस्थानासाठीचा रयत समोर ठेवून जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यानुसार कार्यभार सुरू झाला.

हा कार्यभार सुरू असताना त्यांच्या लक्षात आले की, राज्याच्या व राज्यकारभाराच्या सर्व क्षेत्रात एक ठराविक वर्गाची पूर्वापार मक्तेदारी आहे आणि त्यांना हवे असलेले निर्णयच ते मोठ्या प्रमाणात आणि सोयीस्कर घेत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य लोकांसाठीचे निर्णय घेताना मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत आहेत. म्हणून सर्व समाजाचे, सर्वसामान्य लोकांमधून आलेली माणसे महत्वाच्या मुद्द्यावर राहावेत यासाठी त्यांचे विचार आणि कार्य सुरु झाले. महाराजांनी कुणावरही, कसलाच अन्याय केला नाही. मात्र वेदोक्त प्रकरणात महाराजांना आपल्याच दरबारातील लोकांनी आणि लोकमान्य टिळक आणि त्यांच्यासारख्या अनेक मान्यवरांनी चुकीच्या गोष्टीसाठी केलेला विरोध पाहून राजर्षी शाहू महाराज खिन्न झाले; पण महाराज डगमगले नाहीत. त्यातून त्यांनी धडा घेतला. वेदोक्त प्रकरण हे राजर्षी शाहू महाराजाना सामाजिक कार्याकडे वळण्यासाठीची अत्यंत महत्त्वाची घटना ठरली. कारण या घटनेने महाराजांना तुम्ही क्षत्रिय नसुन शूद्र आहात आणि तुम्हाला शूद्र म्हणूनच जगावे लागेल. हा नवा निर्णय तत्कालीन उच्चवर्णीयांनी स्पष्ट सांगितला. महाराजांनीही या निर्णयाविरोधात चांगलीच सात वर्षे झुंज देत लोकमान्य टिळक यांच्यासह सर्व विरोधकांना नामोहरम केले.

या प्रकरणानंतर मात्र महाराजांनी आपल्या संस्थानात समानता आणण्यासाठी जोर धरला. त्यासाठी काही दिवसांतच राजर्षी शाहू महाराज इंग्लंडच्या दौऱ्यावर असतानाच त्यांनी लोकांना एकाच पातळीवर आणण्यासाठी दिनांक २६ जुलै १९०२ रोजी जगातील पहिला आरक्षणाचा क्रांतिकारी जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यात ते म्हणतात की, या तारखेपासून राज्यात सर्व वर्गाच्या लोकांना शिक्षण देण्याच्या उदात्त हेतूसाठी त्यांना योग्य मोबदला मिळाल्यास शिक्षणाचे महत्त्व पटेल. म्हणून वरील तारखेपासून राज्यात रिकाम्या झालेल्या जागांपैकी पन्नास टक्के जागा ह्या मागासलेल्या लोकांसाठी भराव्यात. हा जाहीरनामा म्हणजे मागासलेल्या सर्व जातींच्या लोकांसाठी नवीन सूर्योदय होता. एवढा धाडसी निर्णय महाराजांनी अशावेळी घेतला; ज्यावेळी माणसाला माणूस म्हणून जगायला देखील ठराविक वर्गाची परवानगी लागत होती. त्याकाळी महाराजांनी हा निर्णय घेऊन सर्वांनाच समान संधी उपलब्ध करून दिली. पण यामुळे वेदोक्त प्रकरणापासून महाराजांवर अनेक मंडळी टपून बसली होती. त्यांना ही आयती संधी चालून आली. त्यामध्ये लोकमान्य टिळकांसारखे राष्ट्राचे नेतृत्व करणारे पुढारी देखील होते. त्यांनी आपल्या वर्तमानपत्रातून महाराजांचा बुद्धीभ्रंश झाल्याचे म्हटले. मात्र सर्वसामान्य समाजाला अज्ञानातून बाहेर काढण्यासाठी हा जाहीरनामा किती महत्वाचा आहे याची जाणीव महाराजांना होती म्हणूनच त्यांनीही होणारे वार सहन करत, हाती घेतलेल्या कामात कसलीही तडजोड केली नाही.

