विशेष लेख- स्वर्गापेक्षा सुंदर कोकणात प्रदुषणकारी प्रकल्प नकोच! (भाग-१)

कोकणामध्ये प्रदुषणकारी प्रकल्प नकोच! ही भूमिका कोणत्याही सत्ताधाऱ्यांना पसंत पडणार नाही. मग ते सत्ताधारी कोणत्याही पक्षाचे असोत. सत्तेतील नेत्यांना प्रकल्प आणायचा असतो आणि स्थानिकांना आपल्या भविष्यासाठी विनाशकारी प्रकल्पांना विरोध करायचा असतो. त्या विरोधी आंदोलनात विरोधी पक्षाचे नेते सामील होतात आणि आपली पोळी भाजून घेतात. असो! मात्र कोकणात कोणताही प्रदुषणकारी प्रकल्प असता कामा नये; ही आमची भूमिका आहे. ती भूमिका कोकणच्या पर्यावरणासाठी, कोकणातल्या पिढ्यानपिढ्या निसर्गाला जपणाऱ्या चालीरितींसाठी, कोकणच्या मातीला, नद्यांना, समुद्राला, जंगलांना, बागायतीला, शेतीला, पर्यटनाला, मत्स्यव्यवसाय वाचविण्यासाठी, कोकणच्या शाश्वत विकासासाठी, कोकणाचं कोकणपण जपण्यासाठी! त्यासाठी हा लेखन प्रपंच!

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी अणुऊर्जा प्रकल्पाचा सामंजस्य करार केला आणि देवगड अणुऊर्जा प्रकल्पाबाबत कोकणवासियांच्या मनात भीती तयार झाली ती कोकणच्या भवितव्याची! ही भीती का तयार झाली? तर शासनावर जनतेचा विश्वास नाही म्हणून. शासनावरील हा अविश्वास का तयार झाला? कारण प्रदुषणकारी प्रकल्पाबाबत- कंपन्यांबाबत शासनाने आजपर्यंत आवश्यक त्या उपाययोजना अंमलात आणल्या नाहीत. हे शासनाचे अपयश आहे. त्या अपयशाचे दुष्परिणाम भोगायला कोकणवासिय तयार नाही. म्हणूनच रिफायनरीला विरोध झाला आणि आता अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध होतोय!

अणुऊर्जा प्रकल्पाबाबत माहिती घेत घेत आपण ह्या लेखाला सुरुवात करणार आहोत.

अणुभट्टीमध्ये युरेनियमसारख्या अणुइंधनाचे नियंत्रित विखंडन (Nuclear Fission) केले जाते. या प्रक्रियेत प्रचंड उष्णता निर्माण होते. त्या उष्णतेपासून वाफ तयार केली जाते, वाफ टर्बाइन फिरवते आणि त्याद्वारे जनरेटर वीज निर्माण करतो. वाढती लोकसंख्या, उद्योग, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), डेटा सेंटर्स आणि इलेक्ट्रिक वाहनांमुळे जगभरात विजेची मागणी वेगाने वाढत आहे. अशा परिस्थितीत केवळ सौर आणि पवन ऊर्जेवर अवलंबून राहणे शक्य नसल्याने अनेक देश पुन्हा अणुऊर्जेकडे वळत आहेत. आज जगातील ३० पेक्षा अधिक देशांमध्ये अणुऊर्जा प्रकल्प कार्यरत आहेत. सुमारे ४४० व्यावसायिक अणुभट्ट्या वीज निर्माण करतात आणि ६० पेक्षा अधिक नवीन अणुभट्ट्या बांधकामाधीन आहेत. अणुऊर्जेत मोठी गुंतवणूक करणाऱ्या देशांमध्ये चीन, भारत, रशिया, दक्षिण कोरिया, अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन, यांचा समावेश होतो. जर्मनीने फुकुशिमा अपघातानंतर अणुऊर्जा बंद करण्याचा निर्णय घेतला. कारण तेथील लोकांचा विरोध तीव्र झाला. त्याचप्रमाणे अणुकचऱ्याच्या समस्येने गंभीर रूप धारण केले; परंतु फ्रान्स, ब्रिटन, पोलंड, फिनलंड, हंगेरी यांसारखे देश नवीन अणुभट्ट्या उभारत आहेत; हे वास्तव आहे. कारण सौर आणि पवन ऊर्जा स्वच्छ आहेत, पण रात्री सूर्य नसतो. वारा सतत वाहत नाही. त्यामुळे २४ तास अखंड वीजपुरवठ्यासाठी अणुऊर्जा महत्त्वाची ठरते.

अणुऊर्जा प्रकल्पांचे आयुष्य किती हा महत्वाचा प्रश्न आहे. बहुतेक अणुभट्ट्यांचे मूळ डिझाइन ४० वर्षे सक्षमपणे कार्यरत राहते. योग्य तपासणी व देखभाल झाल्यास ६० ते ८० वर्षापर्यंत प्रकल्प कार्यान्वित राहू शकतो. परंतु ४० वर्षानंतरचा देखभाल, दुरुस्ती आणि नवीन उपकरणे-यंत्रे बसविणे अत्यंत कठीण आणि खर्चिक असते. म्हणून काही वेळा नवीन अणुभट्टी बांधणे जास्त फायदेशीर ठरते.

