संपादकीय- सामाजिक सेवेच्या उल्हासित कर्तृत्वाला सलाम!

सन्मा. उल्हास फाटक साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!

सन्मा. श्री. उल्हास फाटक यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्याव्यात म्हणून मोबाईल हाती घेतला; पण दोन-तीन ओळींचा शुभेच्छा मजकूर सन्मा. उल्हास फाटक साहेबांसाठी अपूर्ण ठरेल ह्याची जाणीव झाली. त्यासाठी हाती पेन घेऊन शब्द कागदावर उतरविण्यास सुरुवात केली.

उल्हास शब्दाला प्रसन्नता, उत्साह, आनंद असे अनेक समानार्थी शब्द असले तरी `उल्हास’ हा शब्द `सुस्वभाव’ म्हणून वापरण्यास योग्य ठरेल; सन्मा. उल्हास फाटक साहेबांना शुभेच्छा देताना; असे मला वाटते.

खऱ्याची साथ देणं आणि खोट्याला खोटं म्हणणं हे जरी अत्यावश्यक असलं तरी हा स्वभाव आजच्या काळात आपमतलबी (फक्त आणि फक्त स्वतःचा आणि स्वतःच्या कुटुंबियांचा विकास करताना इतरांच्या प्रगतीसाठी काहीच न करणारे) लोकांकडून आक्रमक, चिडखोर, रागीष्ट ठरविला जातो. त्याची मुद्दामहून मौखिक जाहिरातबाजी केली जाते. मात्र खऱ्याला- सत्याला साथ देणारी आणि चुकीच्या गैर गोष्टींना रोखठोकपणे विरोध करणारी रोखठोक माणसं कोणत्याही यंत्रणेसाठी अनुकूल असतात आणि ती मला नेहमीच आवडतात. ती माझ्यासाठी आदर्शवत असतात. सन्मा. उल्हास फाटक साहेबांकडे असलेल्या अनेक सदगुणांपैकी हा सदगुण निश्चितच आम्हा सर्वांसाठी आदर्शवादी आहे.

सहकारमहर्षी स्वर्गीय सहदेव फाटक यांचे मानसपुत्र म्हणून सन्मा. उल्हास फाटक यांनी केलेले कार्य नेहमीच मला भावते. सहकारमहर्षी स्वर्गीय सहदेव फाटक साहेबांची समाजवादी विचारसरणी त्यांनी अंगिकारलीच नव्हेतर प्रत्यक्षात आणली. आपल्या संपर्कातील तसेच आपल्या कंपनीतील प्रत्येकाला ते जपतात. त्यांच्यावर जीवापाड प्रेम करतात. त्यांना संकटसमयी सर्वोतोपरी सहकार्य करतात. आजपर्यंत त्यांनी अनेकांना घर घेण्यासाठी, विवाहासाठी, आजारपणासाठी आर्थिक साहाय्य केले. अनेकांना वैद्यकीय मदत केली. मात्र ते स्वतः प्रसिद्धीपासून दूर राहिले. समाजवादी वृत्तीची व्यक्ती ही शांत सुस्वभावी असते; असा सर्वसाधारण समज असतो, मात्र समाजवादी व्यक्तिमत्व स्वतः उल्हासित अर्थात आनंदी असते आणि तो आनंद इतरांना मिळावा म्हणून सदोदित प्रयास करीत असते. नावाप्रमाणे उल्हास फाटक साहेबांना सुद्धा त्याच मार्गावरून प्रवास करताना पाहता येते. आमचे मित्र आणि मार्गदर्शक श्रीयुत उल्हास फाटक साहेब आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. परिणीती यांचा हा `उल्हासित प्रवास’ निरंतर सुरु राहायला पाहिजे, ही आजच्या दिवशी सदिच्छा!

स्वतःचे व्यक्तिमत्व घडवित असताना सन्मा. उल्हास फाटक साहेबांनी आणि त्यांच्या पत्नीने व सुपुत्राने आपल्या व्यवसायात घेतलेली उत्तुंग भरारी सर्व समाज बांधव भगिनींना प्रेरणादायक आहे. व्यवसाय करणे, स्वतःची कंपनी सुरू करणे आणि त्याची वृद्धी करणे; हा दृष्टिकोन आपल्या समाज बांधव भगिनींकडे अल्पप्रमाणात दिसतो. नोकरी करण्यावर आम्ही जास्त भर देतो. पण सन्मा. उल्हास फाटक साहेबांनी स्वतःच्या कर्तृत्वावर आणि समाजवादी विचारसरणीवर केलेले वैयक्तिक जीवनातील कार्य असो वा सामाजिक जीवनातील केलेले कार्य असो; ते उल्लेखनीय आहे- आदर्शवादी आहे.

मेहनत- कष्ट करून, व्यासंग-ध्यास उरात ठेवून व प्रामाणिकपणा जपून सर्व क्षेत्रात यशस्वी होता येतं; हे उल्हास फाटक साहेबांच्या जीवनाकडे पाहिल्यास लक्षात येतं. क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संस्था, अपना परिवार, अपना बँक, अपना बाजार ह्या समाज-सेवाभावी-आर्थिक-सहकारी संस्था नेहमीच अग्रेसर राहाव्यात; ह्यासाठी ते नेहमीच आपली भूमिका स्पष्टपणे मांडत असतात. राजकारणातही ते मोठ्या उत्साहाने काम करतात. बॅरिस्टर पालव साहेब, शास्त्रज्ञ रमेश गावकर साहेब ह्यांच्या सानिध्यात राहून त्यांच्याकडून ते सामाजिक मूल्यांची जपणूक करण्याचे धडे घेतात व ते आपल्या कार्यात प्रत्यक्षात आणतात. म्हणूनच त्यांचे कर्तृत्व आदर्शवत आणि सलाम करण्यासारखेच आहे. आदरणीय श्री. उल्हासजी फाटक साहेब यांना षष्ठीपूर्ती वाढदिवसाच्या निमित्ताने हार्दिक हार्दिक शुभेच्छा! आदिमाता श्री गजबादेवी, श्री देव रामेश्वर त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या आयुष्यात आदर्शवादी कार्य करण्यास सामर्थ्य देवो; ही मनःपूर्वक प्रार्थना!

-नरेंद्र हडकर

You cannot copy content of this page