काळाने हिरावलेला ‘प्रतीक’
गणेशोत्सवाच्या आनंदात नियतीने दिलेला काळजाचा घाव…
श्री गणेशोत्सवाचा दुसरा दिवस… १५ सप्टेंबर २०२६. दुपारचे दोन वाजले होते. देवगड–निपाणी रस्त्यावरचे असलदे गाव नेहमीप्रमाणे गजबजले होते. गणरायाची आरती नुकतीच पार पडली होती. नैवेद्य दाखवला जात होता. कुठे जेवणावळी सुरू होत्या, कुठे गणपतीच्या गजरात भक्तीचा उत्साह ओसंडून वाहत होता. वातावरणात आनंद होता… आपलेपणा होता… गणेशभक्तीचा उत्सव होता.
आकाश निरभ्र होते. पाऊस नव्हता… वारा नव्हता… वादळ नव्हते… निसर्गाची कोणतीही अवकृपा नव्हती. रस्त्यावरून वाहने नेहमीप्रमाणे ये-जा करत होती. दुचाकीस्वार आपापल्या घराकडे निघाले होते. कुणाच्याही चुकीची चाहूल नव्हती. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते… आणि अचानक… असलदे गावातील सर्व्हिसिंग सेंटरसमोरचा वटवृक्ष कोसळला!
क्षणभरापूर्वी सुरू असलेले जीवन एका क्षणात विस्कळीत झाले. गोंधळ उडाला. मदतीसाठी धावपळ सुरू झाली. पण एका कुटुंबाचा आधार त्या झाडाखाली कायमचा गाडला गेला. दुचाकीवरून घरी जाणारा २७ वर्षांचा प्रतीक वाळके त्या वटवृक्षाखाली दबला गेला. त्याच्या मागे दुचाकीवर बसलेला संदेश थोडक्यात बचावला. प्रतीकला मात्र हालचालही करता आली नाही… काळाने त्याला गाठले होते.
प्रतीक गणपतीसाठी गावी आला होता. मुंबईतील आपल्या मित्रांना त्याने सांगितले होते, “गावी दहा दिवस खूप मजा करून येणार आहे…” किती साधे स्वप्न होते ते! गणपतीचा उत्सव, गावची माणसं, नातेवाईक, मित्र… आई-बाबा आणि बहिणींसोबतचे आनंदाचे क्षण… दहा दिवस गावच्या मातीत मनसोक्त जगायचे होते. पण नियतीने त्याला दीड दिवसही पूर्ण जगू दिले नाही. ज्या गणरायाच्या आगमनासाठी तो आनंदाने गावी आला, त्याच गणेशोत्सवात त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.
प्रतीक प्रत्येकाशी प्रेमाने आणि आदराने वागणारा तरुण होता. त्याच्या बोलण्यात आपलेपणा होता, वागण्यात माणुसकी होती म्हणूनच आज तो आपल्यात नाही, ही कल्पनाच मनाला स्वीकारता येत नाही. एक प्रश्न मात्र मनाला सतत छळतो… प्रतीकची चूक तरी काय होती? त्याने कुणाचे वाईट केले नव्हते. त्याने नियम मोडले नव्हते. त्याने कोणाला दुखावले नव्हते. तो तर आपल्या घरी परतत होता… पण नियतीने त्याच क्षणी त्याचा रस्ता अडवला.
गरीब कष्टकरी आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा गेला. दोन बहिणींचा लाडका भाऊ गेला. घराचा आधार गेला. आई-वडिलांच्या डोळ्यांतील भविष्यातील स्वप्ने एका क्षणात उद्ध्वस्त झाली. ज्या मुलासाठी त्यांनी आयुष्यभर कष्ट केले, ज्या मुलाकडून म्हातारपणीच्या आधाराची अपेक्षा ठेवली, तोच मुलगा त्यांच्या डोळ्यांसमोरून कायमचा निघून गेला. आई-बापाचे काळीज फाटून गेले असेल… बहिणींच्या मनात किती मोठी पोकळी निर्माण झाली असेल… नातेवाईक, मित्र, शेजारी, सगळ्यांच्याच मनावर या घटनेचा खोल आघात झाला. काही दुःखांना शब्द नसतात. काही जखमांना औषध नसते आणि काही विरह आयुष्यभर संपत नाहीत.
असलदे मधलीवाडीतील गणेशोत्सवाच्या काळात अशी दुर्दैवी घटना यापूर्वी कधी घडली नव्हती. गावाने पहिल्यांदाच असा काळजाचा थरकाप उडवणारा प्रसंग पाहिला.
दिवसा अपघातस्थळाचे विद्रूप झालेले दृश्य आणि रात्री स्मशानभूमीत पसरलेली ती भयाण शांतता… हे सगळे पाहिल्यानंतर आजही मन सुन्न आहे. आनंदाच्या उत्सवावर दुःखाची काळी सावली पसरली. ‘प्रतीक’ म्हणजेच आनंद, प्रेम, उत्साह आणि आपलेपणाचे प्रतीक असलेला एक तरुण अचानक मावळला. सूर्य मावळतो तेव्हा दुसऱ्या दिवशी पुन्हा उगवतो. पण माणूस मावळला की त्याची जागा कोण घेणार?
काळापुढे कोणाचेच काही चालत नाही. नियतीचे कोडे माणसाला कधीच पूर्ण उलगडत नाही. काही प्रश्नांची उत्तरे आयुष्यभर मिळत नाहीत. शेवटी जे वास्तव आहे ते स्वीकारण्याशिवाय पर्याय उरत नाही. पण स्वीकारणे म्हणजे दुःख संपणे नव्हे. या घटनेनंतर आमची लेखणीही काही दिवस स्तब्ध झाली होती. शब्द होते, पण ते कागदावर उतरत नव्हते. कारण काही दुःख शब्दांपेक्षा खूप मोठे असते. आज मात्र त्या शब्दांमधून प्रतीकला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्याचा हा छोटासा प्रयत्न…
प्रतीक, तू आज आमच्यात नाहीस; पण तुझ्या आठवणी नक्कीच आमच्यात जिवंत राहतील! तुझ्या आत्म्यास चिरशांती लाभो. तुझ्या आई-वडिलांना हे दुःख सहन करण्याचे सामर्थ्य मिळो. तुझ्या बहिणींना या असह्य विरहातून सावरण्याची शक्ती मिळो. तुझ्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना आणि शेजाऱ्यांना हे दुःख पचवण्याचे बळ मिळो. श्री माऊली देवीच्या चरणी हीच प्रार्थना!
भावपूर्ण श्रद्धांजली, प्रतीक! तुझी आठवण कायम मनात राहील!
-नरेंद्र हडकर











