रामभाऊ- मुंबई पोलीस दलातील नैतिकतेचा जाज्वल्य मूर्तिमंत आदर्श!

पाक्षिक `स्टार वृत्त’चे सहसंपादक सन्मानिय श्री. मोहन सावंत यांचे जिवलग दोस्त श्री. राम कदम खरोखरच प्रेमळ माणूस! या दोघांचे अगदी तरुणपणापासून घरोब्याचे संबंध. एकमेकांच्या सुखदुःखात सामील होताना ह्या दोस्तांनी कधीही स्वार्थ साधण्याचा मनात विचार आणला नाही. एकमेकांबद्दलची आपुलकी जोपासली. त्यामुळे दोघांच्या कुटुंबीयांमध्ये या जोडीची मैत्री सर्वश्रुत होतीच; पुढे श्री. मोहन सावंत महाराष्ट्र शासनाच्या प्रशासकीय सेवेत तर रामभाऊ पोलीस दलात रुजू झाले. आजही दोघेही निवृत्त झाले; पण त्यांच्या दोस्तीचा धागा मात्र अधिकाधिक घट्ट होत गेला. आजही ते वेळातवेळ काढून एकमेकांना भेटतात. रामभाऊंनी सांगलीमध्ये `समाधान’ नावाचा बंगला बांधून आपले पुढील समाधानाचे आयुष्य मोठ्या रूबाबात जगताहेत. कधीकधी कामानिमित्त मुंबईला ते येत असतात. रामभाऊंबद्दल सावंत नेहमीच माझ्याशी बोलताना कौतुक करायचे. पण जेव्हा रामभाऊंशी माझी प्रत्यक्ष भेट झाली; तेव्हा त्यांच्या विषयी लेख लिहावा असं हे व्यक्तिमत्त्व आहे; याची मनोमन खात्री पटली.

श्री. राम कदम हे निवृत्त पोलीस हवालदार म्हणजे नीतिमत्तेचा – नैतिकतेचा जाज्वल्य मूर्तिमंत आदर्श! यांच्याबद्दल थोडसं मनोगत मांडण्याचा प्रयास आम्ही ह्या लेखाद्वारे करीत आहोत!

पोलीस म्हटलं की मनामध्ये थोडीशी साशंकता सहजपणे मनामध्ये तयार होते. पोलीस दलात काम करणाऱ्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व, शारीरिक जडणघडण, देहबोली, नजरेतील करारीपणा; असं सगळं काही वेगळं वाटतं. पोलिसांना सदैव ज्या वातावरणात राहावं लागतं, त्या वातावरणाची वेगळीच एक खासियत असते म्हणून पोलिसांबद्दलची मनातील साशंकता नेहमीच खरी असते असे नाही. याचा अनुभव श्री. राम कदम यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केल्यानंतर – संवाद साधल्यानंतर आला.

श्री. राम कदम म्हणजे रामभाऊ मुंबई पोलीस दलात असलेला दरारा काही औरच! सहा फूट उंच, भारदस्त व्यक्तिमत्व, दणकट व पिळदार देह! त्यांनी पोलीस दलात नोकरी करताना तो रुबाब ठेवला आणि आज निवृत्त झाल्यानंतरही त्यांचा तोच रुबाब सहजपणे नजरेस पडतो. पोलीस दलातील नोकरी करताना जी शिस्त त्यांनी स्वतःच्या शरीराला शिस्त लावून घेतली; ती शारीरिक – मानसिक शिस्त ते आजही जोपासतात. हा पोलीस जवान निवृत्त होऊनही मोठ्या दिमाखात आयुष्य जगताना सामाजिक बांधिलकी मात्र अजिबात बाजूला सारत नाही; त्याचे कौतुक वाटते. त्यांना प्रत्यक्ष भेटल्यावर त्यांनी आपल्या देवासमान वाटणाऱ्या साहेबांचे नाव घेतले. आपल्या साहेबांचे गुणगान सुरु केले आणि आपले सर्वांगिण सुंदर आयुष्य आपल्या साहेबांनी कसे संपन्न केले ते सांगितले. त्या साहेबांचे नाव आहे अरविंद इनामदार साहेब!

हेही वाचा- नीतिमूल्य जपून पोलीस दलाला सुसंस्कारित आणि सामर्थ्यवान बनविणारे अरविंद इनामदार

महाराष्ट्रात अरविंद इनामदार साहेबांचे नाव अगदी अभिमानाने, गर्वाने, स्वाभिमानाने, प्रेमाने, आदराने घेणारे अधिकारी – कर्मचारी आहेत. पोलीस दलात इनामदार साहेबांनी केलेले काम कधीही विस्मरणात जाणार नाही. इनामदार साहेबांनी आपल्या छत्तीस वर्षाच्या कालावधीत पोलिसांना, पोलीस अधिकाऱयांना संस्कार दिले, नीतिमत्ता शिकवली, मनाने आणि शरीराने समर्थ होण्यासाठी पोलिसांनी नेमकं काय करायला पाहिजे? याचं शास्त्रशुद्ध आणि अचूक मार्गदर्शन केले आणि नैतिकता जोपासणारे पोलीस घडविले.