या जाहीरनाम्याचा परिणाम शिक्षणाच्या चळवळीवर सकारात्मक व्हावा अशी अपेक्षा महाराजांची होती ती पूर्ण होताना दिसू लागली. ज्यावेळी तळागाळातील लोकांच्या मुलांना शिक्षण मिळावे यासाठी महात्मा फुले व तत्कालीन समाजसुधारकांनी शाळा काढल्या. शिक्षणाची दारे उघडून दिली. तोच कित्ता राजर्षी शाहू महाराजानी पुढे चालवला. त्यात भर म्हणजे ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना राहायचे कुठे हा प्रश्न सतावत असे. ही बाब ज्यावेळी महाराजांच्या लक्षात आली त्यावेळी त्यांनी १८९६ साली सर्व विद्यार्थ्यांसाठी एक वसतिगृह काढले. त्यावेळी सर्वत्रच जातीयतेचा भयंकर पुळका जातीयवादी लोकांना होता. परिणामी या वसतिगृहातुन उच्चवर्णीय वगळता बाकीचे विद्यार्थी कमी व्हायला लागले. म्हणून महाराजांनी तत्कालीन जातीय व्यवस्थेचा परिणाम हा मुलांच्या शिक्षणावर होऊ नये आणि शिक्षणात खंड पडू नये म्हणून १९०१ साली त्यांनी व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग सुरू केले. त्यानंतर मात्र त्यांनी मराठा बोर्डिंगचे यश पाहता विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जातवार वसतिगृहे काढली.

शाहू महाराजांनी सुरू केलेली शैक्षणिक वसतिगृहात दिगंबर जैन बोर्डिंग, लिंगायत विद्यार्थी वसतिगृह, मुस्लीम बोर्डिंग, मिस क्लार्क होस्टेल, दैवज्ञ शिक्षण समाज बोर्डिंग, श्री. नामदेव बोर्डिंग, पांचाळ ब्राह्मण वसतिगृह, गौड सारस्वत ब्राह्मण विद्यार्थी वसतिगृह, ख्रिश्चन होस्टेल, कायस्थ प्रभू विद्यार्थी वसतिगृह, वैश्य बोर्डिंग, ढोर चांभार बोर्डिंग ही वसतीगृहे कोल्हापुरात तर उदाजी मराठा वसतिगृह – नाशिक, चौथे शिवाजी महाराज मराठा वसतिगृह – अहमदनगर, वंजारी समाज वसतिगृह – नाशिक, श्री शाहू छत्रपती बोर्डिंग – नाशिक, चोखामेळा वसतिगृह – नागपूर, छत्रपती ताराबाई मराठा बोर्डिंग – पुणे ही आपल्या संस्थानच्या बाहेर असणाऱ्या मोठ्या शहरात महाराजानी गोर -गरीब आणि सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी वस्तीगृहे सुरू केली. परिणामी ग्रामीण वा इतर भागातून येणाऱ्या सर्वसामान्य आणि गरीब मुलांना शिक्षणाची आवड निर्माण व्हायला मदत झाली. त्यावेळी महाराजांवर अनेक आरोप झाले की, महाराजांनी जातीयता वाढविली कारण वेगवेगळ्या जातीची वसतिगृहे काढली. राजर्षी शाहू महाराज हे समाजात फूट पडत आहेत. परंतु त्या काळातील समाजव्यवस्थाच अशी होती की, नाकापेक्षा मोती जड होत होता. जर महाराजांनी हा निर्णय घेतला नसता तर पुढील बराच काळ सर्वसामान्य, गोर-गरीब लोकांच्या मुलांना शिक्षणाची दारे उघडणे सोडाच, किलकिले होणेदेखील कठीण झालेले असते. म्हणून त्याही परिस्थितीत सर्वसामान्य विद्यार्थ्यांचे शिक्षण अर्धवट राहू नये यासाठी महाराजांनी हा पर्याय निवडला. विशेष म्हणजे काळाच्या ओघात त्यांचा हा पर्याय कमालीचा यशस्वी ठरला. कारण याच सर्व वसतीगृहातून अनेक नामवंत तयार झाले. थोडक्यात सांगायचे झाल्यास ब्राह्मण वर्ग वगळता उच्च शिक्षितांची पहिली पिढी या वसतीगृहातून निर्माण झाली असे म्हटल्यास वावगे ठरू नये. महाराजांची ही चळवळ मोठ्या प्रमाणात यशस्वी झाली.

