होळीच्या आणि रंगपंचमीच्या मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा! श्रीसाईंची सत्य कथा जाणून घेऊ!

हरि ॐ श्रीराम अंबज्ञ नाथसंविध्

शिर्डीचे श्रीसाईबाबा-श्रीसाईनाथ-श्रीसाई! आपल्या सर्वांचे आवडते सद्‍गुरुतत्त्व! आजही श्रीसाईनाथ आपणास अतिशय जवळचे वाटतात. कारण श्रीसाई नाथांची कृपा आपणास क्षणोक्षणी प्राप्त होत असते आणि त्याचा अनुभव आम्ही प्रत्यक्ष अनुभवत असतो.

श्रीसाईनाथांचे चरित्र हेमाडपंतांनी श्रीसाईंची प्रत्यक्ष परवानगी घेऊन लिहीले. गोविंद रघुनाथ दाभोलकर यांना श्रीसाईनाथ यांनी `हेमांडपंत’ हे टोपण नाव दिले. या हेमाडपंतांनी सद्गुरु श्री साईंच्या अद्भुत लीला पाहून त्या श्रद्धावानांसाठी शब्दांकित केल्या. हा ग्रंथ ज्या ठिकाणी लिहिला गेला ते ठिकाण नेमकं कुठे आहे? हेमाडपंत यांचा गाव कोणता? वगैरे माहिती साईभक्तांना माहित नसते. जे परमपुज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापू यांच्याकडे येतात त्यांना ह्या गोष्टी माहित आहेत. पण जे येत नाहीत व श्रीसाईंना मनापासून आपला परमात्मा मानतात, सद्गुरु मानतात, त्यांची पूजा करतात; त्यांच्यासाठी छोटासा लेख लिहिण्याचा साईप्रयास!

गोविंदराव ऊर्फ अण्णासाहेब रघुनाथ दाभोलकर यांचा जन्म १८५९ साली ठाणे जिल्ह्यात झाला. दाभोलकर घराणे सिंधुदुर्गातील वेंगुर्ले येथील. आजही दाभोलकर कुटुंबियांची जमीन वेंगुर्ले येथे आहे.

गोविंदरावांनी सुरुवातीस शिक्षकाची नोकरी केली; नंतर महसूल खात्यात तलाठी ते मामलेदार व रेसिडेंट मॅजिस्ट्रेटच्या पदापर्यंत गेले व सेवानिवृत्त झाले. त्या कालावधीत यांनी वांद्रे येथे मोठा बंगला बांधला. ते मोठे घर आजही आपणास पाहावयास मिळते. हे मोठे घर म्हणजे श्रीसाईनिवास. इथे होळीचा मोठा उत्सव साजरा केला जातो. हेमाडपंतांची चौथी पिढीसुद्धा श्रीसाईभक्तीत समर्पित झालेली आपणास पाहावयास मिळते.

अण्णासाहेब दाभोळकर श्रीसाईनाथांच्या सहवासात आले आणि त्यांचेच कायमचे होऊन गेले. अण्णासाहेबांना श्रीसाईंनी टोपण नाव दिले; हेमांडपंत. त्यांच्याकडून श्रीसाईसच्चरित हा महान ग्रंथ निर्मिला गेला.

आज होळी पौर्णिमा. बरोबर एकशे दोन वर्षांपूर्वी म्हणजे १९१७ साली होळी पौर्णिमेच्या पहाटे हेमाडपंतांना स्वप्न पडतं. स्वप्नात श्रीसाई येतात आणि सांगतात की, मी जेवणासाठी तुझ्या घरी येत आहे. त्यावेळी प्रत्यक्ष साईनाथ शिर्डीत होते. एवढ्या लांबून श्रीसाईनाथ प्रत्यक्ष कसे येतील? त्याचप्रमाणे श्रीसाई दोन-तीन ठिकाण सोडल्यास कुठेही जात नसत. मग वांद्र्याला येणार कसे? हे आमचे प्रश्न. पण श्रीसाईंवर पूर्ण श्रद्धा असणारे हेमाडपंत होळी दिवशी जेवणास बसलेल्या पंक्तीमध्ये रांगोळी काढून श्रीसाईंना ताट ठेवतात. जेवणाची वेळ निघून जात असता असता कोणी तरी ओळखीची व्यक्ती येते आणि वर्तमानपत्रात गुंडाळलेली वस्तू देते व निघून जाते.

ते वर्तमानपत्र बाजूला सारून पाहतात तर ती साईंची मूर्ती असते. श्रीसाई प्रत्यक्ष शिर्डीत असताना भक्ताला दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी श्रीसाई मूर्ती रूपाने श्रीसाईनिवासात प्रगटतात, होळीच्या जेवणापूर्वी. श्रीसाईनाथांची मूर्ती आपण आजही पाहू शकतो. त्या संदर्भात श्री साईसच्चरितमध्ये ४० व्या अध्यायात सत्यकथा आलेली आहे.

आज श्रीसाईंची मंदिरं खूप ठिकाणी आहेत. श्रीसाईंच्या नावे मोठे मोठे भंडारे आयोजित केले जातात. शिर्डीत पायी जाणारे भक्त खूपजण आहेत. पण श्रीसाईनाथांच्या खऱ्याखुऱ्या गोष्टीपासून आपण अज्ञानी राहतो. त्या समजून घेतल्यास आमची साईभक्ती अधिकाधिक दृढ होत जाईल. आजच्या दिवशी आपण त्या गोष्टी समजून घेतल्या! होळीच्या मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा!

You cannot copy content of this page