संपादकीय- सामाजिक सेवेला समर्पित त्यागी वृत्तीच्या मातेचा आशीर्वाद!

दोनच दिवसापूर्वी सन्मानिय जेष्ठ विधिज्ञ श्रीमती निर्मलाताई सामंत-प्रभावळकर यांना भेटण्याचा सुवर्णयोग आला. हा योग जुळवून आणणारे आमचे मार्गदर्शक, मित्र आणि पाक्षिक `स्टार वृत्त’चे सहसंपादक मोहन सावंत यांचे ऋण कधीही विस्मरणात जाणार नाहीत. कारण एखादे आदर्श व्यक्तिमत्व आपणास सदैव स्फूर्ती देत असतं; पण त्या आदर्श व्यक्तिमत्वाची थेट-प्रत्यक्ष बोलण्याचा योग मात्र येत नाही. माझ्या महाविद्यालयीन जीवनापासून निर्मलाताई सामंत-प्रभावळकर यांना मी आदर्श मानतोय. मुंबईच्या महिला महापौर म्हणून त्यांनी केलेले काम आणि त्यांची सामाजिक संकल्पनांची परिभाषा समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याची किमया मला नेहमीच आवडायची आणि आजही आवडते. त्यामुळे कधीतरी निर्मलाताईंची भेट होईल असं वाटायचं आणि प्रत्यक्ष भेट घेण्याचा योग मला सन्मानिय मोहन सावंत यांनी आणून दिला. मला ताईंशी गप्पा मारता आल्या, सामाजिक प्रश्नांवर त्यांच्याशी चर्चा करता आली. त्यावेळी पाक्षिक `स्टार वृत्त’ची गेल्या एकवीस वर्षाची वाटचाल आणि पुढील ध्येयधोरणे सांगितली आणि विशेष म्हणजे त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यामुळे मला खूप आनंद वाटला.

महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून विधिज्ञ निर्मलाताई ताईंनी केलेले काम महाराष्ट्र कधीही विसरणार नाही. त्याच काळात त्यांचे स्वीय सहाय्यक म्हणून मोहन सावंत यांनी काम केले; हे विशेष! त्यांच्या ऋणाबंधातून आम्हीसुद्धा ताईंशी मनमोकळेपणाने चर्चा करू शकलो. उच्च विद्याविभूषित असूनही संस्कार मूल्य जपणाऱ्या, सामाजिक जाणीव असणाऱ्या ताईंनी आपले जीवन समाजकार्याला समर्पित करून घेतले आहे. त्यांनी केलेला त्याग हा खूप मोठा आहे. नि:स्वार्थी, प्रामाणिक आणि कार्यक्षमता असणारी स्त्री जेव्हा सामाजिक जीवनात मातृत्वाची भूमिका निभावते, तेव्हा ती स्त्री समाजाची माता बनते; म्हणून मी निर्मलाताईंकडे समाजाची माता म्हणून बघतो. जशी आई आपल्या बाळांवर नि:स्वार्थ प्रेम करते, आपल्या गावाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी त्याग करून समर्पित जीवन जगते, त्याचप्रमाणे समाजातील दुर्लक्षित घटकांना आपली बाळं मानून कार्य करणाऱ्या निर्मलाताईं मातेच्या रूपात कार्य करतात. अशा मातेचा आशीर्वाद खूप महत्त्वाचा आणि तो आम्ही घेतला.

राजकारणात असूनही निःस्वार्थी वृत्तीने कार्य कसे करावे? राजकारणात असूनही सामाजिक सभानात कशी जोपासावी? राजकारणात असूनही कोणतेही आरोप होणार नाहीत; ह्यासाठी आपल्या कार्यात पारदर्शीपणा कसा जोपासावा? राजकारणात असूनही समाजातील तळागाळातील आणि दुर्लक्षित घटकांसाठी कार्य कसे करावे? हे निर्मलाताईंच्या आजपर्यंतच्या कार्यातून दिसून येते. ह्या आदर्शवादातून निर्मलाताईंची समर्थता सहजपणे लक्षात येते.

महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा, मुंबईच्या महिला महापौर आणि राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या म्हणून काम करताना निर्मलाताईंचे व्यक्तिमत्व अधिकाधिक अनुभवसंपन्न होत गेले. विधी महाविद्यालयात त्यांनी अनेक व्याख्यानं दिलीत. त्यातून अनेक कायदेतज्ञ त्यांनी घडविले. सध्या त्या `सेंटर फॉर स्टडी ऑफ सोशल चेंज’ ह्या भारतात अग्रस्थानी असलेल्या स्वयंसेवी संस्थेत प्रमुख सल्लगार म्हणून कार्यरत आहेत. त्या संस्थेचा अवाढव्य कार्यभार आहे. त्यावर आम्ही भविष्यात सविस्तर लिखाण करू! निर्मलाताईंनी इथे सुद्धा आपल्या कर्तृत्वातून सामाजिक कार्याची व्याप्ती वाढविली आहे. नुकताच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांची आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबई विभागीय अर्बन सेल अध्यक्षपदी नियुक्ती झाली. भविष्यात राजकारणाच्या माध्यमातून सुद्धा निर्मलाताई नवा समाजसेवेचा आदर्श निर्माण करतील; असा आमचा दृढविश्वास आहे. भविष्यात पाक्षिक `स्टार वृत्त’च्या माध्यमातून निर्मलाताईंच्या सामाजिक कार्याचा नक्कीच आढावा घेऊ! निर्मलाताईंना पाक्षिक `स्टार वृत्त’ परिवाराकडून मनःपूर्वक शुभेच्छा!

You cannot copy content of this page