राजर्षी शाहू महाराजानी आपल्या संस्थानामधील अस्पृशांचा आणि मागासलेल्या जातींचा उद्धार शिक्षणाच्या माध्यमातून करण्याचे ठरवले होते. त्याकाळच्या समाजव्यवस्थेचा विचार करता स्पृश्य आणि अस्पृश्य हे एकत्र शिकणे खुप कठीण काम होते. म्हणून त्यांनी अस्पृश्यासाठी वेगळ्या शाळा काढल्या होत्या. सुरुवातीला पाच शाळावरून सुरु झालेला प्रवास सत्तावीस शाळेपर्यंत जाऊन पोहोचला. मोठ्या प्रमाणात गोरगरिबांना शिक्षणाचा अधिकार मिळावा. यासाठी महाराजांनी विशेष प्रयत्न केले. त्यातील महत्वाचा भाग म्हणजे २४ नोव्हेंबर १९११ पासून सर्व विद्यार्थ्यांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण करण्यात आले. हे करत असताना फक्त जाहीरनामा काढून महाराज थांबले नाहीत तर त्यांनी असाही आदेश काढला की, जे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवणार माहीत त्यांना एक रुपया दंड करण्यात येईल. त्यामुळे शिक्षणाबद्दलची अनास्था कमी व्हायला मदत झाली. लोकांना शिक्षणाचे महत्व समजायला सुरुवात झाली. मागेल तेथे शाळा महाराजांनी आपल्या संस्थानात सुरू केल्या. जवळजवळ १०० च्या आसपास महाराजांनी त्या काळात शाळा सुरू करून विद्यार्थ्यांना नवी दिशा दिली. राजर्षी शाहू महाराज स्वतः या शिक्षणाच्या कार्यावर लक्ष ठेवून होते. शिक्षणाशिवाय आमचा तरणोपाय नाही, हा सिद्धांत त्यांनी मनोमन स्वीकारून त्या पद्धतीने कार्य करायला सुरुवात केली होती. महाराजांच्या या कार्याचे महत्व लक्षात घ्यायचे असेल तर तत्कालीन एक तुलना लक्षात घ्यावी लागेल. महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात आणि सिंध एवढा प्रदेश एकत्र मिळून मुंबई प्रांत तयार झाला होता. त्या मुंबई प्रांताची शिक्षणासाठी तरतूद एक लाख रुपये नव्हती. मात्र महाराजांनी आपल्या कोल्हापूर प्रांताची शिक्षणासाठीची तरतूद एक लाख रुपये केली होती. यावरूनच शिक्षणप्रसाराची त्यांची तळमळ लक्षात येते. हा खर्च पुढे चालून तीन लाख रुपयांपर्यंत गेला. तरीही महाराज यात मागे आले नाहीत. त्यांनी आपल्या शकर्यांना सांगितली की, शिक्षणावर केलेला खर्च हा भविष्यासाठी मोठी गुंतवणूक ठरणारी असते. (हा विचार सद्यस्थितीत दिल्ली सरकारने अमलात आणला. परिणामी झालेल्या परिवर्तनाची दखल जागतिक स्तरांवरील अनेक नामवंत संस्थांनी घेत या सरकारचे कौतुक केले. असो.) स्वतः लक्ष घातल्याने अनेक समस्या त्यांच्या लक्षात आल्या. उदाहरण सांगायचे झाल्यास ग्रामीण भागातील शेतकरी हे मुलांना कामात मदत म्हणून शाळेत पाठवायला चालढकल करायचे. मात्र महाराजांनी त्यातही मार्ग काढला दिवसातून सकाळी किंवा संध्याकाळी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवावेच लागायचे. त्यासोबत सुरुवातीला सुरू केलेल्या अस्पृश्यांच्या शाळा महाराजांनी बंद करून सर्वाना एकत्र शिक्षण देत समानता साधण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या सक्तीच्या आणि मोफत शिक्षण देण्याच्या प्रयत्नांमुळे १९१७ – १८ साली एकूण शाळा २७ आणि विद्यार्थी संख्या १२९६ वरून पुढील पाच वर्षात शाळांची संख्या ४२० तर विद्यार्थी संख्या २२००० च्या वर झाली. तर या योजनेवर सुरुवातीला होणारा एक लाख खर्च पुढे वाढत जाऊन तो तीन लाखावर गेला. या शिक्षणाच्या प्रवाहात महाराजांनी विद्यार्थ्यांच्या कौशल्याचा विचार करून विविध स्वरूपाच्या शाळा आपल्या संस्थानात सुरू केल्या. प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, सर्वसामान्य कुटुंबातील मुले देखील पुरोहितपण करायला शिकल्यास त्यांना कुणासमोरही हात पसरायला नको म्हणून पुरोहित शाळा, भारताच्या स्वातंत्र्य लढा यशस्वी व्हावेत त्यासाठी सैनिक रयत व्हावेत म्हणून सैनिकी शाळा उभारल्या, शिक्षणासोबतच संस्थानामधील तरुणांसाठी उद्योग शाळा, संस्कृत शाळा, मानवतावादी दृष्टिकोन शिकवणाऱ्या सत्यशोधक शाळा, डोंबारी मुलांची शाळा, विविध कलावर आधारीत कला शाळा अशा विविध शाळा महाराजांनी आपल्या राज्यात सुरु केल्या.

