संपादकीय- `आनंद’ सच्चिदानंदामध्ये एकरूप झाला!
हरि ॐ श्रीराम अंबज्ञ
डॉ. आनंद कोरे यांनी आपला देह सद्गुरु चरणी समर्पित करून भर्गलोकाच्या प्रवासाकडे प्रयाण केले. पण एक सामान्य श्रद्धावान म्हणून त्यांच्या जाण्याने एक सच्चा मित्र, आमचा खराखुरा मार्गदर्शक देवमाणूस, परमस्नेही आपल्यातून निघून गेल्याची खूप मोठी वेदना हृदयात जाऊन बसली. बातमी ऐकून धक्काच बसला. चटकन डोळ्यातून पाणी आले. खूप दुःख झाले. बापूराया, अजूनही छातीत दुखल्यासारखे वाटते.
डॉक्टरांशी फोनवरून बोलणं व्हायचं; पण प्रत्यक्ष भेट पाच वर्षांपूर्वी कोल्हापूर मेडिकल कॅम्पमध्ये झाली. प्रथम भेटीतच त्यांच्या प्रेमळयुक्त स्वभावाचा परिचय झाला. खूप खूप बोलले. कौतुकाने आमच्या पाठीवरून हात फिरविला. त्यांच्या मनात सद्गुरुंबद्दल असणारी अपारश्रद्धा आणि दृढविश्वास त्यांच्या प्रत्येक कृतीतून, त्यांच्या बोलण्यातून सदैव प्रवाहित होत असायाची. प्रत्येकाशी त्यांनी जिव्हाळ्याने संबंध जोपासले. त्यांचा साधासरळ स्वभाव. कसलाही अहंकार नाही. वैद्यकीय क्षेत्रात कार्य करताना त्यांच्या हृदयात सेवेचा खराखुरा भाव असायचा. त्यात कुठेही कृत्रिमपणा कधीच जाणवायचा नाही. कोणालाही कुठलीही मदत करण्यासाठी त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. आपण परमात्म्याचे कार्य करतोय; हीच त्यांची भूमिका अनेक श्रद्धावानांना महत्वाची आणि आदर्शवत वाटायची.
परमपूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंनी एका महत्वाच्या पितृवचनात सांगितले होते की, सच्च्या श्रद्धावानाला फक्त `जन्म’च असतो; मृत्युलोकातून भर्गलोकात आणि भर्गलोकातून मृत्युलोकात!
डॉ. आनंद कोरे यांच्यासारख्या श्रद्धावानाला `मृत्यू’ असूच शकत नाही. ते आम्हा प्रत्येकाच्या मनात जीवंत राहतील. ज्या ज्या व्यक्ती त्यांच्या संपर्कात आल्या त्या त्या व्यक्तींकडे त्यांच्या गोड गोड प्रेमाच्या आठवणी असतील. गेल्या वर्षी कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे परिस्थिती गंभीर बनली होती. अनेक रस्ते बंद झाले होते, विदयुत सेवा खंडित झाली होती, अनेक गावांशी संपर्क तुटला होता. अशाही आणीबाणीच्या परिस्थितीत आणि पुर ओसरल्यानंतर ग्रामीण भागात आरोग्य सेवा पुरविण्यासाठी डॉ. आनंद कोरे यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेली गरजूंची सेवा कोल्हापूरवासियांच्या सदैव स्मरणात राहील.
भक्तीमार्गातील सेवाभाव म्हणा किंवा सेवामार्गातील भक्तीभाव म्हणा.. तो कसा जोपासायचा? ह्याचा आदर्श पाठ डॉ. आनंद कोरे यांनी आपल्या जीवनामध्ये कोरला, रुजविला, वाढविला आणि त्याला बहर आल्यानंतर पाहण्याचे सौभाग्य आमच्यासारख्या लाखो मित्रांना लाभले. हीच ती परमात्म्याची अकारण कारुण्याची कृपा असे आम्ही मानतो. आयुष्यामध्ये अशा व्यक्ती काही मिनिटांसाठी आल्या तरी त्यांचा प्रभाव जन्मभर पुरून उरणारा असतो. म्हणूनच डॉ. आनंद कोरे यांच्या स्मृती सदैव स्मरणात राहतील.
नदी सागराला मिळते आणि सागरच होऊन जाते. नदीला स्वतःची ओळख पुसून टाकायची असते. सच्चा श्रद्धावान नदीप्रमाणे सद्गुरुंच्या चरणांशी एकरूप होऊन जातो! त्याचप्रमाणे `आनंद’ सच्चिदानंदमध्ये एकरूप झाला!
पाक्षिक `स्टार वृत्त’वर मनापासून प्रेम करणाऱ्या आमच्या श्रद्धावान मित्राला अंबज्ञ श्रद्धांजली! त्यांच्या कुटुंबियांच्या, नातेवाईकांच्या, श्रद्धावान मित्रांच्या, सहकाऱ्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत! सर्वांसाठी नाथसंविध् नाथसंविध् नाथसंविध्…
-नरेंद्रसिंह हडकर