६७ वर्षाच्या सामाजिक बांधिलकीतून एसटीच्या अनेक सवलतीच्या योजना जाहीर

मुंबई:- ग्रामीण महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) गाड्यांमध्ये विविध योजनांतर्गत काही सामाजिक घटकांसाठी लागू असलेल्या प्रवास सवलत योजनांमध्ये सुधारणा करण्यासह नव्या योजना लागू करण्याचा निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

गेली ६७ वर्षे ग्रामीण आणि शहरी भागांसाठी महत्त्वाचे प्रवासाचे साधन असलेल्या एसटीने केवळ सार्वजनिक परिवहनाची यंत्रणाच निर्माण केली नाही तर सामाजिक बांधिलकीही जपली आहे. महामंडळाकडून अंध, अपंग, कर्करोग, क्षयरोगग्रस्त, विद्यार्थी, विद्यार्थिनी, स्वातंत्र्य सैनिक, पुरस्कारप्राप्त व्यक्तींना प्रवासी भाड्यात सवलत देण्यासाठी आतापर्यंत राबविण्यात आलेल्या एकूण २२ योजनांच्या सवलतीत वाढ करण्यात आली आहे. तसेच माध्यमिक शालांत परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण केंद्र ते निवासस्थान यादरम्यान प्रवासासाठी ६६.६७ टक्के सवलत देण्यासाठी कौशल्य सेतू अभियान ही नवी योजना सुरु करण्यात आली आहे.

