कोरोना रुग्णांसाठी मुंबईत आठवडाभरात ८ हजारांहून अधिक खाटा उपलब्ध होणार

मुंबई:- कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी मुंबईत खाटा उपलब्ध होण्यासाठी राज्य शासनामार्फत प्रयत्न केले जात आहेत. येत्या आठवडाभरात सुमारे ८ हजारांहून अधिक खाटा उपलब्ध होणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. गोरेगाव, महालक्ष्मी, मुलुंड, दहिसर, भायखळा येथे कोविड सेंटर उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या एक ते दोन दिवसात गोरेगाव आणि महालक्ष्मी रेसकोर्सवरील कोविड सेंटर कार्यान्वित होणार आहे.

शुक्रवारी रात्री फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधताना आरोग्यमंत्री श्री. टोपे यांनी ही माहिती दिली. यासंदर्भात अधिक माहिती देताना ते म्हणाले की, मुंबईत कोरोना रुग्णांसाठी खाटा उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. खासगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा ताब्यात घेण्याच्या निर्णयामुळे ५३ मोठ्या रुग्णालयातील सुमारे १२ हजार खाटा उपलब्ध झाल्या आहेत. त्यामध्ये अतिदक्षता विभागातील खाटांचाही समावेश आहे.

गोरेगाव येथे २६०० खाटांची उभारणी पूर्ण झाली आहे. महालक्ष्मी रेसकोर्सवर ३०० खाटांची उभारणी करण्यात आली. येत्या दोन दिवसात हे सेंटर कार्यान्वित होईल. त्यापाठोपाठ मुलुंड येथे २ हजार खाटा, दहिसर येथे २ हजार आणि भायखळा येथे २ हजार खाटांची उभारणी अंतिम टप्प्यात असून आठवडाभरात ते कार्यान्वित होईल, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

You cannot copy content of this page