देशाविरुद्ध छुपे युद्ध करणाऱ्या गॅंगस्टर टोळ्यांशी दोन हात करताना पोलिसांचे मानसिक खच्चीकरण होता कामा नये, पोलिसांना मिळणारे वेतन कमी असू नये, त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना सर्व सुखसुविधा मिळायला हव्यात, पोलिसांचा मान राखला गेला पाहिजे, राजकारण्यांनी पोलिसांचा वापर करू नये आणि पोलीसी कारवाईत राजकारण्यांचा हस्तक्षेप असू नये; अशा अनेक गोष्टींसाठी अरविंद इनामदार साहेबांनी आपल्या कारकिर्दीत केलेले कार्य प्रचंड मोठे आहे. त्यांनी पोलीस दलाला एक नवीन स्वच्छ, प्रामाणिक, दणकट, खंबीर, समर्थ अशा विशेषणांनी नटलेला चेहरा दिला – ओळख दिली. आपल्या पोलीस दलातील प्रत्येक व्यक्तीवर जीवापाड प्रेम करून कुटुंब प्रमुखाचे कर्तव्य त्यांनी बजावले. अशा अरविंद इनामदार साहेबांची स्वच्छ प्रतिमा आणि आदर्श मनामध्ये निरंतर ठेवत रामभाऊंनी आपली कारकीर्द यशस्वीरित्या पार पाडली. इनामदार साहेबांबद्दल बोलताना-त्यांच्या आठवणी सांगताना राम भाऊंचे डोळे पाणावतात. मुखाने आपल्या साहेबांचे वर्णन करताना ते थकत नाहीत आणि त्यांचे नेत्र त्यांच्या मनात साहेबांबद्दल असलेले आदरयुक्त प्रेम प्रकट करतात.

रामभाऊंनी अनेक गँगस्टर नामचिन गुंडांना नामोहरण केले. त्यांना जेलची हवा खायला लावली. त्यांच्यामध्ये पोलिसांचा धाक निर्माण केला. स्वतः आपल्या वर्दीशी इमान राखून कधीही स्व:स्वार्थासाठी कसलीही तडजोड केली नाही. अर्थपूर्ण तडजोड करून गुन्हेगार पोलिसांशी हात मिळवणी करतानाचे चित्र अनेक वर्षे आपण सहजपणे पाहत असताना मात्र रामभाऊंच्या पोलीसी कारकिर्दीत अनेकवेळा असे मोहाचे क्षण आले – गुन्हेगारांकडून आणले गेले; परंतु त्यांचा प्रामाणिकपणा नेहमीच आडवा आला नव्हे त्यांनी तो मुद्दामहून जपला. यालाच व्रतस्थ जीवन म्हणतात. आपण जी पोलिसाची नोकरी करतोय ती आपल्याला इज्जत देते – मानसन्मान देते, ती नोकरी आपल्या कुटुंबीयांचे पालनपोषण करते; त्यामुळे आपल्या नोकरीशी गद्दारी करायची नाही; हा त्यांचा स्थायीभाव बनला आणि तो त्यांनी जपला. म्हणूनच ते पोलीस शिपाई म्हणून सुद्धा यशस्वी झाले. ते आज आपल्या पोलीस दलातील कारकिर्दीबद्दल पुर्णतः समाधानी आहेत. त्यांचे दोन मुलगे, सुना उच्चशिक्षित असून चांगल्या बँकांमध्ये – नामवंत कंपन्यांमध्ये अधिकारी पदावर कार्यरत आहेत. “आपण दोन नंबरचे पैसे नाही कमविले; त्यामुळे संसारात आर्थिक अडचणी आल्या; पण आज माझी संस्कारी मुलं समाधानाने आपापला संसार करीत आहेत. हीच माझी खरी कमाई- संपत्ती!” असे रामभाऊ अभिमानाने सांगायला विसरत नाहीत.

पोलीस दलात नोकरी करताना अनेक गुंडांशी थेट चकमक झाली; पण त्यांनी आपल्या जीवाची पर्वा केली. त्यामुळे गुन्हेगारी जगतामध्ये त्यांचा विशेष दरारा होता आणि आजही रामभाऊंचा त्यांच्या नैतिकतेबद्दल आदर केला जातो. आजचे काही टॉपचे राजकारणी सुद्धा पोलीसी कारवाई केलेली असूनही त्यांच्या पोलीसी कारकिर्दीविषयी सन्मान करतात. हा सन्मान सगळ्यांनाच मिळतो असं नाही; पण जो आपल्या क्षेत्रात आणि आपल्या पदावर कार्यरत असताना प्रामाणिक-कार्यक्षमपणे कार्य करतो; तो निश्चितच समाजात आदर्श निर्माण करतो. रामभाऊंनी असाच आदर्श निर्माण केला असून त्यांच्या पोलीसी कारकिर्दीला सलाम आणि सेवानिवृत्त जीवनाला मनःपूर्वक शुभेच्छा!

-नरेंद्र हडकर

You cannot copy content of this page