१) ग्रामीण भागातील इयत्ता ५ वी ते १० वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना शाळेत जाण्यासाठी अहिल्याबाई होळकर योजनेंतर्गत एसटीने मोफत प्रवास योजना राबवण्यात येत होती. या योजनेमध्ये सुधारणा करुन आता ही योजना १२ वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठीही लागू करण्यात आली आहे.
२) तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळ किंवा विद्यापीठामार्फत १९८६ पूर्वीच्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या विद्यार्थी मासिक पास योजनेंतर्गत प्रवासी भाड्यात ६६.६ टक्के सवलत देण्यात येत होती. यात आता सुधारणा करुन १९८६ नंतर सुरु झालेल्या विविध अभ्यासक्रमांचाही समोवश करण्यात आला आहे.
३) याशिवाय अर्जुन, द्रोणाचार्य, शिवछत्रपती व दादोजी कोंडदेव पुरस्कार तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कारप्राप्त व्यक्तींना सर्वसाधारण व निमआराम बसमध्ये वर्षभर राज्यांतर्गत प्रवासामध्ये १०० टक्के सवलत देण्यात येत आहे. तसेच शासनाकडून प्रति लाभार्थी एक हजार रुपयांची प्रतिपूर्ती करण्यात येत होती. या योजनेमध्ये सुधारणा करण्यात येऊन राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारार्थींना वातानुकुलित बस सेवा देण्यात येणार असून स्मार्टकार्ड देण्यात येणार आहेत. तसेच प्रत्यक्ष प्रवास केलेल्या मुल्याची प्रतिपूर्ती शासनामार्फत करण्यात येणार आहे. तसेच स्मार्टकार्डची व्यवस्था होईपर्यंत २ हजार रुपयांप्रमाणे प्रतिलाभार्थी प्रतिपूर्ती करण्यात येणार आहे.
४) राज्यस्तरावरील पुरस्कारार्थींना आधारकार्ड संलग्न स्मार्टकार्ड देण्यात येत आहे. स्मार्टकार्डची व्यवस्था होईपर्यंत प्रतिलाभार्थी चार हजार रूपयांची प्रतिपूर्ती राज्य शासनामार्फत करण्यात येणार आहे.
५) तसेच स्वातंत्र्य सैनिकांना आणि ६५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणारी सवलत पूर्वीप्रमाणेच लागू ठेवण्यात आली असून यासाठी आधारकार्ड संलग्न स्मार्टकार्ड देण्यात येणार आहे. तसेच स्वातंत्र्य सैनिकांना यापूर्वी प्रतिलाभार्थी एक हजार रुपयांची प्रतिपूर्ती करण्यात येत होती ती आता स्मार्ट कार्ड उपलब्ध होईपर्यंत प्रति लाभार्थी चार हजार रुपये इतकी करण्यात आली आहे. तसेच शिवशाही बस सोडून वातानुकुलित बसने प्रवास करीत असल्यास प्रवास भाड्यातील फरकाची रक्कम भरून वातानुकूलीत बसने प्रवास करणे शक्य होणार आहे.
६) तसेच ज्येष्ठ नागरिकांना शिवशाही बसमध्ये 45 टक्के सवलत देण्यात आली आहे. विधानमंडळाचे आजी माजी सदस्य व अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना वर्षभरात जास्तीत जास्त 8 हजार कि.मी. प्रवासासाठी पूर्वीप्रमाणेच शंभर टक्के सवलत देण्यात आली असून ही सवलत शिवशाही बसमध्येही लागू असेल. यासाठी आधारकार्ड संलग्न स्मार्टकार्ड देण्यात येणार आहे.
७) तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्राप्त व्यक्तींना प्रवासी भाड्यात एक हजार किमीपर्यंत १०० टक्के सवलत पूर्वीप्रमाणेच कायम ठेवण्यात आली असली तरीही स्मार्ट कार्ड उपलब्ध होईपर्यंत दोन हजार रूपये प्रतिलाभार्थी प्रतिपूर्ती देण्यात येणार आहे.
८) क्षयरोग व कर्करोग रुग्णांसाठी यापूर्वी असलेली प्रवासी भाड्यातील ५० टक्क्यांची सवलत वाढवून ७५ टक्के करण्यात आली आहे. तसेच क्षयरोग, कुष्ठरोग, कर्करोग रुग्णांसाठी २ वर्षाची वैधता असलेले आधारकार्ड संलग्न स्मार्टकार्ड देण्यात येणार असून प्रवासी भाड्यामध्ये ७५ टक्के सवलत देण्यात आली आहे. सिकलसेलग्रस्त, एचआयव्ही बाधीत, डायलेसिस रुग्णांना पूर्वीप्रमाणेच १०० टक्के प्रवास सवलत देण्यात आली आहे. या सवलत योजनेत हिमोफिलिया रूग्णांचा समावेश करण्यात आला आहे.
९) याशिवाय ४० टक्क्यांहून अधिक अंधत्व व अपंगत्व असणाऱ्या व्यक्तींना ७५ टक्के सवलत पूर्वीप्रमाणेच लागू असून रेल्वेप्रमाणे ६५ टक्के किंवा अधिक अपंगत्व असणाऱ्या व्यक्तींच्या साथीदारास प्रवासी भाड्यात ५० टक्के सवलत देण्यात आली आहे.
१०) याशिवाय परिवहन मंडळामार्फत राबवण्यात येणाऱ्या इतर विविध योजना पूर्वीप्रमाणेच राबवण्यात येत आहेत. ज्यामध्ये राज्य शासनाने पुरस्कृत केलेल्या खेळांमध्ये भाग घेतलेले विजेत स्पर्धक, विद्यार्थी जेवणाचे डबे, वसतीगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना सुटीत तसेच आजारी आई वडिलांना भेटण्यासाठी मूळ गावी जाण्यासाठी देण्यात येणारी सवलत, तसेच आषाढी आणि कार्तिकी एकादशीला पंढरपूरला शासकीय पुजेचा मान मिळालेल्या एका वारकरी दांपत्यास देण्यात येणारी सवलत तसेच अपंग गुणवंत कामगार पुरस्कार तसेच आदिवासी पुरस्कारप्राप्त व्यक्तीस व त्यांच्या साथीदारांना पूर्वीप्रमाणेच वर्षभर मोफत प्रवास सवलत योजना यासह इतर योजनांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *