मोबाईलवर अचानक भोंगा, फ्लॅश मेसेज… नेमकं काय?
NDMAची देशव्यापी चाचणी; ‘सचेत’ प्रणालीद्वारे 19 भाषांमध्ये 134 अब्जांहून अधिक अलर्ट पाठवले!
मुंबई:- शनिवारी (2 मे) सकाळी सुमारे 11.45 वाजता देशभरातील लाखो नागरिकांच्या मोबाईल फोनवर अचानक मोठा सायरनसदृश भोंगा वाजला आणि स्क्रीनवर एक फ्लॅश इमर्जन्सी मेसेज दिसला. काही सेकंदांनंतर हा संदेश मोबाईलद्वारे मोठ्याने वाचूनही दाखवण्यात आला. अचानक आलेल्या या अलर्टमुळे अनेक नागरिक घाबरले, तर काहींमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
विशेष म्हणजे हा संदेश अनेकांच्या मोबाईलमध्ये सेव्हही झाला नाही, त्यामुळे नेमके काय घडले याबाबत सोशल मीडियावर चर्चा रंगली.
मात्र, सरकारने स्पष्ट केले की घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. हा संदेश राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA) आणि दूरसंचार विभागाकडून करण्यात आलेल्या आपत्कालीन सूचना प्रणालीच्या चाचणीचा भाग होता.
देशभरात एकाच वेळी चाचणी
दिल्ली-एनसीआरसह सर्व राज्यांच्या राजधानींमध्ये एकाच वेळी हा अलर्ट पाठवण्यात आला. संदेश मराठी, हिंदी, इंग्रजीसह विविध प्रादेशिक भाषांमध्ये होता.
या संदेशात स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते की; “हा केवळ चाचणी संदेश आहे. कृपया घाबरू नका. कोणतीही कारवाई करण्याची आवश्यकता नाही.”
यापूर्वीही केंद्र सरकारने नागरिकांना अशा चाचणी संदेशांबाबत सतर्क राहण्याचे आवाहन केले होते.
काय आहे ‘सचेत’ प्रणाली?
सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्स (C-DOT) या सरकारी संस्थेने विकसित केलेली ‘सचेत’ ही एक अत्याधुनिक सूचना प्रणाली आहे. ही प्रणाली कॉमन अलर्टिंग प्रोटोकॉल (CAP) वर आधारित असून देशातील सर्व 36 राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये कार्यरत करण्यात आली आहे.
या प्रणालीचा उद्देश-
नैसर्गिक आपत्ती, भूकंप, पूर, चक्रीवादळ, त्सुनामी, गंभीर हवामान बदल यासारख्या परिस्थितीत नागरिकांना काही सेकंदांत सतर्क करणे हा आहे.
ही प्रणाली एसएमएसपेक्षा वेगळी कशी?
सामान्य एसएमएसमध्ये एक नंबरवरून दुसऱ्या नंबरवर संदेश पाठवला जातो; परंतु Cell Broadcast Service (CBS) मध्ये एका विशिष्ट मोबाईल टॉवरच्या परिसरातील सर्व मोबाईल फोनवर एकाच वेळी संदेश पाठवला जातो.
याची वैशिष्ट्ये कोणती?
✅ इंटरनेटची गरज नाही
✅ स्मार्टफोन व सामान्य फोन दोन्हीवर संदेश पोहोचू शकतो
✅ काही सेकंदांत लाखो लोकांपर्यंत माहिती
✅ आपत्कालीन परिस्थितीत अत्यंत उपयुक्त
तब्बल 134 अब्ज अलर्ट!
अधिकृत माहितीनुसार, आतापर्यंत या प्रणालीद्वारे 19 भारतीय भाषांमध्ये तब्बल 134 अब्जांहून अधिक अलर्ट संदेश पाठवण्यात आले आहेत. चक्रीवादळ, मुसळधार पाऊस, पूरस्थिती आणि हवामान बदलाच्या इशाऱ्यांसाठी या प्रणालीचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला आहे.
मोबाईलमध्ये मेसेज सेव्ह का झाला नाही?
तज्ज्ञांच्या मते, हा संदेश सामान्य एसएमएस नव्हता. तो फ्लॅश/ब्रॉडकास्ट अलर्ट स्वरूपात पाठवण्यात आला होता. म्हणूनच तो इनबॉक्समध्ये सेव्ह होत नाही. काही वेळानंतर आपोआप गायब होतो. फक्त तातडीची सूचना देण्यासाठी वापरला जातो.
Cell Broadcast म्हणजे एका परिसरातील सर्व मोबाईलवर एकाच वेळी सूचना पाठवणारी प्रणाली होय. एसएमएस वैयक्तिक असतो तर CBS सामूहिक असतो. ह्या प्रणालीला इंटरनेटची आवश्यकता नसते. ही सेवा भूकंप, पूर, चक्रीवादळ, युद्धजन्य परिस्थितीत वापरतात. मोबाईल नेटवर्क कव्हरेजमध्ये असल्यास ही सूचना मिळते. भारतात NDMA आणि दूरसंचार विभाग ही सेवा राबवत आहेत.
.
भविष्यात जीव वाचवणारी प्रणाली-
तज्ज्ञांच्या मते, भविष्यात भूकंप, त्सुनामी, पूर किंवा दहशतवादी हल्ल्यासारख्या आपत्कालीन परिस्थितीत ही प्रणाली हजारो लोकांचे प्राण वाचवू शकते.
शनिवारी आलेला अलर्ट अनेकांसाठी धक्कादायक ठरला असला, तरी तो भारताच्या अधिक सक्षम आणि जलद आपत्ती व्यवस्थापन व्यवस्थेचे संकेत मानले जात आहेत.











