नीतिमूल्य जपून पोलीस दलाला सुसंस्कारित आणि सामर्थ्यवान बनविणारे अरविंद इनामदार

प्रामाणिक, शिस्तप्रिय, स्पष्ट व प्रभावी वक्ते, लेखक आणि पोलीस दलात सुधारणांचा आग्रह धरणारे अधिकारी म्हणून अरविंद इनामदार यांची ओळख होती. अरविंद इनामदार यांचा जन्म विदर्भातील तरवड या गावी झाला. त्यांचे माध्यमिक शिक्षण पुण्यातील मॉडर्न हायस्कूलमध्ये झाले तर महाविद्यालयीन शिक्षण सर परशुरामभाऊ महाविद्यालय येथे झाले. त्यांनी अर्थशास्त्रात बी. ए. ची पदवी तर पुढे एम.ए.ची पदवी प्राप्त केली. त्यानंतर केंद्रिय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून १९६४ साली ते भारतीय पोलीस सेवेत निवडले गेले.

पोलीस दलातील कारकीर्द
पोलीस दलात असताना त्यांनी मुंबई, नागपूर, औरंगाबाद आणि नाशिक येथे सेवा केली. १९८२ साली अरविंद इनामदार यांची नाशिक येथील पोलीस प्रशिक्षण अकादमीचे प्राचार्य म्हणून नियुक्ती झाली होती. पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या १९८३ च्या तुकडीला त्यांनी प्रशिक्षण आणि मार्गदर्शन केले होते. एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून त्यातील काही अधिकारी पुढे गाजले; त्यामध्ये प्रामुख्याने प्रदीप वर्मा, विजय साळसकर, प्रफुल्ल भोसले या अधिकाऱ्यांचा समावेश होता. या अधिकाऱ्यांनी मुंबईतील टोळीयुद्ध संपविण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.

अकादमीमध्ये पोलिसांच्या प्रशिक्षणाबरोबर त्यांचा व्यक्तिमत्व विकास घडवून आणण्यासाठी अनेक नामवंत वक्त्यांना, साहित्यिकांना त्यांनी पाचारण केले. त्यातून कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्याशी त्यांचा ऋणानुबंध कायमचा जुळला होता. इनामदार यांच्या साहित्यिक जाणिवेची चुणूकही तेव्हाच दिसली. संस्कृत श्लोकाविना त्यांचे भाषण पूर्णच होत नसे.

अकादमीत मोठय़ा संख्येने आलेल्या ग्रामीण मुलांना जेवायचे कसे, बोलायचे कसे, कपडे कसे घालायचे? आदी धडे क्वचितच अकादमीत कधी मिळाले असावेत; पण ते त्यांनी दिले. खऱ्या अर्थाने पोलीसी प्रशिक्षण देऊन त्यांनी महाराष्ट्र्राला प्रामाणिक पोलिसांची फौज तयार केली. त्यांच्या नितीमूल्याधिष्ठीत सुसंस्काराच्या प्रशिक्षणाने अनेकांनी त्यांना आपल्या गुरु स्थानी मानले.

हेही वाचा- रामभाऊ- मुंबई पोलीस दलातील नैतिकतेचा जाज्वल्य मूर्तिमंत आदर्श!

पोलीस अकादमीत पोस्टिंग म्हणजे कमी महत्त्वाचे मानून बदली करून घेण्यासाठी आज तर चढाओढ लागते. पण इनामदार यांनी त्या काळात या अकादमीचे रूपडेच पालटून टाकले होते. लष्करी पद्धतीचे खडतर प्रशिक्षण उपनिरीक्षक म्हणून पोलीस दलात रुजू होणाऱ्यांना दिले. याचा परिणाम असा झाला की, ४०० जणांच्या तुकडीतील ७० जण नापास झाले. अकादमीच्या इतिहासात असे कधीच घडले नव्हते. या ७० जणांना पुन्हा सहा महिने खडतर प्रशिक्षणाला सामोरे जावे लागले. त्यातही पुन्हा काही जण नापास झाले. दोघा-तिघांना तर त्यांनी घरीच पाठवले. प्राचार्य इनामदार असेपर्यंत फक्त शिस्त आणि शिस्तच या अकादमीत होती. फक्त एवढेच नव्हे, तर अकादमीत मिळणाऱ्या जेवणाचा दर्जाही त्यांनी सुधारला आणि दरही कमी केले होते.

१९९३ मध्ये मुंबईत दंगलीने कहर गाठला होता, तेव्हा तत्कालीन आयुक्त श्रीकांत बापट यांनी इनामदारांना मुंबईत बोलावून घेतले. त्याआधी विक्रोळीतील गोदरेज कंपनीतील दत्ता सामंतप्रणीत संपाच्या वेळी इनामदार यांच्यातील कणखर पोलिसाची चुणूक दिसली होतीच. गुन्हे अन्वेषण विभागाचे पहिले सहआयुक्त होण्याचा मान इनामदार यांच्याकडेच जातो. त्यावेळी इनामदार यांनी भायखळा येथील दगडी चाळीत छापा टाकला होता. दगडी चाळीत शस्त्रास्त्रे सापडल्यानंतर अरुण गवळीवर ‘टाडा’अंतर्गत कारवाई करण्याचे श्रेय इनामदारांकडेच जाते.