अणुऊर्जा प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे सुनियोजित व्यवस्थापन करून हा कचरा सुरक्षित ठिकाणी ठेवावा लागतो. कारण तो नष्ट होण्यासाठी म्हणजे किरणोत्सारी तीव्रता कमी होण्यासाठी किमान ५० ते २४ हजार वर्षे लागू शकतात. उदा. Low Level Waste (कपडे, हातमोजे, फिल्टर) ५०–३०० वर्षे तर High Level Waste : हजारो वर्षे जसे की Plutonium-239.

भारतात अणुकचऱ्याचे व्यवस्थापन अद्यापही आधुनिक पद्धतीचे नाही. भारताची पद्धत वेगळी आहे. भारतात Reprocessing, Vitrification केले जाते. तो कचरा काचबंद करून स्टील कंटेनरमध्ये सुरक्षित ठेवला जातो. भारतात अजून कायमस्वरूपी Deep Geological Repository (३०० ते ४५० मीटर खोल भूगर्भीय साठवण केंद्र) सुरू झालेले नाही; जी अणुकचऱ्यासाठी अत्यावश्यक मानली गेली आहे. त्यात उच्चस्तरीय अणुकचरा हजारो वर्षे किरणोत्सर्गी राहू शकतो. उदाहरणार्थ, Plutonium-239 चे अर्धायुष्य सुमारे 24,100 वर्षे आहे. त्यामुळे काही दशकांसाठी नव्हे तर अत्यंत दीर्घ काळासाठी सुरक्षित साठवण आवश्यक असते.

अणुऊर्जेसाठी सुरुवातीचा खूप मोठा खर्च अपेक्षित असतो. अणुकचऱ्याची सुरक्षित साठवण महत्वाची असते. दुर्दैवाने अपघात झाल्यास हजारो वर्षे मानवी जीवनाची आणि पर्यावरणाची हानी होते. यापुर्वी झालेल्या अपघातातून किरणोत्सर्ग झाला, स्वच्छता आणि निष्क्रियीकरण (Decommissioning) प्रक्रियेला अनेक दशके लागली व खर्च अब्जावधी डॉलर्सपर्यंत गेला. त्यामुळे अणुऊर्जेबाबत भीती वाढली.

१९७९ मध्ये अमेरिकेत Three Mile Island येथे अणुऊर्जा प्रकल्पात अपघात झाला. Cooling System मध्ये बिघाड, Reactor Core चा काही भाग वितळला; परंतु स्फोट झाला नाही. मोठ्या प्रमाणात किरणोत्सर्ग झाला नाही. तरीही या घटनेनंतर जगभर अणुऊर्जेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. जगातील मोठे अणुऊर्जा अपघात Three Mile Island (अमेरिका), Chernobyl (युक्रेन), Fukushima (जपान) येथे झाले. त्यापैकी Chernobyl येथील अपघात सर्वात भीषण होता.

Chernobyl (युक्रेन) येथे अणुऊर्जा प्रकल्पात २६ एप्रिल १९८६ रोजी घडलेला अपघात हा इतिहासातील सर्वात भीषण अणुऊर्जा अपघात मानला जातो. त्यावेळी प्रचंड स्फोट झाले व आग लागली. आयोडीन-१३१, सीझियम-१३७, स्ट्रॉन्शियम-९०, प्लुटोनियम यासारखे किरणोत्सर्गी घातक पदार्थ वातावरणात पसरले. अपघातानंतर काही आठवड्यांत अनेक अग्निशामक कर्मचारी आणि कर्मचारी वर्गाचा मृत्यू झाला. पुढील अनेक वर्षांत हजारो लोकांमध्ये विशेषतः थायरॉईड कर्करोग वाढल्याचे आढळले, विशेषतः लहान मुलांमध्ये. अपघातामुळे सुमारे ३.५ लाखांहून अधिक लोकांचे पुनर्वसन करून Pripyat शहर पूर्णपणे रिकामे करण्यात आले. लाखो हेक्टर शेती दूषित झाली. अनेक ठिकाणी अन्नपिकांवर निर्बंध आले. जंगल, नद्या आणि वन्यजीव प्रभावित झाले. आजही सुमारे ३० किमीचे प्रतिबंधित क्षेत्र कायम आहे. अपघातामुळे अब्जावधी डॉलरचे नुकसान झाले.

११ मार्च २०११ रोजी Fukushima (जपान) येथे अणुऊर्जा प्रकल्पात भूकंपामुळे झालेल्या अपघातात वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे शीतकरण व्यवस्था बंद पडली. तीन अणुभट्ट्यांमध्ये Core Meltdown झाले. त्यामुळे सुमारे १.५ लाखांहून अधिक लोकांना स्थलांतरित करावे लागले. दूषित पाणी समुद्रात गेले व मत्स्यव्यवसायावर मोठा परिणाम झाला. काही भागातील दूध, भाजीपाला, तांदूळ यावर निर्बंध आले. अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले. परिसरातील पर्यटन अनेक वर्षे घटले. स्वच्छता, नुकसानभरपाई आणि प्रकल्प निष्क्रियीकरण यासाठी शेकडो अब्ज डॉलर्स खर्च झाले. विस्थापनामुळे नागरिकांमध्ये ताण, नैराश्य आणि सामाजिक समस्या वाढल्या. (क्रमशः)

-नरेंद्र राजाराम हडकर

विशेष लेख- स्वर्गापेक्षा सुंदर कोकणात प्रदुषणकारी प्रकल्प नकोच! (भाग-२)

error: Content is protected !!