संपादकीय- आदर्शवत दीपस्तंभाचा अमृतमहोत्सवी वाढदिवस!

सन्मा. श्री. देविदास कदम यांना अमृतमहोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने मनःपूर्वक शुभेच्छा!

आमचे परममित्र सन्मानिय श्री. देविदास कदम यांना अमृतमहोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने मनःपूर्वक शुभेच्छा!

शिवनेरी सेवा मंडळाचे उपाध्यक्ष म्हणून श्री. देविदास कदम आज काम करीत असले तरी त्यांनी शिवनेरी मंडळाच्या स्थापनेपासून संस्थापक स्वर्गीय मोहन नाईक यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून केलेली मेहनत आणि दिलेले योगदान कौतुकास्पद आहेच; त्याहीपेक्षा `आदर्शवत दीपस्तंभ’ म्हणून त्यांची ओळख कधीच पुसली जाणार नाही; असे आमचे म्हणणे आहे. कारण सलग ५५ वर्षे त्यांनी शिवनेरी सेवा मंडळाच्या प्रचंड कार्यात खारीचा वाटा उचलला नाहीतर हिमालयाएवढे समर्पित भावनेने कार्य केले आहे. हे कार्य करीत असताना मंडळाबाबत त्यांचा स्वाभिमान नेहमीच उच्च कोटीचा होता आहे आणि असेल ह्यात दुमत नाही. त्यांनी मंडळावर खरेखुरे प्रेम केले म्हणूनच त्यांना मंडळासाठी सलग ५५ वर्षे कार्य करणे शक्य झाले, असं माझं प्रामाणिक मत आहे.

सामाजिक कार्यात सहभाग घेताना नेहमीच आपल्या वैयक्तिक समस्या, कौटुंबिक प्रश्न, स्वतःचा नोकरी- व्यवसाय प्रतिकूल ठरत असतात. मात्र सन्मानिय श्री. देविदास कदम यांनी ह्यावर सहजपणे मात करीत आपला संसार सुखाचा केला, बीएसटीमध्ये जबाबदारीने नोकरी केली. हे सर्वांगिण सुंदर चौफेर यश सन्मानिय श्री. देविदास कदम यांनी मिळविले ते स्वतःच्या हिंमतीवर आणि कार्यक्षमतेवर! हे नमूद करावेसे वाटते.

नेहमीच सुखी, समाधानी आणि आनंदी असणाऱ्या श्री. देविदास कदम यांनी खूप मोठा मित्र परिवार आपल्याशी जोडून ठेवला. त्यांनी मंडळात काम करणाऱ्या प्रत्येक सभासदाचा तसेच प्रत्येक खेळाडूचा उत्साह वाढविला. त्यांची उपस्थिती ही मंडळासाठी नेहमीच प्रेरणादायी असते. कोणत्याही कार्यक्रमात ते प्रत्येकाची आस्थेने जी चौकशी करतात ती नेहमीच आपलेपणा जपणारी असते. सन्मानिय श्री. देविदास कदम हे हळव्या स्वभावाचे! हा हळवेपणा निसर्गसंपन्न गढीताम्हाणे गावासारखाच! देवगड तालुक्यातील गढीताम्हाणे गाव खूपच सुंदर! एका बाजूला खुप मोठी नदीवजा खाडी तर संपूर्ण गाव नारळ पोफळीसह आंबा कलामांच्या बागायतींनी संपन्न! अशा संपन्न गावातील संपन्न व्यक्तिमत्व म्हणजेच आमचे मित्र श्री. देविदास कदम!

श्री. देविदास कदम यांच्या सहवासात राहणे म्हणजे त्याच्या मित्रांसाठी- सहकार्यासाठी-शेजाऱ्यापाजाऱ्यांसाठी पर्वणी असते. त्यांच्या मायेचा आपलेपणा आमच्यासाठी नेहमीच आनंद देणारा असतो. आजही सायंकाळी आम्ही त्यांना शुभेच्छा देण्यासाठी एकत्र येणार आहोत. त्यांच्यासाठी आम्ही आजच नाहीतर नेहमीच परमात्म्याकडे नक्कीच प्रार्थना करू की, श्री. देविदास कदम यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना सदैव सुख, समाधान, आनंद, यश, किर्ती, धन आणि सदृढ आरोग्यासह दिर्घायुष्य मिळो! त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिवनेरी सेवा मंडळाचे भविष्यातील सत्कार्य आणखी गतिमान होवो! आमची प्रार्थना परमात्मा नक्कीच फलित करणार आहे; कारण श्री. देविदास कदम यांचे आजपर्यंतचे सत्कार्य हे आदर्शवत दीपस्तंभाप्रमाणे आहे!

पुन्हा एकदा शिवनेरी सेवा मंडळाचे उपाध्यक्ष श्री. देविदास कदम यांना शिवनेरी सेवा मंडळ परिवाराकडून आणि पाक्षिक `स्टार वृत्त’ परिवाराकडून अमृतमहोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा!

– मोहन सावंत
सहसंपादक- पाक्षिक `स्टार वृत्त’

You cannot copy content of this page