महाराजांच्या शिक्षणविषयक कार्याचे अजून एक मोठेपण म्हणजे त्यांनी मुलींच्या शिक्षणावर भर दिला. संस्थानात मुलामुलींच्या शाळा होत्याच त्यासोबतच मुलींच्या स्वतंत्र शाळादेखील त्यांनी सुरुवात केल्या. ज्या काळात मुलींना शिक्षणास संधी द्यायला काही पालक तयार होत नव्हते त्या काळात महाराजानी खास मुलींच्या शिक्षणात कमतरता राहू नये यासाठी खास महिला शिक्षणाधिकारी हे पद निर्माण केले आणि त्या पदावर रखमाबाई केळवकर यांच्यासारख्या अत्यंत बुद्धिमान स्त्रीला नेमले. त्यासोबतच मुलींच्या शिक्षणाला सर्वांनीच प्रोत्साहन द्यावे यासाठी त्यांनी इनामे सुद्धा जाहीर केली. ( आजच्या शिक्षणाच्या भाषेत त्याला उपस्थिती भत्ता म्हणतात, फरक इतकाच हा उपस्थिती भत्ता आता शाळेच्या हजेरीपटवरील जातीचा प्रवर्ग पाहून शासन देते, महाराजांनी मात्र शाळेत येणाऱ्या प्रत्येक मुलींना हा उपस्थिती भत्ता द्यायला सुरुवात केली होती. मग धर्मनिरपेक्ष मूल्यांचे शिक्षण हे खऱ्या अर्थाने महाराजानी दिले. कारण त्यांनी कधीही कुणाची जात काढली नाही वा विचारली नाही सर्वाना समावेशक आणि सहजसुलभ शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी आपला खजिना रिकामा केला.) एवढेच नव्हे तर महाराजानी मुलींना उच्च शिक्षण देखील मोफत दिले. कोल्हापुरातील राजाराम कॉलेजमध्ये मुलींच्या उच्च शिक्षणाची महाराजांनी सोय केली. मुलींनी शिक्षण घेतले पाहिजे यासाठी त्यांनी पुढाकार घेतलाच, त्यासोबतच त्यांनी त्याची सुरुवात आपल्या घरातून केली. रखमाबाई यांची कन्या कृष्णाबाई यांना वैद्यकीय शिक्षण दिले आणि कोल्हापूरमध्ये सरकारी दवाखाण्यात डॉक्टर म्हणून काम करण्याची संधी दिली. एवढेच नव्हे तर त्यांना वैद्यकीय क्षेत्रातील पुढील शिक्षण देण्यासाठी परदेशी देखील पाठवले आणि परदेशात कृष्णाबाई यांनी उच्च शिक्षण घेऊन दुसऱ्या महिला डॉक्टर होण्याचा मान पटकावला. त्यासोबतच अजून एक महत्वाची घटना म्हणजे ज्यावेळी त्यांचे चिरंजीव प्रिन्स शिवाजी यांचे दुःखद निधन झाले त्यावेळेस महाराजांनी त्यांच्या पत्नी इंदुमतीदेवीच्या शिक्षणास घरातूनच विरोध झाला मात्र महाराजांनी हा विरोध धुडकावून लावत त्यांना शिक्षण देण्यास सुरुवात केली. मात्र त्याही अकाली निधन पावल्याने त्यांचे स्वप्न अपूर्ण राहिले.