मुंबईचे पोलीस आयुक्त होण्याचे त्यांचे स्वप्न काही पुरे होऊ शकले नाही. त्यांना नागपूरच्या पोलीस आयुक्तपदी नेमले गेले. बॉम्बे डाईंगचे अध्यक्ष नस्ली वाडीया यांच्या हत्येचा कट तसेच जळगाव सेक्स स्कॅंडल आणि मानवी तस्करी (१९९४) सारख्या संवेदनशील प्रकरणांचा तपास त्यांनी केला होता. त्यांच्या काळात महाराष्ट्रात टाडा आणि मोका हे कायदे आणण्यात आले.

इनामदारांची १९८७ साली मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्तपदी निवड झाली. ते गव्हर्नमेंट स्टाफ कमिशनचे चेअरमन होते. ऑक्टोबर १९९७ ते जानेवारी २००० या कालावधीत ते महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक होते. राज्याचे ते पोलीस महासंचालक झाले खरे; परंतु १९९९ मध्ये युती सरकार पायउतार झाल्यावर सत्तेवर आलेल्या आघाडी सरकारातील उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याशी त्यांचे पटले नाही. इनामदार यांची राज्याच्या पोलीस प्रमुखपदावरून पुण्यात विशेष पद निर्माण करून बदली केली गेली. आत्मसन्मान राखत इनामदार यांनी सेवेचे दीड वर्ष शिल्लक असतानाच स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली.

त्यांनी आपली कारकीर्द पणाला लावून कायम पोलिस दलातील वाईट गोष्टींवर सतत बोट ठेवले. त्यांची कार्यप्रणाली भ्रष्टाचारविरहित होती. याच स्वभावामुळेच त्यांचे तत्कालीन गृहमंत्र्यांशी पटले नाही आणि निवृत्ती आधीच पोलिस दलातून स्वेच्छानिवृत्ती घेतली.

पोलिसांना मिळणाऱ्या सोयी सुविधा, वेतन अशा गोष्टीत सुधारणा करण्यासाठी त्यांनी आग्रह धरला होता. कुठल्याच राजकीय दबावाला न जुमानणाऱ्या इनामदार यांना त्यामुळेच अनेकदा बदल्यांना सामोरे जावे लागले. ३६ वर्षांच्या पोलीस दलातील कारकीर्दीत त्यांच्या एकोणीसवेळा बदल्या झाल्या होत्या.
सेवानिवृत्तीनंतरही त्यांना केंद्र तसेच राज्य सरकारकडून बोलावणे आले; पण त्यांनी ते प्रस्ताव नाकारले. २००२ मध्ये उत्तर प्रदेशच्या राज्यपालांचे सुरक्षा सल्लागार हे पद त्यांनी स्वीकारले. पण ते अल्पमुदतीचे ठरले.

२०१५ मध्ये त्यांनी अरविंद इनामदार फाउंडेशनची स्थापना केली. या संस्थेतर्फे ते दरवर्षी पोलीस दलात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांचा गौरव करत. पोलिसांच्या कल्याणासाठी त्यांनी केलेले काम स्पृहणीय होते. निवृत्तीनंतरही अरविंद इनामदार फाऊंडेशनच्या माध्यमातून ते शेवटपर्यंत पोलिसांच्या कल्याणासाठी झटत राहिले.

इनामदार यांनी नेहमीच पोलिस आणि त्यांच्या कुटुंब कल्याणासाठी काम केले. यासाठी अनेकदा ते सरकारी अधिकऱ्यांपुढेही भूमिकेवर ठाम राहिले. पोलिसांप्रमाणे सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळावा यासाठी ते नेहमीच लढत राहिले. इनामदार हे पोलिस दलात कार्यरत असले तरी ते मनाने अतिशय संवेदनशील होते. म्हणून त्यांनी जपलेली मूल्ये आणि माणुसकीशी कधीही तडजोड केली नाही. त्यांच्यावर भगवद्गीतेचा मोठा प्रभाव होता आणि ते तसे स्पष्टपणे सांगत. इनामदार साहित्य वर्तुळातही तितकेच लोकप्रिय होते आणि त्यांना गाण्याचीही प्रचंड आवड होती.

न्यायप्रिय, प्रामाणिक कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून ओळखले जाणारे राज्याचे माजी पोलिस संचालक अरविंद इनामदार (७९) यांचे शुक्रवारी ८ नोव्हेंबर २०१९ रोजी पहाटे निधन झाले. गिरगाव येथील हरकिसनदास रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मरिन लाइन्स येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांनी अखेर, ‘राम राम देवा’ हा आपला नेहमीचा नमस्कार करीत निरोप घेतला.

(संदर्भ- संकेतस्थळावरील माहितीचा स्रोत)

You cannot copy content of this page