या सर्व शिक्षणाबरोबरच महाराजांनी प्रौढ शिक्षणही द्यायला सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी शिक्षक नेमले, यासोबतच ज्यांना राहायचे असेल त्यांना देखील सोय उपलब्ध करून देण्यात महाराजानी आघाडी घेतली. थोडक्यात महाराजांनी आपल्या संस्थानात शिक्षणासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न केले. संस्थानात राहणारा दीन – दलित – सर्वसामान्य – गोर – गरीब – बहुजन – अल्पजन या सगळ्यांना महाराजांनी त्यांच्या त्यांच्या कुवतीनुसार, त्यांच्या – त्यांच्या क्षमतेनुसार शिक्षणात जिथे मिळेल तिथे संधी दिली. शक्य होईल तेवढे सहकार्य उपलब्ध करून दिले. मग त्यांनी त्यासाठी कधीही वशिला, भेदाभेद, लहान मोठेपणा हा फरक केला नाही. ज्यावेळी त्यांनी मोफत शिक्षणाचा कायदा केला, त्यावेळी ते स्वतः लक्ष घालून होतेच शिवाय कुणीही कसल्याही प्रकाराची फी वा शुल्क आकारले तर त्याच्यावर देखील महाराजांनी कारवाई केल्याचे आढळते. शिक्षणातून जगण्याचा नवा मार्ग उपलब्ध होतो. यामुळे शिक्षणावर एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च करणारे महाराज जगातील एकमेव संस्थानिक असावेत. त्यांच्याकडे जी – जी व्यक्ती शिक्षणासाठी मदत मागायला गेली, ती रिकाम्या हाताने कधीच परत आली नाही. त्यांच्या याच कार्याचा आधार घेत महाराष्ट्रात डॉ बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ पंजाबराव देशमुख यांच्यासारख्या असंख्य लोकांनी शिक्षणाचा प्रवाह सतत प्रवाही ठेवला. त्यामुळे आज महाराष्ट्राला पुरोगामी राज्य म्हणून संबोधले जाते.

राजर्षी शाहू महाराजानी शिक्षणाबरोबरच शेती, उद्योग सहकार या क्षेत्रात खूप मोठे काम केले. महाराजानी त्यावेळी शेती आणि लोकांच्या दृष्टिने अत्यंत महत्वाचा राधानगरी प्रकल्प उभारला ज्यामुळे शेतीत आणि जलसंपदेत खूप मोठा बदल झाला. त्याबरोबरच महाराजांनी अनेक कलांना आणि कलाकारांना आश्रय दिला.

आजही महाराष्ट्रात अनेक जण स्वतःला पुरोगामी म्हणून घेतात. आपल्यावर फुले – शाहू – आंबेडकर यांचा पगडा असल्याचे मान्य करतात. मात्र त्याच महाराष्ट्रात आजही जातीयतेच्या नावावर दंगली पेटतात, लोकांना जाळतात, लोक नियोजनाअभावी उपाशी मरतात, आजही अनेकांना शिक्षणाच्या साध्या गरजा पूर्ण करण्यासाठी अनेक दिव्य पार पाडावी लागतात, आरक्षणाच्या नावावर वाद – प्रतिवाद होतात. मने कलुषित बनतात. सरकारने आजचा दिवस सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्याचे ठरवले आहे. मात्र यासाठी प्रत्येकाने आपल्या नैतिकतेच्या जोरावर सामाजिक न्यायचा आगरही असणे आवश्यक आहे. आजच्या जयंतीच्या निमित्ताने सर्वांनीच महाराजांच्या मनात सर्वसामान्य आणि गोरगरीब लोकांच्या बाबतीत असणारी तळमळ प्रत्येकांनी बाळगल्यास त्यांच्या विचारांना खरीखुरी आदरांजली ठरेल. आरक्षणाचे जनक ही शाहु महाराजांची एकमेव ओळख दूर करून त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा इत्यादी क्षेत्रातील त्यांचे योगदान विसरून चालणार नाही. या क्षेत्रातील विचारांना उजाळा मिळणे काळाची गरज आहे.

पुन्हा एकदा राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या मानवतावादीआणि लोकोपयोगी विचारांना मनःपूर्वक अभिवादन! आणि सर्वांनाच या दिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!